गेल्या महिन्यामध्ये ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शनावरून देशभर सिनेमाबाह्य़ वर्तुळात जी राळ उठली, त्यात इतर अनेक छोटे-मोठे सिनेवाद झाकोळले गेले. त्यातला एक वाद होता तो ‘बासमती ब्लूज’ या चित्रपटाच्या समाजमाध्यमांत पसरलेल्या अल्पांशावरून (ट्रेलर). भारतीयांच्या बालिशपणाचे किंवा बालिश भारतीयांच्या चित्रीकरणाचे उत्तम उदाहरण असल्याचे  नमूद करून ट्विटरखोरांनी चित्रपटावर आणि त्यातल्या प्रमुख अभिनेत्री असलेल्या ब्री लार्सनवर लेखनसुख घेतले. चित्रपटाची गंमत अशी की तो २०१२ साली चित्रित झाला तेव्हा ब्री लार्सन हिची ओळख  बालकलाकारापलीकडे नव्हती. टोनी कोलेट हिच्या गाजलेल्या ‘युनायटेड स्टेट्स ऑफ टॅरा’ या टीव्ही मालिकेत मुलीची भूमिका वठविणारी ही अभिनेत्री जोसेफ गॉर्डन लेव्हिटच्या ‘डॉन जॉन’ चित्रपटात सेक्स अ‍ॅडिक्ट भावाच्या जगभरातील कारनाम्यांमध्ये मुकी नसूनही कुटुंबात पूर्ण चित्रपटभर गमतीशीर संवादशून्य काम करून टाळ्या मिळवून गेली. त्यानंतर तिच्या अभिनयाचा आलेख  ‘द रूम’ चित्रपटासाठीच्या ऑस्कर पारितोषिकाने स्पष्ट केला. मात्र यशशिखरावर नसतानाच्या काळात तयार झालेला बासमती ब्लूज चित्रगृहात प्रदर्शित होण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी जावा लागला. चित्रपटाच्या मुखपृष्ठापासून ट्रेलपर्यंत लार्सनच्या ऑस्कर विजयाच्या मुद्दय़ाला अधोरेखित करण्यात आले असले, तरी ट्रेलरमधल्या गमतींनी किंवा गेल्या महिन्यातील एकूणच सिनेविरोधाच्या वातावरणामध्ये ‘भारताची प्रतिमा’ वगैरे या नेहमीच्या मुद्दय़ावर समाजमाध्यमात गदारोळ उडाला.

आठ ऑस्कर पटकावणाऱ्या ‘स्लमडॉग मिलिऑनेर’उत्तर कालखंडात जगभरच्या चित्रसृष्टीतील चित्रकर्त्यांना भारतात सिनेमा बनवून डॅनी बॉएल होण्याचे वेध लागले. त्यात ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिकेचे कित्येक दिग्दर्शक आहेत. भारतावरचा चित्रपट बनवायचा म्हटल्यावर इथल्या संस्कृतीचे परदेशस्थ नजरेला दिसणाऱ्या नवलाईने खच्चून भरलेल्या गोष्टी त्यात येतातच. बदलता भारत, इथली स्मार्ट शहरे, स्मार्ट माणसे आणि ग्लोकल वातावरण यांचा गंध सोडून मग अशा चित्रपटांमध्ये साठच्या दशकातील संस्कारी, आदर्शवादी, मूल्योत्कट कथाघटक-पात्रघटक घुसविले जातात. भारतीय सिनेमाचा आत्मा वाटेल त्या ठिकाणी वाजणाऱ्या गाण्यांमध्ये असल्याच्या अपसमजामुळे बॉलीवूड बीट्स(म्हणजे पंजाबी भंगडाच फक्त) त्यात आणले जातात. संपूर्ण टूथपेस्ट एकाच दिवशी वापरल्यामुळे शुभ्र लखलखीत दातांच्या व्यक्तींची साखळी  चित्रपटांत असते आणि चित्रपटात मिठासारखे प्रेमत्रिकोणाला स्थान असते. ‘बासमती ब्लूज’च्या ट्रेलरमध्ये आक्षेपार्ह काहीच नाही. योग्य वितरण यंत्रणा आणि जाहिरातबाजीचे तंत्र अवगत असते, तर हा चित्रपट महोत्सव वर्तुळात गाजला असता. भारतीय प्रेक्षकांमध्ये ‘भारताचे अचूक दर्शन’ असल्याचे बिंबवता आले असते. कारण या चित्रपटामध्ये कधीकाळी हीट फॉम्र्युला असल्यासारखा हलका-फुलका प्रेमत्रिकोण आहे. हलकी-फुलकी गाणी आहेत. हलकी-फुलकी पटकथा-अभिनय असे सारे काही आहे. यातील सारे भारतीय शेतकरी तर्खडकर इंग्रजी व्याकरणमाला कोळून प्यायले असल्याने सुस्पष्ट इंग्रजीत बोलतात, त्यांची मुले दिवसातल्या फावल्या वेळात शास्त्रीय नृत्य शिकतात आणि रात्रीच्या वेळी आधुनिक पोशाखात डिस्कोथेकमध्ये मागल्या दाराने मोफत शिरून पाश्चात्त्य नृत्यशैलीचा अभ्यास करतात. एकूणच भारतीय नव्या शेतकरी पिढीच्या नृत्यलालसेचा ‘अचूक’ धांडोळा या चित्रपटात बहुधा घेण्यात आला आहे. किंवा कदाचित ते विद्यमान राज्यकर्त्यांच्या स्वप्नातील स्मार्ट खेडय़ांच्या स्मार्ट लोकांचे चित्रपटीय सत्यात साकारलेले रूप असावे. ही शेकडो हिंदी अभिजात सिनेमांमधून परिचयाची असलेली गोष्ट नव्या शब्दांत सांगायची म्हटले तर, चित्रपटामध्ये लिंडा (ब्री लार्सन) ही अमेरिकी कृषी वैज्ञानिक ‘मोगल’ नामक आंतरराष्ट्रीय तांदूळ कंपनीत काम करते. ईस्ट इंडिया कंपनीला दिसले तसे या कंपनीच्या मालकाला भारतातील बाजारपेठेतील व्यापार दिसून येतो. मग इथल्या भात शेतकऱ्यांना जनुकीय बदल केलेले वाण पिकविण्याच्या सक्तीसाठी लिंडाला फसवून पाठविले जाते. आपल्या संशोधनामुळे घराचा शेजारही जायला नापसंती दर्शविणारी आणि पासपोर्ट काढण्याचीही तसदी न घेणारी लिंडा कंपनी मालकाच्या आग्रहावरून भारतात पोहोचते. दक्षिणेतल्या भात उत्पादक प्रदेशात शेतकऱ्यांचा तिच्यावर विश्वास बसण्याआधी तिचा इथल्या रजत नावाच्या गावातल्या छोऱ्यावर (उत्कर्ष अंबुदकर) विश्वास बसू लागतो. म्हणजे तिला गावात शहरी आणि परदेशी शिष्टाचार अवगत असलेला अतिस्मार्ट छोराही  (साहील सहगल) पर्याय म्हणून दत्त असतो. आपल्या प्रयोगशाळेतील भाताच्या वाणाला पिकवून कंपनीचे मनसुबे पूर्ण करण्याच्या वेळेत लिंडा ही रजतसोबत भारतीय संस्कृतीचे आकलन आणि दर्शन प्रेक्षकांना घडविते. दरम्यान कथानक कंपनीच्या वाईट हेतूंना लिंडापर्यंत पोहोचवते. तोवर अवघड परिस्थिती तयार होते. गावच्या छोऱ्याला खल प्रवृत्तीचे लोक बंदी बनवितात. मग लिंडामधील नारीशक्ती जागी होते आणि ती एकेकाळच्या भारतीय सिनेमातील अँग्री यंग मॅनची कार्यप्रणाली राबवते.

कालबाह्य़ झालेल्या फॉम्र्युल्याची आजच्या संभ्रमकाळात कशी हास्यास्पद अंमलबजावणी घडू शकते, याचे भारतीय दर्शन घडविणाऱ्या या चित्रपटामध्ये दिग्दर्शक डॅन बरून यांनी वास्तवाची खूप धमाल उडवून दिली आहे. दक्षिणेकडे  ट्रेनच्या टपावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची अतिशयोक्त संख्या, इतक्या मोठय़ा कंपनीच्या चालकाला ट्रेन चालविण्याचे असलेले उपजत ज्ञान आणि डझनभर गोष्टींमुळे हा सिनेमा डॅनी बॉयलचा स्लमडॉग मिलिऑनेर होता होता कसा राहिला आहे, हे अनुभवण्यासाठी हा चित्रपट आवर्जून पाहायला हवा. चित्रपटाच्या प्रदर्शनावरून होणाऱ्या नाहक वादंग काळात असले चित्रपट डोके हलके-फुलके करण्यास उपयुक्त ठरू शकतील. या भातकारणाच्या ‘बासमती ब्लूज’मध्ये ब्री लार्सनने जीव ओतलेली भूमिका तसेही फार निराश करणार नाही.