मिलिंद गवळी यांनी नुकतीच दोन दिवसांपूर्वी ते आजोबा झाल्याची आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांबरोबर सोशल मीडियामार्फत शेअर केली. त्यांच्या लेकीने मिथिला गवळीने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून गणेश चतुर्थीला त्यांच्या घरी गौराई आली असं त्यांनी म्हटलं होतं. आता मिलिंद गवळी नातीला सहकुटुंब दगडूशेठ हलवाईच्या दर्शनाला घेऊन गेले असून त्यांनी पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.
मिलिंद गवळींनी पूर्ण केली लेकीची इच्छा
इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत मिलिंद गवळी म्हणाले, “गणेश चतुर्थीच्या दिवशी बाळाचा जन्म झाला, बाळाच्या आईची इच्छा होती की आज बाळाला ४५ दिवस पूर्ण झाले, तर बाळाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या पायावर डोकं ठेवून आणायचं. आम्ही सगळे लगेच तयार झालो, गेल्या वीस-बावीस वर्षांपासून माझा पुण्यातला मित्र संदीप वर्पे सिनेमा प्रमोशनच्या वेळेपासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनाला माझ्याबरोबर असायचाच. आजही तो पहाटे माझ्या परिवाराबरोबर मंदिरात आला, मंदिरात पुजाऱ्यांनी बाळाला बाप्पाचं चरण स्पर्श घडवून आणलं. आज संकष्टी असल्यामुळे मंदिरात गर्दी होती, आरती सुरू होती, पण आमचं बाळ अजिबात रडलं नाही, गणेशचतुर्थीच्या दिवशी जन्माला आलेलं बाळ जणू काही बाप्पाचं दर्शन घ्यायलाच आतुर होतं.
मिलिंद गवळी पुढे म्हणाले, “उद्या बाळाचा नामकरण सोहळा आहे, तेव्हा येणाऱ्या पाहुण्यांना झाडाचं रोप द्यायचं असं मिथिला आणि दिग्विजय यांनी ठरवलंय, याचा मला खूप आनंद झाला”. पुढे त्यांनी लिहिलं की, “श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाची महिमा किती आहे हे माझ्या अकलनाच्या पलीकडची आहे, ऋषिपंचमीच्या दिवशी ३५ हजार भगिनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण करतात आणि महाआरती करतात, आपल्या देशामध्ये ऋषिकेश आणि हरिद्वारला संध्याकाळची जेव्हा गंगा आरती होते, तो दिव्य सोहळा मी अनुभवलाय, या ३५ हजार माऊल्या एका वेळेला अथर्वशीर्ष पठण करत असतील तेव्हा तशीच अनुभूती होत असेल. आता त्याचा योग कधी येतोय बघूया. आज मात्र माझ्या नाती बरोबर आणि कुटुंबाबरोबर छान दर्शन झालं. गणपती बाप्पा मोरया”
दरम्यान, मिलिंद गवळी अनेकदा सोशल मीडियामार्फत त्यांच्या व्यावसायिक व खासगी आयुष्यातील घडामोडींबद्दल सांगत असतात. याचसह ते अनेकदा चित्रपट, मालिकांमध्ये काम करतानाच्या जुन्या आठवणी सांगत असतात. त्यांचे चाहते त्यांनी शेअर केलेल्या पोस्टला भरभरून प्रतिसाद देत असतात
