गेल्या बऱ्याच दिवसांपासून ‘डिअर जिंदगी’च्या नावाखाली विविध पोस्ट्स, हॅशटॅग आणि बहुविध चर्चांना उधाण येत होते. प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रत्येकाच्या तोंडातून निदान एकदातरी ‘लव्ह यू जिंदगी’ हे उद्गार बाहेर पडले. बॉलिवूडमध्ये अॅक्शन, थरार, विनोदीपटांना प्राधान्य देणाऱ्या चित्रपटांच्या गर्दीमध्ये ‘डिअर जिंदगी’च्या निमित्ताने दिग्दर्शिका गौरी शिंदेने आलिया भट्ट आणि शाहरुख खानच्या साथीने प्रेक्षकांच्या मनाचा चांगलाच ठाव घेतल्याचे पाहायला मिळत आहे. पण, हा ठाव घेत असतानाच गौरीच्या हातून काही गोष्टी निसटल्याचे लक्षात येत आहे.
प्रेम, प्रेमभंग, पुन्हा प्रेम आणि पुन्हा प्रेमभंग, मग ढासळलेलं मानसिक स्वास्थ्य, त्यातूनच होणारी चिडचीड या लहानसहान गोष्टी दिग्दर्शिकेने चांगल्याच निरीक्षण करुन या चित्रपटामध्ये प्रभावी दृश्यांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपट पाहताना काही दृश्यांमध्ये तेच मुद्दे पुन्हा पुन्हा समोर येत आहेत. एका नवोदित सिनेमॅटोग्राफरच्या भूमिकेत पडद्यावर आलेल्या आलियाला पाहिल्यावर तिने साकारलेली ‘कायरा’ अनेकांच्याच मनात घर करते. ‘कायरा’, तिची स्वप्न, तिचं राहणीमान आणि सर्वात महत्त्वाचा तिचा अॅटीट्युड अनेकांनाच भावतो. मैत्रिणींसोबत ब्रेकअपवरुन विसंगत चर्चा करणाऱ्या कायराला पाहिलं की, सुरुवातीला ‘क्या बात है…असा अॅटीट्युड हवा’ असं वाटतं. गौरी शिंदेने तिच्या अनुभवाचा वापर करत या चित्रपटामध्ये आलियाच्या आणि इतर पात्रांच्या रुपावरही चांगलेच लक्ष दिल्याचे दिसते. या चित्रपटातून आलिया एक स्टाईल आयकॉन म्हणून पुन्हा एकदा अनेक अभिनेत्रींना मागे सोडेल असंच वाटत आहे.




चित्रपटातील संवाद हे काही प्रमाणात त्याची जमेची बाजू ठरणारे आहेत. सरळ साधी वाक्य, त्यात जास्त काही अलंकारिकपणा नसला तरीही ती वाक्य तितकीच महत्त्वाची आहेत याची अनुभूती चित्रपट पाहताना होते. अभिनेता शाहरुख खान आणि आलिया भट्टमध्ये असणारी ऑनस्क्रिन ‘नॉन रोमॅण्टीक केमिस्र्टी’ अनेकांचेच लक्ष वेधत आहे. शाहरुखने साकारलेलं ‘जहांगीर खान’ हे पात्र जणू त्याच्यासाठीच बनलं आहे. शाहरुखने साकारलेली ही भूमिका पाहताना किंग खानच्या वाढत्या वयाचीही अनुभूती होते हे खरे. एक समजूतदार आणि अनुभवी व्यक्ती म्हणून चित्रपटातील ‘जहांगीर’ म्हणजेच ‘जग’ त्याच्या वक्तव्यांतून सर्वांनाच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
या चित्रपटामध्ये दाखविण्यात आलेली दृश्ये नेत्रसुख देणारी आहेत. जीवनात समोर येणाऱ्या पेचप्रसंगांकडे एका वेगळ्या दृष्टीकोनाने पाहायला शिकवण्यासाठी हा चित्रपट नक्कीच मदत करणारा ठरु शकतो. पण, आपल्या रोजच्या जीवनातही असा एखादा ‘जग’, अशी एखादी ‘कायरा’ असतेच, त्यामुळे मग चित्रपटात वेगळेपण काय? असा प्रश्न पडतो. एका क्षणानंतर मात्र बरंच काही सांगण्याच्या उद्देशाने चित्रपट जास्तच लांबत आहे असेही वाटू लागते. चित्रपटाचे एकंदर पार्श्वसंगीत, छायांकन, संवाद आणि त्याला शाहरुख आणि आलियाच्या अभिनयाची जोड महत्त्वाची आहे. या चित्रपटामध्ये आलियाच्या अभिनयानेही अनेकांचे लक्ष वेधले आहे. त्यासोबतच अभिनेता कुणाल कपूर (रघुवेंद्र), अंगद बेदी (सि़ड) आणि त्यानंतर अली जफर (रुमी) यांच्या आलियाच्या जीवनात येण्याने आणि जाण्याने तिच्यावर होणारे मानसिक परिणाम तिच्या अभिनयातून झळकत आहेत. पण, काही वेळा हे भाव उगाचच व्यक्त केल्यासारखे वाटत आहेत. ‘उडता पंजाब’ या चित्रपटातून दमदार अभिनय सादर करत आलिया दिवसेंदिवस तिचे अभिनय कौशल्य खुलवताना दिसतेय. चित्रपटामध्ये सहाय्यक कलाकारांनीही चांगल्या भूमिका बजावल्या आहेत. अभिनेता कुणाल कपूरचा ‘रॉ’ लूक सोशल मीडियावर येत्या काही दिवसांमध्ये चर्चेत आला तर यात आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही.
‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटातून थेट विषयाला हात घालत रोजच्याच जीवनातील एका दुर्लक्षित कथानकावर मोजक्या वेळात गौरीने सुरेख भाष्य केलं होतं. पण, ‘डिअर जिंदगी’च्या बाबतीतलं गणित सोडवताना तिने सुत्र नीट मांडली, मांडणीही नीट केली पण शेवटच्या पायरीला काहीतरी बिनसलं आणि गणित चुकलं असच दिसत आहे.
- दिग्दर्शिका- गौरी शिंदे
- निर्माते- गौरी खान, करण जोहर, गौरी शिंदे
- संगीतकार- अमित त्रिवेदी
सायली पाटील
ट्विटर- @sayalipatil910
sayali.patil@indianexpress.com