एकेकाळी अवघ्या ४० रुपये महिना पगारावर शारीरिक शिक्षणचे शिक्षक म्हणून काम करणारे दिग्गज अभिनेते मोहन बाबू आज तेलगू चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक आहेत. मोहन बाबू सध्या हैदराबादमधील जलपल्ली इथे तब्बल १० एकरमध्ये पसरलेल्या विस्तीर्ण बंगल्यात राहतात. एखाद्या लक्झरी रिसॉर्टसारख्या डिझाईन केलेल्या या घराजवळ सुंदर लॉन, एक इन्फिनिटी पूल, अवॉर्ड गॅलरी, प्रायव्हेट होम थिएटर आणि शेतजमीन आहे. पण एक काळ असा होता जेव्हा त्यांच्याकडे घालण्यासाठी फक्त एकच जोड कपडे होते आणि एका वेळच्या जेवणासाठीही त्यांना मोठा संघर्ष करावा लागायचा.

‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या जुन्या दिवसांची आठवण सांगितली. “माझे वडील शिक्षक होते आणि मीही शिक्षक होतो. मी वर्षभर विद्यार्थ्यांना शिकवलं. माझ्या वडिलांनी मला शिस्त शिकवली. पण माझ्यात एकच कमतरता आहे, ती म्हणजे माझा स्पष्टवक्तेपणा. मला खूप लवकर राग येतो.”

मोहन बाबू पुढे म्हणाले, “मी एका कार शेडमध्ये राहिलो आहे. त्याचं भाडं ३० रुपये होतं. तिथे ना टॉयलेट होतं ना बाथरूम. त्या काळात मी घरी आलो, नाही आलो कोणालाही फरक पडायचा नाही. मी खूप संघर्ष करत होतो. मी ५५ वर्षांहून अधिक काळ काम करतोय. पण असेही दिवस होते जेव्हा मला एका वेळचं जेवणही परवडत नव्हतं. मी फक्त पाणी प्यायचो आणि झोपून जायचो. मी आयुष्यात प्रचंड हाल अपेष्टा सहन केल्या आहेत.”

मोहन बाबू यांच्या आलिशान घराची आतून झलक

मोहन बाबू यांची मुलगी आणि अभिनेत्री लक्ष्मी मंचू हिने तिच्या यूट्यूब चॅनेलवर म्हणाली, “हे माझ्या वडिलांचं सहावं घर आहे. त्यांनी चेन्नईमध्ये दोन, तिरुपतीमध्ये दोन आणि हैदराबादमध्ये दोन घरं बांधली आहेत.”

या घरामध्ये अनेक सुंदर पेंटिंग्स, कौटुंबिक फोटो आणि मोहन बाबू यांच्यासह त्यांची मुलं, लक्ष्मी मंचू, विष्णू मंचू आणि मनोज मंचू यांच्या जुन्या आठवणी पाहायला मिळतात. त्यांच्या घराच्या भव्य लिव्हिंग रूममध्ये एक मोठा पाण्याचा कारंजा आहे. तसेच भिंतीवर कलाकार सचिन जलतारे यांनी रेखाटलेले शिव-पार्वतीचे एक मोठे आणि आकर्षक पेंटिंग आहे. मोहन बाबू यांच्या या घरात एक डिजिटल लॉक असलेला खासगी बारदेखील आहे.

superstar Mohan Babu luxury house inside photos
एकेकाळी पीटी टीचर असणारे दाक्षिणात्य सुपरस्टार मोहन बाबू आज राहतात १० एकरच्या आलिशान बंगल्यात (फोटो- कर्ली टेल्स युट्यूब)

जेवणासाठी असलेले काचेचे डायनिंग टेबल अतिशय सुंदर असून तिथून बाहेरचे हिरवेगार बगीचे दिसतात. बरेचदा तिथे मोर फिरताना दिसतात. घराच्या तळघरात फक्त खेळण्यांसाठी एक खास खोली आहे. इथे मोहन बाबू यांनी मुलांची बालपणीची खेळणी जपून ठेवली आहेत. त्यांची नातवंडे त्या खोलीतच खेळतात. तिथेच एक मोठा हॉल आहे. तिथे चित्रपटांच्या कथांवर चर्चा होते, त्याचबरोबर डान्स रिहर्सल आणि कौटुंबिक कार्यक्रम होतात. इथे या कुटुंबातील प्रत्येकाला मिळालेल्या ट्रॉफी आणि पुरस्कार ठेवलेले आहेत.

या मालमत्तेत २० हून अधिक लोक बसू शकतील, एवढे खासगी होम थिएटर, स्टीम रूम आणि डीव्हीडी ठेवण्यासाठी एक स्वतंत्र खोली आहे. घराच्या गच्चीवर एक सुंदर स्विमिंग पूल आहे, तर मोहन बाबू यांच्या बेडरूममधून आजूबाजूच्या जंगल आणि निसर्गरम्य दृश्य दिसते. इथे त्यांची शेती देखील आहे. इथे ते काकडी, टोमॅटो व इतर भाज्या पिकवतात.

शिक्षक ते सुपरस्टार बनण्याचा प्रवास

मोहन बाबू यांना वडिलांमुळेच अभिनयक्षेत्रात येण्याची प्रेरणा मिळाली. “माझे वडील रंगभूमीवर काम करायचे. त्यांना पाहूनच माझ्या मनात अभिनयाची आवड निर्माण झाली. मी जेव्हा दहावीत होतो, तेव्हा माझ्या वडिलांना वर्तमानपत्रात ‘अभिनेते हवे आहेत’ अशी एक जाहिरात दिसली. त्यासाठी ५० रुपये खर्चून आम्ही अर्ज केला होता. तेव्हा माझ्या वडिलांची महिन्याची कमाई फक्त १८० रुपये होती. त्या काळात मी पीटी टीचर म्हणून काम करत होतो आणि मला महिन्याला फक्त ४० रुपये मिळायचे,” असं मोहन बाबू म्हणाले.

गेल्या काही दशकांत मोहन बाबू यांनी अभिनयाबरोबरच एक मोठं शैक्षणिक साम्राज्यही उभारलंय. त्यांच्या मालकीची एक शाळा आणि विद्यापीठ आहे, तसेच त्यांच्या बंगल्यावर सुमारे २५ कर्मचारी कार्यरत आहेत.

मोहन बाबू यांच्या घरात पाळले जातात ‘हे’ कडक नियम

घर अतिशय आलिशान असले तरी मोहन बाबू यांच्या आयुष्यात शिस्त खूप महत्त्वाची आहे. त्यांच्या घरात दोन नियम अतिशय काटेकोरपणे पाळले जातात. पहिले म्हणजे घरात कुठेही चपला-बूट घालण्यास मनाई आहे, आणि दुसरे म्हणजे जेवताना कोणीही बोलायचं नाही. तसेच मोहन बाबू त्यांची सकाळची पूजा कधीही चुकवत नाहीत. त्यांची मुलगी लक्ष्मी मंचू म्हणाली, “त्यांना अगदी ताप आला असेल, तरीही ते न चुकता आंघोळ करतात, भगवे कपडे परिधान करून आणि त्यांची सकाळची पूजा पूर्ण करतात.”

आपल्या दिनचर्येबद्दल मोहन बाबू म्हणाले, “आमच्या घरात आम्ही केळीच्या पानावर जेवतो, कारण ते पवित्र मानले जाते. सकाळचा नाश्ता ७:३० ते ८ च्या दरम्यान झालाच पाहिजे. तर दुपारचं जेवण १२:४५ ते १ च्या दरम्यान झालं पाहिजे, त्याहून उशीर झाल्यास मी जेवतच नाही.”