चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेत्री सार्वजनिक जीवनात महिला सबलीकरणाच्या बाता मारत असल्या तरी खासगी जीवनात मात्र त्यापैकी अनेकांची अवस्था घरातील मोलकरणींपेक्षा वाईट असते, असे ज्येष्ठ चित्रपट निर्माते महेश भट यांनी सांगितले. टेलिव्हिजनवरील ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येनंतर व्यवसायिक जीवनात यशाच्या शिखरावर असणाऱ्या महिलांच्या आत्महत्येचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मनोरंजन विश्वातील एखाद्या व्यक्तीला त्याला मिळणाऱ्या यशाइतकेच भावनिक स्वातंत्र्य असेलच असे नाही. हीच खरी शोकांतिका आहे. मला एकेकाळी वाटायचे की, आर्थिक सक्षमतेमुळे महिला त्यांच्या पतीच्या जाचातून मुक्त होतील.
‘राहुलशी मैत्री केल्याचा पश्चाताप!’ 
मनोरंजन विश्वात मी अनेक अशा अभिनेत्री पाहिल्या आहेत की, ज्या महिला सबलीकरण आणि अन्य मुद्द्यांवर प्रभावीपणे बोलतील. मात्र, वैयक्तिक जीवनात त्यांना एखाद्या घरकामगारापेक्षाही जास्त अत्याचार सहन करावे लागतात, असे भट यांनी सांगितले. ज्या महिलांना पतीकडून मारहाण केली जाते त्यांच्या भावनांवर पूर्णपणे पुरूषांचे नियंत्रण असते. हे पुरूष त्यांच्या भावनांशी खेळतात. ते रात्री महिलांना मारतात आणि दुसऱ्या दिवशी गुडघ्यावर बसून त्यांची माफी मागतात. त्यामुळे त्या पुरूषाला आपल्या कृत्याची शरम आहे, असा महिलांचा समज होतो. मात्र, यामध्ये महिलांची काहीही चूक नाही. कदाचित एकटेपणाच्या भयामुळे अभिनेत्री अत्याचार सहन करत असाव्यात, असे भट यांनी सांगितले.