scorecardresearch

चित्रनगरीः त्रिकुटाची धमाल ‘पोश्टर बॉईज’

‘दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं’ ही चित्रपटाची टॅगलाईन असली तरी तुम्ही हा चित्रपट पाहून तुमची फसगत होणार नाही याची पुरेपूर काळजी श्रेयसने घेतली आहे.

चित्रनगरीः त्रिकुटाची धमाल ‘पोश्टर बॉईज’

लोकसंख्या वाढ नियंत्रित करण्याची सर्वात प्रभावी पद्धत आहे ती म्हणजे नसबंदी. भारतात अत्यंत संवेदनशील असलेला असा हा विषय. एकीकडे नसबंदी करून घेणा-या पुरुषांकडे ते षंढच (जणू काही शिवीच) झाले असावेत अशा नजरेने पाहण्याची लोकांची मानसिकता असते. त्याच वेळी, स्त्रियांना मात्र दुष्परिणाम माहित असूनही अशाप्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी भाग पाडले जाते. जरा विचार करा, तुम्ही रस्त्यावरून चालत आहात आणि पुरुष नसबंदीच्या जाहिरातीवर तुमचे चेहरे झळकत आहेत मग काय होईल? पायाखालची जमीन सरकेल ना.. हेच घडले आहे जगन आबा, सदानंद आणि अर्जुनसोबत.

जगन देशमुख (दिलीप प्रभावळकर), सदानंद कुलकर्णी (ऋषिकेश जोशी) आणि अर्जुन (अनिकेत विश्वासराव) हे तिघेजण ग्रामीण भागात राहणारे सामान्य पुरुष आपापल्या सुखी जीवनात व्यस्त असतात. मात्र, आरोग्य मंत्रालयाने लावलेल्या पुरुष नसबंदीच्या जाहिरातीवर स्वतःचे फोटो पाहून या तिघांचे जीवन जणू तिथेच थांबते. या तिघांचे फोटो पोस्टरवर दिसल्यामुळे त्यांनी नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेतली आहे असा समज त्यांच्या कुटुंबांचा आणि गावक-यांचा होतो. या तीन सामान्य पुरुषांचा नसबंदीच्या जाहिरातीमुळे ‘पोश्टर बॉईज’ होऊन जातो. जगन आबांच्या मुलीचे लग्न तुटते, सदानंदची बायको त्याला घटस्फोटाची नोटीस देते, तर अर्जुनचे लग्नही ठरण्याआधीच मोडते. गावक-यांकडून तिघांचीही टर उडवण्यास सुरुवात होते. त्यानंतर हे तिघेही आपले फोटो सदर पोस्टरवर कसे आले याचा शोध घ्यायचं ठरवतात. यादरम्यान, त्यांना घरच्यांना सामोरं तर जावचं लागत. पण, स्वतःच्या हलगर्जीपणाचे खापर दुस-याच्या माथी मारणा-या ढिसाळ सरकारी कार्यपद्धतीलाही तोंड द्यावं लागतं. या तिघांचा हा सगळा प्रवास मनोरंजक पद्धतीने समीर पाटील यांनी दिग्दर्शित केला आहे.
एक चांगला चित्रपट बनवण्यासाठी काय महत्त्वाचे आहे? चित्रपटाचा विषय. दिग्दर्शक-लेखक समीर पाटीलनेही हेच केले. मात्र, प्रेक्षकांना हसविताना चित्रपटाचा विषय कुठेतरी मागे पडल्यासारखा वाटतो. लोकांना संदेश देता देता केवळ विनोदांवर समीर पाटीलने लक्ष्य केंद्रीत केल्यासारखे वाटते. चित्रपटाची कथा ही मजेशीर आणि विनोदी आहे. पण एक चांगली पटकथा होता होता राहिली. चित्रपटाचा विषय हा घडलेल्या घटनेवर आधारित आहे. त्यामुळे विषयाकडे कुठेतरी दुर्लक्ष्य झाल्यासारखे वाटते, असो. हल्ली लोकांना विषयापेक्षाही मनोरंजन जास्त महत्त्वाचे वाटते. त्या दृष्टीपटलात हा चित्रपट १०० टक्के उतरतो. चित्रपटाच्या सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत प्रेक्षकांना कसे खळखळून हसवता येईल याची पुरेपूर काळजी समीर पाटीलने कथा लिहताना घेतली आहे. विनोदांनी परिपूर्ण असा हा चित्रपट आहे. कुठेही ओढूनताणून अतिशयोक्ती करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केलेला नाही. त्यामुळे चित्रपट बघताना कंटाळा येत नाही. दिलीप प्रभावळकर यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की ते कोणतीही भूमिका अगदी सहजरित्या करू शकतात. एका नम्र शिक्षकाच्या भूमिकेत ऋषिकेशने धमाल उडवून दिली आहे. त्याची बोलण्याची विशेष ढब आणि अभिनय आपले लक्ष्य वेधतो. अनिकेतनेही या दोघांना तितकीच चांगली साथ दिली आहे. अभिनयातील दोन तगड्या कलाकारांसमोर अनिकेत थोडा कमी पडतो. पण चित्रपटातील त्याची चुकीची इंग्रजी बोलण्याची पद्धत भाव खाऊन जाते. चित्रपटात अभिनेत्रींच्या वाट्याला फार काही आलेलं नाही, त्यामुळे  पूजा सावंत आणि नेहा जोशी या केवळ चवीपुरत्याच राहतात. याव्यतिरिक्त सचिन-सुप्रिया पिळगावकर, फराह खान, रोहित शेट्टी आणि अनू मलिक हे बडे स्टारही चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत.
लेस्ली लुईसने पहिल्यांदा मराठी चित्रपटाला संगीत दिले आहे त्यामुळे त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. पण चित्रपटाचे मुख्य गाणे आणि सुरुवातीचे छोटेसे गाणे वगळता लेस्लीची जादू बाकीच्या गाण्यांमध्ये दिसत नाही. ‘सनई चौघडे’नंतर श्रेयसची निर्मिती असलेला हा दुसरा चित्रपट. तब्बल सहा वर्षे थांबल्यानंतर या चित्रपटाची निर्मिती केल्याचे फळ नक्कीच श्रेयसला मिळेल असे म्हणायला हरकत नाही. बॉलीवूडच्या तोडीचा विनोदी चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येण्याचा हा प्रयत्न असून त्यांचे निव्वळ मनोरंजन करण्याचा माझा उद्देश आहे, असे श्रेयस म्हणाला होता. त्याच्या या शब्दांना तो पुरेपुर जागला आहे. ‘दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं’ ही चित्रपटाची टॅगलाईन असली तरी तुम्ही हा चित्रपट पाहून तुमची फसगत होणार नाही याची पुरेपूर काळजी श्रेयसने घेतली आहे. त्यामुळे रितेशच्या ‘लय भारी’ला श्रेयसचा ‘पोश्टर बॉईज’ नक्कीच चांगली टक्कर देऊ शकेल अशी अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-08-2014 at 09:06 IST

संबंधित बातम्या