२०२५ च्या महाकुंभमेळ्यात रुद्राक्ष माळा विकताना लोकप्रिय झालेली तरुणी मोनालिसा भोसले हिने आंतरधर्मीय लग्न केलं. मोनालिसाने तिचा बॉयफ्रेंड फरमान खान याच्याशी केरळमधील एका मंदिरात पोलीस सुरक्षा घेऊन हिंदू पद्धतीने लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नाला कुटुंबियांचा विरोध होता, त्यामुळे तिने घरापासून लांब केरळ गाठलं. ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो पोस्ट करतेय.

मोनालिसाने इन्स्टाग्रामवर पती फरमानबरोबरचा हनिमूनचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत दोघेही समुद्रकिनारी उभे आहेत. या फोटोमध्ये ती समुद्रकिनाऱ्यावर मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहे. या पोस्टला तिने ‘फरमान खानबरोबर केरळमध्ये एंजॉय करताना’ असं कॅप्शन दिलं आहे.

फोटोमध्ये मोनालिसाने काळ्या आणि क्रीम रंगाचा शर्ट परिधान केला असून, त्यावर ग्रे रंगाची पँट घातली आहे. तिचे केस ओले दिसत आहेत. तसेच, तिच्या मनगटावर एक ब्रेसलेटही दिसून येत आहे. दुसरीकडे, फरमान जीन्स व बनियनमध्ये दिसतोय. तोही भिजलेला आहे.

पाहा मोनालिसा व फरमान खान यांचा फोटो

दरम्यान, मोनालिसाच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असून सातत्याने तिचे व फरमानचे लग्नाचे फोटो पोस्ट करतेय. तिचे इन्स्टाग्रामवर पावणेदोन लाख फॉलोअर्स आहेत.

मंदिरात केलं मोनालिसाने लग्न

मोनालिसा आणि फरमान खान यांनी ११ मार्च २०२६ रोजी केरळमधील तिरुवनंतपुरम येथील अरुमन्नूर श्री नयनार देवा मंदिरात लग्न केलं. त्यांनी पूर्णपणे हिंदू रीतिरिवाजांनुसार लग्न केलं. लग्नावेळी मोनालिसाने लाल रंगाची साडी, तर फरमानने पांढरा शर्ट आणि मुंडू (केरळची पारंपारिक वेशभूषा) असा पोषाख परिधान केला होता. या लग्नानंतर सोशल मीडियावर ‘लव्ह जिहाद’च्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, १२ मार्च २०२६ रोजी पत्रकार परिषद घेत या जोडप्याने सर्व आरोप फेटाळून लावले. मोनालिसाने सांगितलं की तिने धर्मांतर न करता त्याच्याशी लग्न केलंय.

मोनालिसाच्या कुटुंबाचा लग्नाला विरोध

मोनालिसाचे वडील या लग्नाच्या विरोधात होते. मोनालिसाने आरोप केला होता की तिचे वडील तिचे लग्न तिच्या आत्याच्या मुलाशी लावून देणार होते. पण तिचं फरमानवर प्रेम होतं, त्यामुळे तिला ते लग्न मान्य नव्हतं. लग्नापूर्वी मोनालिसा आणि फरमान यांनी केरळ पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली होती. मोनालिसा १८ वर्षांची आहे, सज्ञान आहे, त्यामुळे तिला स्वतःचा जोडीदार निवडण्याचा अधिकार असल्याचे पोलिसांनी सांगितले.