Video: “माझ्या लग्नाची तारीख आहे सोळा…”; आठवलेंचा उखाणा ऐकून भावोजी झाले लोटपोट

त्यांचा हा मजेशीर उखाणा ऐकून बांदेकर भावोजींनाही हसू आवरले नाही.

फोटो – झी मराठी/ इन्स्टाग्राम

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणजे ‘होम मिनिस्टर’. गेली १७ वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहे. रोजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनातून महिलांना थोडीशी उसंत मिळावी, त्यांचं मनोरंजन व्हावं यासाठी हा कार्यक्रम सुरु करण्यात आला. विशेष म्हणजे १७ वर्षांपासून सुरु असलेल्या या कार्यक्रमाची लोकप्रियता तसूभरदेखील कमी झालेली नाही. त्यातच या कार्यक्रमात वेगवेगळे डाव रंगत असतात. सध्या या कार्यक्रमात दिवाळी विशेष भाग सुरु आहे. याच विशेष भागात महाराष्ट्राचे एक लाडके व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या सौ हजेरी लावणार आहे.

नुकतंच झी मराठीने ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमातील दिवाळी विशेष भागाचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत रवी जाधव आणि त्यांच्या पत्नी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे येत्या आठवड्यातील या कार्यक्रमातील विशेष भागात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि त्यांच्या पत्नी हजेरी लावणार आहेत. रामदास आठवले व त्यांच्या पत्नी हे दोघेही या आठवड्यात खास पाहुणे असणार आहे. यावेळी आदेश बांदेकर हे आठवले कुटुंबासोबत आणि त्यांच्या ‘होम मिनिस्टर’सोबत गप्पा मारताना दिसणार आहेत.

होम मिनिस्टर कार्यक्रमात लिटिल चॅम्प्स साकारणार महत्वाची भूमिका

झी मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोत रामदास आठवले हे त्यांच्या शैलीत कविता करताना दिसत आहेत. यावेळी आदेश बांदेकरांनी आठवलेंना त्यांच्या लग्नाची तारीख विचारली. त्यावेळी आठवलेंनी तारीख सांगतच एक मजेशीर उखाणा घेतला. “माझ्या लग्नाची तारीख आहे सोळा, म्हणून हिच्यावर होता माझा डोळा”, असा हटके उखाणा रामदास आठवले यांनी घेतला. त्यांचा हा मजेशीर उखाणा ऐकून बांदेकर भावोजींनाही हसू आवरले नाही.

दरम्यान आठवले कुटुंबियांसोबत रंगलेला होम मिनिस्टरचा हा विशेष भाग येत्या शुक्रवारी १२ आणि शनिवारी १३ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या दरम्यान कोणकोणत्या गमतीजमती होतात? आठवले त्यांच्या पत्नीला पैठणी मिळवून देण्यात यशस्वी ठरतात की नाही? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Minister ramdas athawale and his wife diwali special aadesh bandekar home minister episode video viral nrp