Milind Soman Fitness Secret : सेलिब्रिटी अनेक कारणांमुळे चर्चेत असतात. त्यातील एक म्हणजे त्यांचा फिटनेस, डाएट आणि डेली रूटीन. इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत जे फिटनेस फ्रीक आहेत. ते त्यांच्या आरोग्याची, शरीराची आणि मानसिक आरोग्याचीसुद्धा निगा राखतात. योग्य आहाराचं सेवन करतात. त्यांची दिनचर्याही ठरलेली असते.
इंडस्ट्रीतील फिटनेसमुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे मिलिंद सोमण. मिलिंद सोमण त्यांच्या अभिनयासह फिटनेसमुळेही अनेकांच्या चर्चेचा विषय असतात. वयाच्या साठीतही ते खूप फिट असून आरोग्याची नीट काळजी घेतात, नियमित व्यायाम करतात. पण, तुम्हाला माहीत आहे का मिलिंद हे इतर सेलिब्रिटींप्रमाणे कुठलाच ठराविक डाएट फॉलो करत नाहीत, असं त्यांनी स्वत: एका मुलाखतीत म्हटलं आहे. मिलिंद सोमण यांच्या फिटनेसमागचं रहस्य काय आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
मिलिंद सोमण यांच्या फिटनेसचा मंत्र काय आहे?
‘टाईम्स नाऊ’शी संवाद साधताना मिलिंद यांना, सगळे तुम्हाला तुमच्या फिटनेससाठी ओळखतात. कोणीतरी तुमच्याबद्दल तुम्ही चिरतरुण आहात असं म्हटलेलं. ६० वर्षे वय असतानाही तुम्ही खूप फिट आहात, यामागचं रहस्य काय आहे असं विचारल्यानंतर ते म्हणाले, “ज्यांनी हे म्हटलंय त्यांनाच तुम्ही हे विचारायला पाहिजे असं मला वाटतं, कारण मला तरी गेल्या ४० वर्षांमध्ये काहीच वेगळं जाणवलेलं नाहीये, मी मला हवं असतं तेच करतो एवढंच आहे.”
मिलिंद सोमण यांना त्यांचा फिटनेसचा मंत्र आणि दिनचर्येबद्दल विचारल्यानंतर ते म्हणाले, “माझा कुठलाही डेली रूटीन नसतो. माझा कोणी कोच नाहीये, ट्रेनर नाहीये किंवा इतर कोणीही नाहीये, जे मला सांगतील की काय काय केलं पाहिजे. माझा डाएट प्लॅन नाहीये, मी जीमला जात नाही, त्यामुळे असं कुठलं रूटीन नाहीये. माझ्यासाठी आयुष्य जगणं महत्त्वाचं आहे आणि आता उपलब्ध असलेल्या माहितीमुळे सगळ्यांना माहीत आहे की काय त्यांच्यासाठी चांगलं आहे, काय नाही. काय कधी खाल्लं पाहिजे, व्यायाम वगैरे याबद्दल सगळ्यांना माहीत असतं, त्यामुळे या गोष्टी नियमितपणे करणं महत्त्वाचं असतं, त्याचा तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो.”
मिलिंद पुढे म्हणाले, “तुम्हाला लोक काय करत आहेत यापेक्षा स्वत:ला समजून घेण्याची गरज आहे, ही गोष्ट अनुभवातूनच कळते. मी दुसऱ्यांना शिकवायला जात नाही. फक्त स्वत:ला एक आवाहन द्या, ज्यामधून तुम्हाला तुमच्याबद्दलच्या काही गोष्टी कळतील. तुमचं शरीर आणि डोकं कसं काम करतं हे कळलं की तुमच्यासाठी गोष्टी सोप्या होतात आणि आरोग्य चांगलं राहतं.”
मिलिंद यांची पत्नी अंकिता कोणवार हिनं पुढे सांगितलं की, स्वत:बरोबर निदान २०-२५ मिनिटं घालवल्यानंतही खूप चांगला परिणाम होतो. ती म्हणाली, “कुठलंही गाणं न ऐकता किंवा कोणाचीही सोबत न घेता एकट्यानं निदान २०-२५ मिनिटं जरी रोज धावलात तरी त्याचा खूप चांगला परिणाम होतो. हळू हळू सुरुवात करा, नंतर त्याची सवय होते.”
