‘फ्रेशर्स’ या मालिकेतली सायली ही भूमिका साकारणारी मिताली मयेकर हिने तिच्या भूमिकेद्वारे आजच्या युथवर एक प्रकारची मोहिनीच टाकली आहे. आजची तरुणाई सायलीच्या प्रेमात आहे. आपली प्रियसीही सायली सारखीच सुंदर, हुशार आणि बिनधास्त असावी. तिच्याबरोबर आपल्याला बऱ्याच गोष्टी शेअर करता आल्या पाहिजेत अशा काहीशा कल्पनांमध्ये आजची तरुणाई स्वप्न बघत आहे. तिच्या चाहत्यांची संख्यासुद्धा दिवसें दिवस वाढत आहे. गेल्या वर्षात झी युवावरील ‘फ्रेशर्स’ या नव्या मालिकेमुळे तिने अनेक चाहते कमावले.

आता २०१६ गेले आणि २०१७ चे नवीन वर्ष सुरु झाले. गेल्या वर्षभरात आपण काय कमावले आणि काय गमावले याचा प्रत्येक जण विचार करत असतो. नवीन वर्षात नवनवीन संकल्प करत असतो. मितालीनेसुद्धा गेल्या वर्षाच्या सुरुवातीला असे बरेच संकल्प केले होते. त्यातील काही पूर्ण झाले आणि काही अपूर्ण राहिले. पण तिच्या आयुष्यातील एक गोष्ट मात्र कायम आहे आणि ते म्हणजे तिचे मोमोज. वाट्टेल ते होऊ दे, जग इकडचं तिकडे होऊ दे, पण दिवसभरात मिताली कमीत कमी एकदा तरी मोमोज खातेच. फ्रेशर्सच्या सेटवरही तिला खाण्यासाठी मुद्दाम मोमोज आणले जातात.

‘फ्रेशर्स’मधली सायली ही व्यक्तिरेखा मस्ती करणारी असली तरी तेवढीच समंजसही आहे. पण मोमोज पाहिल्यानंतर मितालीचे जे हावभाव असतात ते पाहिल्यावर मात्र बाकी फ्रेशर्सना हिच का ती सायली असा प्रश्न पडतो. मिताली मोमोजसाठी पूर्णपणे वेडी आहे. या संदर्भात मितालीला विचारले असता ती म्हणाली, ‘मोमो चीनमध्येही सर्वत्र आवडीने खाल्ला जाणारा आणि चीनी खाद्यसंस्कृतीची खासियत म्हणून मिळणारा पदार्थ आहे. वेगवेगळ्या सामिश व भाज्यांचे सारण घालून केलेले व वेगवेगळ्या आकारांचे १५-२० किंवा त्यापेक्षा जास्तच प्रकार मिळतात. मोमोज हा पदार्थ आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीतला आद्य समजला जाणाऱ्या, मोदकासारखा दिसणारा असल्याने मोमोजला पाहताचक्षणी मोदकाची आठवण येते.’

‘मोमोज तर मी चीनी मोदक म्हणत पटापट गट्टम करते. शाकाहारी मोमोजमध्ये शिमला मिरची, कोबी, गाजर, पनीर, तिळाचे तेल, काळी मिरची, लाल मिरची, हिरवी मिरची, अद्रक, सोया सॉस, कोथिंबीर असे बरेच काही असते जे माझ्या काय पण तुमच्या पण तोंडाला पाणी सोडेल. असे म्हणतात कि मांसाहारी मोमोजची मजाच काही वेगळी आहे पण मी पूर्णपणे शाकाहारी असल्याने मला शाकाहारी मोमोज आवडतात. आमच्या ठाण्यामध्ये फक्त एक मोमोजचे हॉटेल आहे मी तिथे नेहमीच मोमोजसाठी जाते.’ शिवाय फ्रेशर्स मालिकेमुळे सध्या मला तिथे स्पेशल ‘फ्रेशर्स’ सूटही मिळते. मोमोज बद्दलचे मितालीचे ज्ञान आणि तिची आवड लक्षात घेता जर सायलीचा नंबर १ चाहता बनायचे असेल तर मितालीला काय आवडतं ते लक्षात आले ना?