संपूर्ण जगाला आपल्या तालावर नाचवणारा ‘किंग ऑफ पॉप’ मायकल जॅक्सन हे संगीत विश्वातील एक अजरामर व्यक्तिमत्त्व आहे. मायकल जॅक्सन इतका मोठा सुपरस्टार होता की मृत्यृनंतरही त्याच्या तथाकथित रहस्यमय जीवनाबद्दल लोकांना प्रचंड आकर्षण आहे. त्यामुळेच माध्यमांनी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावून खळबळजनक सत्य बाहेर काढण्याचा वारंवार प्रयत्न केला. असाच काहीसा प्रयत्न एचबीओ वाहिनीने ‘लिव्हिंग नेव्हरलँड’ या माहितीपटातून केला असून या माहितीपटाला मायकल जॅक्सनच्या चाहत्यांनी जोरदार विरोध केला आहे. तसेच त्यांनी या माहितीपटाविरोधात # इनोसेंट मायकल ही मोहीमदेखील सुरू केली आहे.

मायकलच्या चाहत्यांनी काही जाहिरात कंपन्या आणि सरकारी संस्थांच्या मदतीने लंडनमधील बसेसवर # इनोसेंट मायकल असे लिहिलेले फलक लावले आहेत. या मोहिमेमुळे एचबीओ वाहिनीची लोकप्रियतादेखील हळूहळू ढासळू लागली आहे.  १९९२ साली मायकलने ‘द डेंजरस’ या म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन केले होते. या कार्यक्रमादरम्यान त्याच्यावर दोन अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते; परंतु पुढे पुराव्यांअभावी त्याला निर्दोष सोडण्यात आले. २७ वर्षांपूर्वी घडलेले हे प्रकरण ‘लिव्हिंग नेव्हरलँड’ या माहितीपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या माहितीपटात दाखवण्यात आलेले प्रसंग साफ खोटे आहेत. केवळ मायकल जॅक्सनच्या द्वेषापोटी ‘लिव्हिंग नेव्हरलँड’ची निर्मिती करण्यात आली असल्याचा आरोप मायकलच्या कुटुंबीयांनी केले असून त्यांनी एचबीओ वाहिनीविरोधात तब्बल १०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा दावा ठोकला आहे.

मायकलची मुलगी पॅरिस जॅक्सन ही त्या लहान मुलांवर अत्याचार करणारा तो मायकल जॅक्सन नव्हेच असे म्हटले आहे. मायकलवर लावण्यात आलेले लौंगिक शोषणाचे आरोप खोटे होते. हे प्रकरण २७ वर्षांपूर्वीच संपले आहे. परंतु एचबीओसारख्या काही स्वार्थी वाहिन्या केवळ लोकप्रियता आणि पैसे मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे ‘लिव्हिंग नेव्हरलँड’ हा माहितीपट होय, अशा शब्दांत पॅरिस जॅक्सनने आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच तिने हा माहितीपट न पाहण्याची विनंती मायकलच्या चाहत्यांना केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा फटका आता एचबीओ वाहिनीच्या लोकप्रियतेला बसला आहे.