अभिनेत्री मेहरीन पिरजादा प्रामुख्याने तेलगू चित्रपटांसाठी ओळखली जाते, परंतु तिने तमिळ, हिंदी आणि पंजाबी चित्रपटांतही काम केलं आहे. कृष्ण गाडा वीरा प्रेमा गाथा, महानुभावुडू, राजा द ग्रेट, F2: फन अँड फ्रस्ट्रेशन, अश्वत्थामा, फिल्लौरीसह अनेक चित्रपटांमध्ये तिने विविधांगी भूमिका साकारल्या. दोन वर्षांपूर्वी मेहरीन २८ व्या वर्षी बीजांड गोठवल्याने (Eggs Freeze) चर्चेत आली होती. सध्या ती तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. मेहरीन पीरजादा हिने २६ एप्रिल रोजी बिझनेसमन अर्श औलख याच्याशी खासगी सोहळ्यात लग्न केलं. लग्नाचे फोटो मेहरीनने सोशल मीडियावर शेअर करून सर्वांना ही आनंदाची बातमी दिली. आता मेहरीनने तिच्या लग्नाची गोष्ट सांगितली आहे.

मेहरीन-अर्शच्या पहिल्या भेटीची गोष्ट

मेहरीन आणि अर्श यांची भेट एका कॉमन मित्राच्या माध्यमातून झाली होती. सुरुवातीला दोघांनाही या भेटीतून काही होईल असं वाटलं नव्हतं. मेहरीन म्हणाली, “आम्हा दोघांनाही वाटलं होतं की ही भेट फारतर अर्ध्या तासांची असेल. त्याला वाटलं की ही एक अभिनेत्री आहे, चला फक्त भेटून घेऊया; तर मला वाटलं होतं की आमचं जमणार नाही. मी स्वतःला बजावलं होतं की, काही खटकलं तर लगेच तिथून निघून जायचं.” पण गंमत म्हणजे, ती अर्ध्या तासांची भेट तब्बल सहा तास चालली. त्या भेटीच्या शेवटी दोघांनाही एकमेकांबद्दल सकारात्मकता जाणवली. विशेष म्हणजे, अर्शने अजूनही मेहरीनचा कोणताही चित्रपट पाहिलेला नाही.

गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरू झालेलं हे नातं त्यांनी मुद्दामहून खासगी ठेवलं होतं. मेहरीनच्या मते, लग्नात फक्त प्रेम असून चालत नाही, तर कुटुंबाचे विचार, संस्कार आणि जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जुळणंही खूप महत्त्वाचं असतं. तिच्या लग्नाच्या निर्णयामध्ये तिचा भाऊ आणि अभिनेता गुरफतेह पीरजादा यानेही महत्त्वाची भूमिका बजावली.

भावाने केली अर्शची चौकशी

“बऱ्याच मुलींसाठी त्यांचे वडील हे आदर्श असतात, पण माझ्यासाठी माझा भाऊ सर्वस्व आहे. अर्शला भेटल्यावर मला जाणवलं की तो शांत आहे आणि मला समजून घेतो,” असं मेहरीनने सांगितलं. तर मेहरीनच्या मते, सुरुवातीला तिचा भाऊ गुरफतेह तिच्या बाबतीत खूप प्रोटेक्टिव्ह होता. “त्याने अर्शबद्दलची पूर्ण चौकशी केली होती, त्याला वाटलं की काहीतरी नक्कीच सापडेल. पण भेटल्यानंतर त्यांचं एकमेकांशी खूप छान जमलं. आता ते अगदी भावासारखे राहतात,” असंही मेहरीनने नमूद केलं.

लग्नाला उपस्थित होते फक्त १२० पाहुणे

अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्याच्या निर्णयाबद्दल ३० वर्षीय मेहरीन म्हणाली, “जर सर्व काही माझ्या मनासारखं झालं असतं, तर १२० पाहुण्यांऐवजी मी फक्त २० लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं असतं. लग्न ही खूप खासगी गोष्ट आहे. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला तुमच्याबद्दल मनापासून चांगलं वाटायला हवं. माझ्या मित्रांनी कुटुंबाप्रमाणे लग्नाची सगळी जबाबदारी सांभाळली.”

लग्नात मेहरीनचा भाऊ रडला

एक आठवण सांगत मेहरीन म्हणाली, “फेऱ्यांच्या वेळी माझा भाऊ लहान मुलासारखा रडत होता. त्याला बघून तिथे उपस्थित सगळेच रडू लागले. त्याला पाहून अर्शचे डोळेही पाणावले. पण लग्नानंतरच्या पार्टीमध्ये आम्ही मनसोक्त डान्स केला. लग्नसोहळा खासगी ठेवण्याचं कारणही तिने सांगितलं. “सुरुवातीलाच खूप गाजावाजा केला की त्या क्षणाचं महत्त्व हरवतं, असे मला वाटते. आम्ही साधे पीआर सुद्धा नेमले नव्हते. अगदी काम करणाऱ्या लोकांनाही कोणाचं लग्न आहे हे सांगण्यास मनाई होती. मी फक्त माझा आनंद व्यक्त करण्यासाठी फोटो पोस्ट केले आणि पुन्हा लग्नाच्या सेलिब्रेशनमध्ये रमले,” असं मेहरीन म्हणाली.

हनीमूनला जातेय मेहरीन पीरजादा

मेहरीनने तिचे हनिमून प्लॅनही सांगितले. “सध्या आम्ही थोड्या दिवसांसाठी आफ्रिकेला हनिमूनसाठी जात आहोत. आम्ही दोघांनीही ती जागा अजून पाहिलेली नाही. तिथून आल्यावर मी पुन्हा कामाला सुरुवात करेन,” असं मेहरीन पीरजादा म्हणाली.