Monalisa Bhosle and Farman Khan Kerala marriage controversy : प्रयागराज महाकुंभमेळ्यात व्हायरल झालेली ‘व्हायरल गर्ल’ मोनालिसा भोसले सध्या तिच्या आंतरधर्मीय लग्नामुळे चर्चेत आहे. तिने फरमान खान याच्याशी केरळमध्ये लग्न केलं. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी फरमानवर गंभीर आरोप केले आहेत. आता या प्रकरणावर ‘द डायरी ऑफ मणिपूर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी मोठे विधान केले आहे. हे लग्न म्हणजे लव्ह जिहाद आहे, असं त्यांनी म्हटलंय.

सनोज मिश्रा यांनी ‘आयएएनएस’शी बोलताना या लग्नावरून केरळ सरकारला टोला लगावला. “फरमान आणि मोनालिसा नक्कीच केरळ सरकारचे आभार मानत असतील, कारण केरळने अशा मुलाला त्यांचा जावई बनवलं आहे. केरळमधून सुमारे दीड हजार मुलींना परदेशात पाठवण्यात आलं आहे. त्यांना विमानाने नाही, तर कंटेनरमध्ये भरून पाठवलं गेलंय. इतकंच नाही तर दिल्ली आणि मध्य प्रदेशातूनही मुली गायब होत आहेत. जर सरकार आणि तपास यंत्रणांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली, तर त्याचे धागेदोरे केरळशी जोडलेले आढळतील,” असा दावा मिश्रा यांनी केला आहे.

मोनालिसा-फरमानचं लग्न लव्ह जिहाद – सनोज मिश्रा

दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी पुढे दावा केला की, “जेव्हा सीएएविरोधात आंदोलनं सुरू होती, तेव्हा फरमान खानला शाहीन बागमध्ये शरजील इमामबरोबर अनेकदा दिसला होता. या प्रकरणात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा (PFI) हात आहे, असं दाखवणाऱ्या अनेक गोष्टी पाहायला मिळतात.”

Award Banner

सनोज मिश्रा फरमान खानबद्दल म्हणाले…

सनोज मिश्रा यांनी दावा केलाय की फरमान खान हा अभिनेता नाही आणि त्याचा कोणताही चित्रपट रिलीज झालेला नाही. चित्रपटाच्या नावावर फक्त पूजा करणं किंवा पोस्टर रिलीज करणं, या गोष्टी ही घटना घडवून आणण्यासाठी केल्या गेल्या. सनोज मिश्रांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती केली आहे. हा केवळ मोनालिसाचा नाही, तर संपूर्ण देशातील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, असं ते म्हणाले.

मोनालिसाचा पती बागपतचा रहिवासी

मोनालिसा आणि फरमान खानच्या लग्नाबद्दल सनोज म्हणाले, “हे लग्न म्हणजे लव्ह-जिहाद आहे. फरमान मूळचा बागपतचा रहिवासी असून त्याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. त्याचे वडील जोडे शिवण्याचं काम करतात. त्याने केरळमध्ये जाऊन लग्न केलं. केरळ लव्ह-जिहादचे मोठे केंद्र बनले आहे. केरळ हे डाव्या विचारसरणीचे केंद्र असून ते वर्षानुवर्षे सनातन धर्माच्या विरोधात आहेत. ‘द केरळ स्टोरी’सारखे चित्रपट केरळमधील हेच सत्य दाखवतात.”