scorecardresearch

आमिरने चित्रपट सोडल्यानंतर लैंगिक छळाचा आरोप असलेला दिग्दर्शक म्हणतो..

‘मोगुल’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप आहेत. म्हणूनच त्यांच्यासोबत काम न करण्याचा निर्णय आमिरनं घेतला आहे.

आमिर खाननं देखील 'मोगुल'सारख्या मोठ्या चित्रपटातून माघार घेतली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप आहेत
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये प्रचंड उलथापालथ सुरू आहे. ‘मी टु’ मोहिमेअंतर्गत बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गजांचं खरं रुप लोकांसमोर येत आहे. सभ्यतेचा मुखवटा घालून वावरणाऱ्या अनेक लोकांचा खरा चेहरा जगासमोर आला आहे. या मोहिमेला पाठिंबा दर्शवत आमिर खाननं देखील ‘मोगुल’सारख्या मोठ्या चित्रपटातून माघार घेतली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप आहेत तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे आमिरनं सुभाष कपूर यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला आहे. मात्र आमिरच्या या निर्णयावर पहिल्यांदाच सुभाष कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘आमिरच्या निर्णयाचा मी पूर्णपणे आदर करतो. पण मी निर्दोष आहे आणि न्यायालयात मी ते नक्कीच सिद्ध करेन’ असं कपूर ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहे. गितीका त्यागीनं २०१४ मध्ये सुभाष कपूर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. २०१२ मध्ये कपूर यांनी आपल्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार तिनं केली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

मंगळवारी गितीका त्यागी हिनं ट्विट करत ‘किरण राव हिचा पती आमिर खान स्वत: लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेल्या व्यक्तीसोबत काम करत आहे.’ असं म्हटलं होतं. त्यानंतर रात्री उशीरा आमिर आणि किरण यांनी चित्रपट न करण्याचा निर्णय जाहीर केला. ‘सामाजिक समस्यांचं निराकरण करण्यात आम्ही प्रतिबद्ध आहोत. आम्ही कोणत्याही प्रकारच्या लैंगिक छळाचा निषेध करतो आणि अशा प्रकरणांमध्ये खोट्या आरोप करणाऱ्यांचीही निंदा करतो, आम्ही ज्या दिग्दर्शकासोबत काम करणार आहोत त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप आहेत त्यामुळे आम्ही त्याच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे’ अशी माहिती आमीरनं सोशल मीडियाद्वारे दिली.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Metoo subhash kapoor on aamir khan decision