हॉलीवूड अभिनेत्री मर्ले ओबेरॉन यांनी १९३६ मध्ये ऑस्करच्या इतिहासात महत्त्वाची नोंद केली होती. मात्र, त्यावेळी त्यांच्या नामांकनाचं ऐतिहासिक महत्त्व फारसं कोणाच्याही लक्षात आलं नव्हतं. ‘द डार्क एंजल’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं ऑस्करकडून नामांकन मिळालं होतं. हे नामांकन मिळवणाऱ्या त्या दक्षिण आशियाई वंशाच्या पहिल्या अभिनेत्री ठरल्या होत्या. मात्र, या कामगिरीचा उल्लेख त्या सार्वजनिकपणे करू शकत नव्हत्या. कारण त्यांच्या नामांकनाला ऐतिहासिक बनवणारी त्यांचीच ओळख त्यांनी संपूर्ण कारकिर्दीत लपवून ठेवली होती.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार १९११ मध्ये मुंबईत एस्टेल मर्ले ओ’ब्रायन थॉम्पसन या नावाने त्यांचा जन्म झाला. त्यांचं बालपण कोलकात्यात गेलं. मात्र हॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर त्यांनी स्वतःची ओळख तस्मानियात जन्मलेल्या गोऱ्या ब्रिटिश अभिनेत्री अशी करून दिली. मर्ले ओबेरॉन पुढे हॉलीवूडमधील मोठ्या अभिनेत्रींपैकी एक बनल्या. Wuthering Heights या चित्रपटात त्यांनी कॅथीची भूमिका साकारली होती. हॉलीवूडच्या गोल्डन एजमधील अनेक दिग्गज कलाकारांबरोबर त्यांनी काम केलं. मात्र, त्यांची भारतीय आणि मिश्रवंशीय पार्श्वभूमी त्यांनी आयुष्यभर गुप्त ठेवली. १९७९ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांची ही ओळख सार्वजनिकपणे समोर आली नव्हती.
शेवटपर्यंत लपवून ठेवलेली भारतीय ओळख
हॉलीवूडमध्ये मर्ले ओबेरॉन म्हणून प्रसिद्ध होण्यापूर्वी त्यांचं नाव एस्टेल मर्ले ओ’ब्रायन थॉम्पसन होतं. कुटुंबात त्यांना प्रेमाने क्विनी’ म्हणून हाक मारली जायची. १९११ मध्ये त्यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे वडील आर्थर थॉम्पसन ब्रिटिश होते, तर त्यांच्या आईच्या कुटुंबाचं मूळ श्रीलंकेत होतं. मात्र, त्यांच्या जन्माभोवती एक कौटुंबिक गुपित होतं. नंतर झालेल्या संशोधनातून समोर आलं की, मर्ले यांचं संगोपन करणारी शार्लट सेल्बी ही त्यांची आई नसून आजी होती. तर कॉन्स्टन्स, ज्यांना मर्ले स्वतःची बहीण समजत होत्या, त्या प्रत्यक्षात त्यांच्या जैविक आई होत्या. या गोष्टी मर्ले ओबेरॉन यांच्या निधनानंतरच सार्वजनिक झाल्या. त्यानंतर त्यांच्या आयुष्यावर आधारित चरित्रं आणि माहितीपटांमध्ये त्यांच्या पार्श्वभूमीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. १९८३ मध्ये प्रकाशित झालेलं ‘प्रिन्सेस मर्ले: द रोमँटिक लाइफ ऑफ मर्ले ओबेरॉन’ हे चरित्र त्यांच्या जन्माबाबत माहिती देणारं पहिलं महत्त्वाचं पुस्तक ठरलं. या पुस्तकातून मर्ले यांचा जन्म तस्मानियात नव्हे, तर भारतात झाला होता, असा दावा करण्यात आला. मात्र, नंतरच्या संशोधनात त्यांच्या कौटुंबिक इतिहासासंदर्भातील पुस्तकातील काही दाव्यांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द ट्रबल विथ मर्ले’ या माहितीपटातही मर्ले ओबेरॉन यांच्या जन्म आणि कौटुंबिक पार्श्वभूमीबाबत असलेल्या वेगवेगळ्या दाव्यांचा आणि परस्परविरोधी माहितीचा आढावा घेण्यात आला.
मर्ले ओबेरॉन यांचं बालपण मुंबई आणि कोलकाता येथे गेलं. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिघडली. त्यांनी कोलकात्यातील ला मार्टिनिअर शाळेत शिक्षण घेतलं. मात्र, मिश्रवंशीय पार्श्वभूमीमुळे त्यांना शाळेत टोमणे आणि छळाचा सामना करावा लागल्याचं सांगितलं जातं. किशोरवयातच त्यांनी कलकत्ता अमॅच्युअर थिएट्रिकल सोसायटीसोबत नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पुढे चित्रपटसृष्टीत करिअर करण्याच्या उद्देशाने १९२९ मध्ये त्या भारतातून ब्रिटनला गेल्या. मात्र, त्यांच्या संघर्षाची सुरुवात फारशी ग्लॅमरस नव्हती. स्वतःचं करिअर उभं करण्यासाठी त्यांनी नाईटक्लबमध्ये होस्टेस म्हणून काम केलं, तसेच काही छोट्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. हळूहळू हॉलीवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू झाला.
नावापासून -आई-वडिलांपर्यंत बदलेली मूळ ओळख
त्यांना मोठी संधी चित्रपट दिग्दर्शक अलेक्झांडर कोर्डा यांच्यामुळे मिळाली. १९३२ मध्ये लंडन फिल्म्सने त्यांच्याबरोबर करार केला. त्यानंतर क्विनी थॉम्पसनचं नाव बदलून मर्ले ओबेरॉन करण्यात आलं. मात्र, हा बदल केवळ नावापुरता मर्यादित नव्हता. त्यांचा जन्म तस्मानियात झाला असल्याचं सांगितलं जाऊ लागलं. त्यांचे आई-वडील श्रीमंत गोरे असल्याचंही सांगण्यात आलं. त्यांच्या भारतीय पार्श्वभूमीबद्दलची माहिती सार्वजनिक आयुष्यातून पूर्णपणे दूर करण्यात आली. १९३४ मध्ये द वेस्ट ऑस्ट्रेलियनला दिलेल्या मुलाखतीत मर्ले ओबेरॉन यांनी आपण तस्मानियात जन्मलो असून सात वर्षे भारतात राहिल्यानंतर इंग्लंडला गेलो, असं सांगितलं होतं. ऑस्ट्रेलियन नॅशनल फिल्म अँड साउंड आर्काइव्हच्या माहितीनुसार, त्यांच्या पार्श्वभूमीबाबत प्रश्न उपस्थित होत असतानाही त्यांनी आपल्या कारकिर्दीत हीच माहिती कायम सांगितली.
हॉलीवूड स्टार बनण्याचा प्रवास
१९३३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द प्रायव्हेट लाइफ ऑफ हेन्री आठवा’ या चित्रपटात अॅन बोलेनची भूमिका साकारल्यानंतर मर्ले ओबेरॉन यांच्या करिअरला वेग आला. त्यानंतर त्यांनी ‘द प्रायव्हेट लाइफ ऑफ डॉन जुआन’ आणि ‘द स्कार्लेट पिम्परनेल’ या चित्रपटांमध्ये काम केलं. त्यामुळे ब्रिटिश चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आणि पुढे त्या हॉलीवूडमध्ये गेल्या. १९३४ मध्ये त्या अमेरिकेत पोहोचल्या. त्यांचा अमेरिकेत प्रवेश अशा काळात झाला, जेव्हा दक्षिण आशियाई लोकांसाठी अमेरिकेतील स्थलांतराचे नियम अत्यंत कठोर होते. १९२३ मधील अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ‘युनायटेड स्टेट्स विरुद्ध भगतसिंग थिंड’ या खटल्यातील निर्णयामुळे भारतीय स्थलांतरितांना नागरिकत्व मिळवण्यासाठी आवश्यक असलेला ‘गोरा’ वांशिक दर्जा नाकारण्यात आला होता.
हॉलीवूडमध्येही वांशिक भेदभावाच्या मर्यादा होत्या.
‘द हेज कोड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोशन पिक्चर प्रॉडक्शन कोडमध्ये वेगवेगळ्या वंशातील व्यक्तींमधील प्रेमसंबंध दाखवण्यावरही निर्बंध होते. अशा परिस्थितीत मर्ले ओबेरॉन यांनी स्वतःची गोऱ्या ब्रिटिश महिलेची प्रतिमा तयार केली होती. त्यामुळे त्या हॉलीवूडने आपल्या आघाडीच्या अभिनेत्रींसाठी तयार केलेल्या चौकटीत सहजपणे बसल्या. मर्ले ओबेरॉन यांच्या ऑस्कर नामांकनाबद्दल समजल्यानंतर लेखक मयुख सेन यांनी त्यांच्या आयुष्याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यांच्या २०२५ मध्ये प्रकाशित ‘लव्ह, क्विनी’ या चरित्रासाठी सेन यांनी मर्ले ओबेरॉन यांच्याशी संबंधित स्थलांतराच्या नोंदींचाही अभ्यास केला. त्यांच्या संशोधनातून मर्ले यांच्या कारकिर्दीचा संबंध त्या काळात अमेरिकेतील दक्षिण आशियाई लोकांवर असलेल्या स्थलांतर आणि नागरिकत्वाच्या निर्बंधांशी जोडला जातो.
ऑस्करसाठी नामांकन
१९३५ मध्ये मर्ले ओबेरॉन यांनी ‘द डार्क एंजल’ या चित्रपटात किटी वेनची भूमिका साकारली. या भूमिकेसाठी त्यांना १९३६ मध्ये झालेल्या आठव्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळालं. अकादमीच्या अधिकृत नोंदीनुसार, मर्ले ओबेरॉन या या पुरस्काराच्या नामांकित अभिनेत्रींपैकी एक होत्या. मात्र, ‘डेंजरस’ या चित्रपटासाठी बेटी डेव्हिस यांनी हा पुरस्कार जिंकला. मर्ले ओबेरॉन यांच्या नामांकनाचं ऐतिहासिक महत्त्व त्यांच्या पार्श्वभूमीची माहिती समोर आल्यानंतरच स्पष्ट झालं. नंतर उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, दक्षिण आशियाई वंशाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या ऑस्कर नामांकन मिळवणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री ठरल्या. मात्र, ऑस्कर सोहळ्याला उपस्थित असलेल्या कोणालाही त्यावेळी या गोष्टीची कल्पना नव्हती. हॉलीवूडमधील लोकांसाठी मर्ले ओबेरॉन या तस्मानियातून आलेल्या ब्रिटिश अभिनेत्री म्हणूनच परिचित होत्या.
