Michael Jackson biopic ‘Michael’ collects 2000 crore in 5 days : जिथे जागतीक स्तरावर चित्रपट एक-दोन महिन्याच्या कालावधीत १०००-१५०० कोटींची कमाई करतात तिथे एका बायोपिकने अवघ्या पाच दिवसांच्या कालावधीत तब्बल २००० कोटींचा गल्ला जमावला आहे. प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाची चर्चा सुरू होती आणि आता रिलीज झाल्यानंतरही चरित्रपट अनेकांची पसंती मिळवत आहे. हा चित्रपट म्हणजे पॉप सम्राट मायकल जॅक्सनच्या जीवनावर आधारित ‘मायकल’ हा होय
मायकल जॅक्सन हे जगभरातील प्रसिद्ध कलाकारांच्या यादीतील एक मोठं नाव आहे. आजही त्याची क्रेझ काही कमी झालेली नाही. जगभरात त्याचे शेकडो चाहते आहेत. त्यामुळे आता त्याच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाल्याने त्याच्या चाहत्यांसाठी जणू ही परवणीच ठरल्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शनवरुनही दिसतं. परंतु, असं असलं तरी समीक्षकांकडून या चित्रपटाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. परदेशासह भारतीय चित्रपट गृहांमध्येसुद्धा हा चित्रपट पाहिला जात आहे.
सर्वाधिक कमाई करणारा बायोपिक ठरला
२२ एप्रिल रोजी यूकेसह परदेशात आणि २४ एप्रिल रोजी भारतातील चित्रपटगृहांत प्रदर्शित झालेल्या ‘मायकल’ या चित्रपटाने ओपनिंगला वीकेंडमध्ये सर्वाधिक कमाई करत इतिहास रचला आहे. ‘द गार्डियन’च्या वृत्तानुसार, या चित्रपटाने जगभरात २१७ मिलियन डॉलर म्हणजेच २००० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.
नॉर्थ अमेरिकेतच या चित्रपटाने ओपनिंगला ९७ मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे ८९९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यापूर्वी नॉर्थ अमेरिकेत सर्वाधिक कमाई करणारा बायोपिक ‘ओपेनहायमर’ होता. या चित्रपटाने २०२३ मध्ये ८२ मिलियन डॉलरची कमाई केली होती. तर २०१८ मध्ये आलेल्या ‘बोहेमियन रॅप्सडी’ने ५१ मिलियन डॉलरचा गल्ला जमवला होता.
भारतामध्येही ‘मायकल’ चित्रपटाची दमदार कमाई सुरू आहे. फक्त परदेशातच नाही, तर भारतातही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने तीन दिवसांत १६.७२ कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलं आहे, तर ग्रॉस कमाई २० कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. शनिवारी आणि रविवारी चित्रपटाने ५ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती.
पुतण्यानं साकारली मुख्य भूमिका
‘मायकल’ या बायोपिकमध्ये मायकल जॅक्सनचा पुतण्या जाफर जॅक्सन यांने काका मायकलची भूमिका साकारली आहे. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. हा चित्रपट जगातील नंबर १ बायोपिक ठरला आहे. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल जाफरने चाहत्यांचे आभार मानले. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तो म्हणाला, “संपूर्ण जगाने आपलं प्रेम आणि पाठिंबा दिला आहे. यासाठी मी मनापासून आभारी आहे. यापेक्षा जास्त आनंदी मी होऊ शकत नाही.”
दरम्यान, मायकल जॅक्सनच्या जीवनावर आधारित ‘मायकल’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आंत्वां फुक्वा (Antoine Fuqua) यांनी केलं आहे. तर या चरित्रपटाची निर्मिती स्वत: जॅक्सन कुटुंबीयांनीच केली आहे. शिवाय चित्रपाट मायकल जॅक्सनचा पुतण्या मुख्य भूमिकेत आहे.
