दिग्दर्शक करण जोहर आणि महेश भट्ट मनसेच्या निशाण्यावर, ‘रईस’च्या नव्या नायिकेचा शोध सुरु?

‘ऐ दिल है मुश्कील’ आणि ‘रईस’चित्रपटावरील बंदी ‘इम्पा’ने शिथिल केली होती.

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अनेय खोपकर (छााचित्र सौजन्य-एएनआय वत्तसंस्था)

पाकिस्तानी कलाकारांविरोधात आक्रमक पवित्रा घेणाऱ्या मनसेने हिंदी दिग्दर्शक महेश भट्ट आणि करण जोहर यांना धमकी वजा इशारा दिला आहे. मनसेच्या विरोधानंतरही महेश भट्ट आणि करण जोहर यांनी चित्रपट प्रदर्शित केल्यास त्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी प्रतिक्रिया मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिली. महेश भट्ट आणि करण जोहर योग्य प्रतिसाद देत नसल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. रईस चित्रपटातील अभिनेत्री माहिरा खान हिला बदलण्याचा निर्णय दिग्दर्शकांनी घेतला तर आम्ही त्यांच्या निर्णयाचे स्वागत करु, असा पुनरुच्चार करत खोपकर यांनी पाकिस्तानी कलाकाराविरोधात ठाम असल्याचे सांगितले.
शाहरूख खानची मुख्य भुमिका असणाऱ्या रईसमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिची भूमिका आहे. सध्या पाकिस्तान कलाकारांविषयीचा रोष पहाता या चित्रपटातून माहिराला डच्चू देण्यात आल्याचे वृत्त देखील मिळत असून नवीन नायिकेचा शोध सुरु असल्याचे सूत्रांकडून समजते.
जम्मू काश्मीरमधील उरी लष्करी तळावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेने पाकिस्तानी कलाकारांवर आक्षेप घेतला होता. मनसेच्या विरोधानंतर पाकिस्तानी कलाकारांना हिंदी चित्रपटांमध्ये काम देऊ नये, असा निर्णय ‘इम्पा’नेही घेतला. मात्र आता जे चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहेत त्यांच्यावरील बंदीची भूमिका ‘इम्पा’ने शिथिल केली होती. त्यामुळे ‘ऐ दिल है मुश्कील’ आणि ‘रईस’ या दोन्ही चित्रपटांमध्ये निर्मात्यांची मोठी आर्थिक हानी टळणार होती. त्यांचे नुकसान टाळण्यासाठी हे दोन चित्रपट प्रदर्शित होऊ द्यावेत, अशी विनंती ‘इम्पा’चे अध्यक्ष टी. पी. अगरवाल यांनी मनसेकडे केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mns warns film makers mahesh bhatt johar about working with pak artists

ताज्या बातम्या