समांतर, व्यावसायिक हिंदी चित्रपट आणि ‘वागले की दुनिया’सारख्या गाजलेल्या मालिकांमधून घरोघरी परिचयाच्या असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर पहिल्यांदाच मराठी मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारणार आहेत.

त्यांची मध्यवर्ती भूमिका असलेला नुकताच ‘तिघी’ हा चित्रपट चित्रपटगृहातून प्रदर्शित झाला आहे. मराठी चित्रपटातून पहिल्यांदाच काम केल्यानंतर त्या आता ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘मी जिंकून घेईन सारं’ या नव्या मालिकेतून बाईआजीच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत.‘मी जिंकून घेईन सारं’ या मालिकेतील राजगुरू परिवाराचा डोलारा बाईआजी सांभाळत आहेत. त्या कुटुंबाच्या कर्ताधर्ता आहेत. एका अपघातात मुलगा आणि सून अकाली गेल्यानंतर साकेत आणि अनिकेत या आपल्या नातवंडांना त्यांनी आईची माया दिली. आणि याच राजगुरू परिवारात लहानाची मोठी झालेली छवी आणि बाईआजींचं जिवाभावाचं नातं आहे.

या मालिकेविषयी आणि आपल्या भूमिकेविषयी बोलताना, ‘बाईआजी’ ही केवळ परंपरागत चौकटीतली आजी नाही, तर उदारमतवादी, मोकळ्या विचारांची आजी आहे. काळानुसार बदल स्वीकारणारी, आजच्या पिढीच्या विचारांशी सहज जुळवून घेणारी आणि स्निकर घालून आत्मविश्वासाने वावरणारी ही ‘कूल’ आजी कायम हसतमुख व आनंदी असते. नातवंडांना समजून घेणारी, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नातं जपणारी अशी ती स्त्री आहे’ असं भारती आचरेकर यांनी सांगितलं. सर्वात खास म्हणजे, इतक्या वर्षांच्या कारकीर्दीनंतर मी पहिल्यांदाच मराठी मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत काम करते आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा एक नवा आणि उत्साहाचा टप्पा आहे. ‘बाईआजी’सारखं बहुपेडी, ताकदीचं आणि भावनिक0 छटा असलेलं पात्र मला साकारायला मिळणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

बऱ्याच काळानंतर संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहावी, अशी मालिका आम्ही ‘मी जिंकून घेईन सारं’च्या माध्यमातून घेऊन येत आहोत. या मालिकेत भारती आचरेकर पहिल्यांदाच मराठी मालिकेत दिसणार आहेत आणि ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांचा समृद्ध आणि प्रदीर्घ अनुभव या मालिकेचं सर्वात मोठं बळ आहे. प्रेक्षकांना एक दर्जेदार आणि अर्थपूर्ण अनुभव देण्यात आम्ही नक्कीच यशस्वी ठरू, असा विश्वास कलर्स मराठी वाहिनी समूहाच्या मराठी क्लस्टरचे कार्यकारी उपाध्यक्ष सतीश राजवाडे यांनी व्यक्त केला. ‘मी जिंकून घेईन सारं’ ही मालिका १६ मार्चपासून संध्याकाळी ७ वाजता ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर प्रसारित होणार आहे.