नेत्रसुखद प्रेमकथा

प्रेमकथापट म्हटले की मराठी चित्रपटात हिंदी चित्रपटांमध्ये हमखास यशस्वी ठरलेला संगीतमय प्रेमकथेचा फॉम्र्यूला वापरला की चित्रपट यशस्वी असे गणित बांधले जाते.

प्रेमकथापट म्हटले की मराठी चित्रपटात हिंदी चित्रपटांमध्ये हमखास यशस्वी ठरलेला संगीतमय प्रेमकथेचा फॉम्र्यूला वापरला की चित्रपट यशस्वी असे गणित बांधले जाते. हे गणित ‘मितवा’ या चित्रपटातही असले तरी त्यापलीकडे जाऊन नातेसंबंधांमधली व्यामिश्रता दाखविण्याचा उत्तम प्रयत्न करीत प्रेमकथा सरधोपट होणार नाही याची खबरदारी घेत दिग्दर्शिकेने  चित्रपट केला आहे. चित्रपटाच्या कथानकातील शेवटच्या rv14१५-२० मिनिटांचा भाग नसता तरी चित्रपट अपेक्षित परिणाम साधू शकला असता हेही नमूद केले पाहिजे. प्रेमत्रिकोणाच्या रूढ चौकटीबाहेरचा हा प्रेमकथापट आहे. ‘व्हॅलेण्टाइन डे’च्या निमित्ताने मनोरंजन करणारा मराठी प्रेमकथापट प्रेक्षकांसमोर आला असेही म्हणता येईल.
ती आणि तो, वेगवेगळ्या सामाजिक-सांस्कृतिक पाश्र्वभूमीचे, अचानक भेट, पाहताक्षणी तो तिच्या प्रेमात पडतो अशीच प्रेक्षकांनी बऱ्याच वेळा पडद्यावर पाहिलेली प्रेमकथा इथेही आहेच. ‘व्हॅलेण्टाइन डे’च्या निमित्ताने कॉलेजवयीन तरुणाईला आवडेल असे ‘पॅकेजिंग’ या चित्रपटासाठी तयार करण्यात आले आहे. हेही मान्य केले तरी चित्रपटात व्यक्तिरेखांच्या निरनिराळ्या छटा, अनवट अव्यक्त प्रेमाची झालर कथानकाला देण्यात आल्यामुळे चित्रपट करमणूक करण्यात निश्चितपणे यशस्वी ठरतो.
तो म्हणजे शिवम सारंग मोठा उद्योगपती, साखळी हॉटेलांचा मालक आणि त्याची सेक्रेटरी-मैत्रीण तसेच त्याची ‘केअर टेकर’ असलेली अवनी, त्यांचे मोकळे नाते चित्रपटाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या मनावर ठसते. ‘बडे बाप का बेटा’ असल्यामुळे शिवम सारंग कायम स्वत:वरच फिदा, त्याच्यावर तरुणी फिदा वगैरे आहेच. तरुणींशी ‘फ्लर्ट’ करण्याचाही नाद शिवमला आहे. प्रेम म्हणजे सब झूठ, प्रेम-‘कमिटमेंट.’
अचानक एक दिवस इंटरव्ह्य़ूच्या निमित्ताने नंदिनी शिवम सारंगला भेटते, त्याच्याकडे नोकरी मागते. तिला नोकरी देण्यास नकार देऊनही शिवम सारंग नंदिनीला नोकरीवर ठेवतो. कारण पाहताक्षणी तो तिच्या प्रेमात पडलाय. अवनी-शिवम, शिवम-नंदिनी या नात्यांबरोबरच नंदिनीचा भूतकाळ असे कथानकात ‘ट्विस्ट’असे सारे काही चित्रपटात आहे.
सुरुवातीपासून कथानकाची मांडणी करताना व्यक्तिरेखांची ओळख प्रेक्षकांना करून देणे, सुरुवातीपासून वातावरण हलकेफुलके ठेवून एका विशिष्ट व्यापक दृष्टिकोनातून दिग्दर्शिकेने चित्रपटाची मांडणी केली आहे. त्याला पाश्र्वसंगीताची अपेक्षित असलेली जोड नेमक्या पद्धतीने देत नाटय़ खुलवत नेण्याचा उत्तम प्रयत्न दिग्दर्शिकेने केला आहे. सुंदर चित्रीकरणस्थळे, हॉटेल उद्योगपती असल्यामुळे चित्रपटात निवडलेली हॉटेल्स आणि नेत्रसुखद चित्रण या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत.
प्रेमकथा आणि संगीत याची परंपरा हिंदी चित्रपटात आहे. त्याच परंपरेतील परंतु बऱ्याच कालावधीनंतर लक्षात राहतील अशी दोन प्रेमगीते आणि काहीसे भडक परंतु श्रवणीय चालींचे संगीत याची उत्तम जोड लाभल्यामुळे हा मितवा खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतो.
चित्रपटाने उत्कर्षबिंदू गाठला असे वाटत असतानाच प्रेक्षकाच्या अंदाजाला छेद देत दिग्दर्शिकेने त्यापुढे जाऊन केलेला चित्रपटाचा शेवट चित्रपटाच्या एकूण परिणामाला मारक ठरतो. शेवटच्या पंधरा-वीस मिनिटांच्या चित्रीकरणाचे संकलन केले असते तर ही प्रेमकहाणी लांबलचक वाटली नसती.
‘लव्हस्टोरीचा हिरो’ ही प्रतिमा स्वप्निल जोशीने आपल्या अभिनयातून चांगली जपली आहे. सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे यांनीही अनुक्रमे नंदिनी आणि अवनी या भूमिकांद्वारे उत्तम साथ स्वप्निल जोशीला दिली आहे. पात्रनिवड, मांडणी यासाठी दिग्दर्शिकेला गुण द्यावे लागतील. त्याचबरोबर नेत्रसुखद चित्रचौकटींसाठी छायालेखकाचाही मोठा वाटा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात आहे.

व्हिडीओ पॅलेस प्रस्तुत
मितवा
निर्माते – मीनाक्षी सागर प्रॉडक्शन्स
कथा -दिग्दर्शिका-स्वप्ना वाघमारे जोशी
पटकथा-संवाद-शिरीष लाटकर
छायालेखक-प्रसाद भेंडे
संगीत-शंकर एहसान लॉय, नीलेश मोहरीर, अमितराज, पंकज पडघन
संकलन-क्षितिजा खंडागळे
कलावंत-स्वप्निल जोशी, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे, ईला भाटे, संग्राम साळवी, अरुणा इराणी व अन्य.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mitwa marathi movie review