बॉलिवूडच्या ‘एम. एस. धोनी- अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाच्या मराठी भाषेतील प्रदर्शनाला महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने (मनसे) विरोध जोरदार विरोध दर्शविला आहे. हिंदी चित्रपट अशाप्रकारे मराठी भाषेत डब झाल्यास मराठी चित्रपटांना स्पर्धेचा सामना करावा लागेल. त्यामुळे ‘एम. एस. धोनी- अनटोल्ड स्टोरी’ मराठीत प्रदर्शित होऊन देणार नाही, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. आमचा हिंदी भाषेतील ‘एम. एस. धोनी- अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटाला विरोध नाही. मराठी माणसांना हिंदी कळते, ते हिंदी चित्रपट बघायला जातात. त्यामुळे हिंदी चित्रपट मराठी भाषेत प्रदर्शित करण्याची गरज नाही. अगोदरच मराठी चित्रपटांना प्राईम टाईम शो मिळण्यात अडचण येते. त्यामध्ये आता हिंदी चित्रपट मराठीत प्रदर्शित व्हायला लागल्यास मराठी चित्रपटांनी आणि कलाकारांनी काय करायचे, असा सवाल मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे ‘एम. एस. धोनी- अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तर आम्ही त्याविरोधात आंदोलन करू, असा इशारा अमेय खोपकर यांच्याकडून देण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयाच्या निर्णयावर टीकेची झोड उठवत दहीहंडीच्या प्रचलित उत्सवामागे ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता मनसे चित्रपट सेनेकडून घेण्यात आलेला पवित्रा पाहता महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसे पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा उचलून धरताना दिसत आहे.
सध्या प्रमोशनचे बदलते वारे पाहता हिंदीचे बडे निर्माते मराठीकडे फार लक्ष ठेवून आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कप्तान म्हणून लौकिक मिळवणाऱ्या महेंद्रसिंग धोनी याचा चरित्रपट सर्वदूर पोहोचावा म्हणून तो हिंदीबरोबर तमिळ, तेलुगू आणि मराठी भाषेत प्रदर्शित करण्यात येणार आहे. धोनीचे चाहते देशभर आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषेत या चित्रपटाची माहिती पोहोचावी यासाठी हे खास प्रयत्न केले जात आहेत. तमिळमध्ये ट्रेलर प्रदर्शित करण्याचा अट्टहास समजू शकतो. कारण नाही म्हटले तरी धोनीने आयपीएलमध्ये आठ वर्षे ‘चेन्नई सुपरकिंग्ज’ टीमचे प्रतिनिधित्व केलेले आहे. मात्र मराठीत हा ट्रेलर प्रदर्शित करण्यामागचे प्रयोजन समजू शकलेले नाही. यानिमित्ताने पहिल्यांदाच एका मोठय़ा हिंदी चित्रपटाचा ट्रेलर मराठीत प्रदर्शित होणार हेही नसे थोडके. सुशांत सिंग राजपूतने या चित्रपटात धोनीची भूमिका केली आहे.