२०२५ च्या प्रयागराज महाकुंभ मेळ्यात रुद्राक्ष माळा विकणारी मोनालिसा भोसले नावाची तरुणी व्हायरल झाली होती. व्हायरल व्हिडीओनंतर मोनालिसाला एका चित्रपटाची ऑफर मिळाली होती. जवळपास वर्षभरापासून सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत असलेली मोनालिसा भोसले हिने तिचा प्रियकर फरमान खान याच्याशी आंतरधर्मीय लग्न केलं आहे. या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. मोनालिसाच्या कुटुंबाची या लग्नाबद्दल प्रतिक्रिया आली आहे.
मोनालिसाच्या लग्नामुळे तिच्या कुटुंबातील सदस्य अजिबात खूश नाहीत. मोनालिसाला ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकवण्यात आलंय, असं तिच्या काकांनी म्हटलंय.
‘आमच्या मुलीला न्याय द्या’
मोनालिसाच्या लग्नाबाबत तिचे काका विजल भोसले म्हणाले, “आमच्या मुलीला ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवण्यात आलंय. तिला धमकावण्यात आलं असावं, कारण आमच्या समाजात आजवर कोणत्याही मुलीने दुसऱ्या समाजात लग्न केलेलं नाही. आमच्या मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी आम्ही सरकारकडे करणार आहोत.”
महेश्वरचे समाजसेवक मनोज पाटीदार म्हणाले, “हे कुटुंब बऱ्याच काळापासून इथे राहत आहे. ते शिकलेले नाहीत. देशाच्या गद्दारांनी या तरुणीला लव्ह जिहादमध्ये अडकवलं आहे. आमच्या महेश्वरच्या मुलीवर अन्याय झाला असून तिची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी आम्ही पंतप्रधानांकडे संबंधित लोकांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत.”
मोनालिसा आंतरधर्मीय लग्नाबद्दल काय म्हणाली?
मोनालिसाने ‘लव्ह जिहाद’च्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, “हे लव्ह जिहाद नाही. हे लग्न हिंदू रितीरिवाजांनुसार झाले आहे. माझ्या घरचे या लग्नासाठी तयार नव्हते, पण मलाच फरमानशी लग्न करायचं होतं. लोक याला लव्ह जिहाद म्हणत आहेत, तसं काहीही नाही. लग्नासाठी आम्हा दोघांपैकी कोणीही धर्म बदललेला नाही.”

फरमान खान लग्नाबद्दल म्हणाला…
मोनालिसाचा पती फरमान म्हणाला, “मी मोनालिसावर प्रेम करतो. आमच्यासाठी सर्व धर्म सारखेच आहेत. आम्ही कलाकार आहोत आणि कलाकाराचा कोणताही धर्म नसतो. लग्नासाठी आम्हा दोघांपैकी कोणालाही धर्म बदलण्याची गरज भासली नाही.”
मोनालिसा आणि फरमान खान यांचा विवाह ११ मार्च २०२६ रोजी केरळमधील तिरुवनंतपुरमजवळील अरुमानूर श्री नैनार देवा मंदिरात पार पडला. हा एक आंतरधर्मीय विवाह असून तो हिंदू रितीरिवाजांनुसार पार पडला. फरमान खान हा स्वतः एक अभिनेता आणि मॉडेल आहे. त्यांची पहिली भेट एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. गेल्या सहा महिन्यांपासून ते एकमेकांना डेट करत होते.
या लग्नाला मोनालिसाच्या कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता. त्यांच्या मते मोनालिसाने त्यांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न करावे. यामुळे तिला घरातून दबाव होता. अखेर मोनालिसा आणि फरमानने केरळमधील थम्पानूर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संरक्षणाची मागणी केली. मोनालिसा आता १८ वर्षांची असल्याने तिला स्वतःच्या पसंतीने जगण्याचा अधिकार आहे, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आणि त्यानंतर या जोडप्याने मंदिरात जाऊन लग्न केलं.
