Mohanlal reviews Ajay Devgn Drishyam 3: बॉलीवूड अभिनेता अजय देवगणचा ‘दृश्यम ३’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. सिनेमा रिलीज झाल्यापासूनच हिंदी की मल्याळम, कोणता दृश्यम ३ जास्त चांगला आहे? अशी चर्चा सुरू होती. अशातच आता मूळ मल्याळम ‘दृश्यम’चे मुख्य अभिनेते मोहनलाल यांनी अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’ (Drishyam: The Conclusion) बद्दल दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मोहनलाल अजय देवगणच्या दृश्यम ३ बद्दल म्हणाले…

“मी दृश्यम द कन्क्लुजन पाहिला आणि ज्या पद्धतीने या अत्यंत सुंदर प्रवासाचा शेवट केला आहे, ते पाहून मी प्रभावित झालो. इतक्या उत्तम पद्धतीने हा चित्रपट केल्याबद्दल दिग्दर्शक अभिषेक पाठक, निर्माते कुमार मंगत पाठक व अजय देवगणसह संपूर्ण टीमचं अभिनंदन,” असं मोहनलाल म्हणाले.

मूळ मल्याळम सिनेमाचा रिमेक आहे अजय देवगणचा दृश्यम

जीतू जोसेफ यांच्या मूळ मल्याळम दृश्यममध्ये मोहनलाल मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाचा पहिला भाग २०१३ मध्ये आला होता. चित्रपट हिट झाल्यानंतर २०१५ मध्ये त्याचा दृश्यम याच नावाने हिंदी रिमेक तयार करण्यात आला. हिंदी दृश्यमचं दिग्दर्शन दिवंगत निशिकांत कामत यांनी केलं होतं. त्यानंतर दृश्यमचे हिंदी व मल्याळम दोन्ही भाषांमध्ये ३-३ भाग आले. निशिकांत कामत यांच्या निधनानंतर हिंदी दृश्यम २ व ३ चं दिग्दर्शन अभिषेक पाठकने केलं.

मल्याळम दृश्यम ३ यावर्षी मे महिन्यात रिलीज झाला होता. तर अजय देवगणचा दृश्यम ३ चित्रपटातील अत्यंत महत्त्वाची तारीख २ ऑक्टोबरला रिलीज झाला. मोहनलाल यांच्या चित्रपटाचा शेवट पाहता त्याचा चौथा भाग येण्याची शक्यता आहे. पण हिंदी दृश्यमच्या निर्मात्यांनी ‘दृश्यम: द कन्क्लुजन’ हा या फ्रेंचायझीचा शेवटचा चित्रपट असल्याची घोषणा केली आहे.

दृश्यम 3 बॉक्स ऑफिस कलेक्शन

या चित्रपटात तब्बू, श्रिया सरन, जयदीप अहलावत, रजत कपूर, प्रकाश राज, इशिता दत्ता हे कलाकार आहेत. दृश्यम ३ ने जगभरात ४७९.८० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. दृश्यम ३ २०२६ मधील सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे. भारतात या चित्रपटाने ३०९ कोटींचे कलेक्शन केले. दुसरीकडे मोहनलाल यांच्या दृश्यम ३ ने जगभरात २३९.८३ कोटी तर भारतात ११०.४९ कोटींची कमाई केली होती.