बालिवूडचे डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची तयारी करत आहे. ‘बॅड बॉय’ हा त्याचा पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटासाठी त्याला बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने प्रोत्साहन दिलं होतं. नमाशीसाठी सलमान वडिलांसारखा आहे. तो नसता तर कदाचित त्याचे फिल्मी करिअर कधी सुरु झालेच नसते.

कोईमोई या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत नमाशीने आपल्या पहिल्या चित्रपटाबाबत गप्पा मारल्या. या मुलाखतीत त्याने सलमानची तोंड भरुन स्तुती केली. तो म्हणाला, “खरं तर मला अभिनयात गती नव्हती. माझ्या बाबांप्रमाणे मी उत्तम डान्सर देखील नाही. त्यामुळे चित्रपटात मला कोण काम देणार? असा मी विचार करायचो. परंतु सलमानने मला प्रोत्साहन दिलं. ‘बॅड बॉय’ या चित्रपटात काम करण्यासाठी प्रवृत्त केलं. सलमान माझ्या वडिलांसारखा आहे. तो माझ्यासाठी एक आदर्श व्यक्तीमत्व आहे. प्रतिकूल परिस्थीतीत तो कायम माझ्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिलाय.”

सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांनी ‘बॅड बॉय’चं पोस्टर शेअर करुन या आगामी चित्रपटाबाबत प्रेक्षकांना माहिती दिली. या चित्रपटात नमाशीसोबत अभिनेत्री अमरिन कुरेशी देखील झळकणार आहे. राजकुमार संतोशी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होईल.