मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताने मराठी चित्रपट, मालिका, वेबसीरिज या तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं आहे. शिवाय ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमासाठी करत असलेलं सुत्रसंचालनही प्रेक्षकांना खूप आवडतं. अभिनय, नृत्य, कविता यानंतर प्राजक्ताने एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. नुकताच तिने स्वतःचा ज्वेलरी ब्रँड सुरु केला आहे. यासाठी तिने एक खास सोहळा आयोजित केला होता या सोहळ्याला राज ठाकरे त्यांच्या पत्नीसह उपस्थित होते.
राज ठाकरे यांनी प्राजक्ताच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि ते आपल्या भाषणात असं म्हणाले, “तुम्हाला समजले असेल मी बायकोला का घेऊन आलो आहे. प्राजक्ता यांनी मला फोन करून या उपक्रमाबद्दल सांगितलं, तेव्हा मी माझ्या पत्नीला सांगितले की, तू पण माझ्याबरोबर चल, मराठी संस्कृतीशी संबंधित असल्याने साहजिकच मी येणार, पण दागिने आणि माझा काही संबंध नाही म्हणून पत्नीबरोबर असणे गरजेचे आहे. मराठी संस्कृतीत अनेक गोष्टी मागे चालल्या आहेत. मी प्राजक्ता माळीचे आभार मानतो. त्यांनी या लोप पावलेल्या गोष्टी महाराष्ट्रापुढे आणल्या. त्या दागिन्यांनादेखील प्राजक्ता नावाचा ब्रँड हवा होता. आपल्याकडच्या अनेक गोष्टी आपण विसरलेलो आहोत.”
प्राजक्ता माळीने सुरु केला ज्वेलरी ब्रँड; उद्घाटनाला मनसे प्रमुख राज ठाकरेंची विशेष उपस्थिती
ते पुढे म्हणाले, “नुकताच मी पुण्यात होतो तेव्हा माझ्या एका शाखा अध्यक्षाने एक तुळशी वृंदावन, पाटा वरवंटा, अनेक छोट्या मोठ्या वस्तू भेट म्हणून दिल्या. मला स्वतःला जात कळत, मला जात समजत नाही, मी जात बघत नाही. प्रत्येक जातीत काहीतरी वैशिष्ट्य असतात ती जपणे म्हणजे मराठी संस्कृती जपणे.” त्यांच्या भाषणात त्यांनी मराठी संस्कृतीचे, मंदिरांचे दाखले दिले आहेत.
आज ६ जानेवारी रोजी हा सोहळा मुंबईत पार पडला. या ब्रँड लाँच सोहळ्याला राज ठाकरेंच्या बरोबरीने त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे, इतिहासकार विश्वास पाटील आणि प्राजक्ताचा मित्रपरिवार उपस्थित होता.