छोट्या पडद्यावरचा ‘कौन बनेगा करोडपती’ हा लोकप्रिय कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. ‘केबीसी’ अर्थात ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वापासून बिग बी ‘अमिताभ बच्चन’ या शोमध्ये सूत्रसंचालन करत आहेत. या वयातही ते त्यातच ताकदीने काम करत आहेत. त्यांच्यामध्ये असलेली ऊर्जा पाहून समोरच्या स्पर्धकांचा जोश वाढतो. नुकताच या कार्यक्रमामधील प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला.

सोनी टिव्ही या वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या नव्या भागाचा प्रोमो व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अमिताभ यांच्यासमोरच्या हॉटसीटवर करण इंद्रसिंह ठाकोर नावाची व्यक्ती बसलेली असल्याचे दिसते. विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर करण पटापट देत आहे असे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यावर त्याला शाबासकी देण्यासाठी अमिताभ ‘तुमच्या ज्ञानाला माझा सलाम’ असे म्हणतात. ५० लाख जिंकल्यानंतर पुढे ७५ लाखांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर न देता आल्याने करणने खेळातून माघार घेतली.

आणखी वाचा – टेलरींग ते स्टेशनरीच्या दुकानात काम; गजराज राव यांचा संघर्षमय प्रवास, म्हणाले “त्यादिवशी फक्त…”

करण ठाकोरला ५० लाखांसाठी “प्रसिद्ध डिझाइनर्स चार्ल्स आणि रे एम्स यांनी भारत भेटीदरम्यान दैनंदिन वापरातल्या कोणत्या गोष्टीचे वर्णन ‘द ग्रेटेस्ट, द मोस्ट ब्यूटीफुल’ असे केले होते”, हा गमतीदार प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे ‘लोटा’ हे अचूक उत्तर देत त्याने ५० लाख रुपये कमावले. त्यानंतर “यापैकी कोणाला त्यांच्या कामासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले, जे नंतर चुकीचे असल्याचे सिद्ध झाले?”
पर्याय –
अ. ओसवल्ड एव्हरी
ब. जोशिया गिब्स
क. गिल्बर्ट एन लुईस
ड. जोहान्स फिबिगर
७५ लाखांसाठीचा हा प्रश्न करणसमोर आला. तेव्हा या प्रश्नाचे उत्तर येत नसल्याने त्यांने आधी जिंकलेले पैसे घेत खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. या प्रश्नाचे उत्तर ‘जोहान्स फिबिगर’ हे आहे.

आणखी वाचा – रवी जाधव लवकरच करणार ‘ओटीटी’ विश्वात पदार्पण, फोटो शेअर करत म्हणाले…

करण मेकॅनिकल इंजिनीअर आहेत. ते शेतीदेखील करतात. केबीसीच्या मंचावर ते त्यांच्या पत्नीसह आले होते.