रेश्मा राईकवार

एकत्रित येऊन चित्रपट पाहणं हा आनंदसोहळा गेले काही महिने बंद आहे. करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून जिथे जिथे लोक मोठय़ा प्रमाणावर एकत्र येतात त्या जागांवर बंदी घालण्यात आली. चित्रपटगृहांना त्यामुळे पहिल्यांदा टाळे लागले. आता पाच महिने उलटून गेले तरी हे टाळे खुलण्याची काही चिन्हं दिसत नाहीत. गेल्या दोन महिन्यांत हळूहळू का होईना बंद पडलेल्या चित्रीकरणांना सुरुवात झाली आहे. चित्रपट निर्मितीच्या पूर्वतयारीपासून पोस्ट प्रॉडक्शनपर्यंतची कामंही आता वेग घेऊ लागली आहेत. मात्र ज्या चित्रपटगृहांच्या आधारे सत्तर एमएमच्या भव्य पडद्यावरची जादूई दुनिया प्रेक्षकांपर्यंत पोहोचते त्यांची दारे किमान सप्टेंबर महिन्यात तरी उघडतील ही आशाही फोल ठरली आहे. गेल्या पाच महिन्यात शून्य उत्पन्नावर टिकाव धरून असलेल्या चित्रपटगृहांना आता मात्र आर्थिक डोलारा डोईजड होऊ लागला आहे. एकपडदा चित्रपटगृहांपैकी काहींनी आपली दारे कायमची बंद के ली आहेत तर बहुपडदा चित्रपटगृह मालकांनाही अजून किती काळ नुकसानीचे छत्र ओढून मिरवायचे ही चिंता सतावू लागली आहे..

मनोरंजनविश्वाच्या इतिहासात पहिल्यांदाच चित्रपटगृहांची आर्थिक उलाढाल शून्यावर आली आहे. सुरुवातीला टाळेबंदी जसजशी शिथिल होत जाईल तसतशी चित्रपटगृहांवरची बंदीही उठवली जाईल, अशी अटकळ होती. त्यामुळे प्रदर्शन रखडलेले मोठमोठे चित्रपट दोन-तीन महिने वाट पाहतील आणि त्यानंतर चित्रपटगृहात रीतसर प्रदर्शित होतील, अशी सरळसाधी मांडणी प्रत्येकाच्याच मनात तयार होती. मात्र महिने पुढे सरकत गेले, टाळेबंदीही लांबली आणि चित्रपटगृहांवरची बंदीही कायम राहिली. तेव्हा मात्र हिंदीतील अनेक निर्मात्यांनी आपल्या रखडलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी ओटीटीचा मार्ग मोकळा केला. पाच महिन्यांपासून बंद असलेली चित्रपटगृहे, शून्य उत्पन्न, व्यस्त दुरुस्ती-देखभालीचा खर्च, दोन-तीन मोठय़ा बजेटचे चित्रपट वगळता अनेक चित्रपटांनी जाहीर केलेले ओटीटी प्रदर्शन या सगळ्या पार्श्वभूमीवर एकपडदा आणि बहुपडदा चित्रपटगृहांची नुकसानमालिका अधिकच विस्तारत चालली आहे. आयनॉक्स, पीव्हीआर, सिनेपोलिस, कार्निव्हल सिनेमा अशा मोठमोठय़ा बहुपडदा चित्रपटगृहांनाही या टाळेबंदीचा मोठा फटका बसला असून त्यांच्यासमोरच्या समस्यांचा पाढा वाढतच चालला आहे. मार्च महिन्यात टाळेबंदी झाल्यापासून ते आत्तापर्यंत एकटय़ा बॉलीवूडचे जवळपास १ हजार कोटींचे आर्थिक नुकसान झाले आहे. आत्तापर्यंत देशभरातील १० ते १२ टक्के  चित्रपटगृहे बंद पडली असल्याचा अंदाज ट्रेड विश्लेषक व्यक्त करतात. सप्टेंबर महिन्यात चित्रपटगृहे सुरू करण्याची परवानगी मिळाली नाही तर दिवाळी-नाताळच्या निमित्ताने होणारा व्यवसायही गमवावा लागेल, याची चिंता बहुपडदा चित्रपटगृह मालकांना सतावते आहे.

सध्या बहुपडदा चित्रपटगृह मालकांसमोरच्या समस्या या खूप गुंतागुंतीच्या असल्याचे मत ट्रेड विश्लेषक अतुल मोहन यांनी व्यक्त केले. गेले पाच महिने चित्रपटगृहे बंद असली तरी प्रॉपर्टीचे भाडे त्यांना भरावेच लागते. जोपर्यंत चित्रपटगृहे सुरू होणार नाहीत, तोवर आम्ही भाडे भरणार नाही, अशी भूमिका बहुपडदा चित्रपटगृह व्यावसायिकांनी घेतली आहे. सरकारने चित्रपटगृह सुरू करायला परवानगी दिली तरी त्यासाठीची जी मार्गदर्शक तत्त्वे आणि अटी आहेत त्या जाचक आहेत. मुळात चित्रपटगृहे सुरू झाली तरी ती ३०, ४० किंवा जास्तीत जास्त ५० टक्के  उपस्थितीत चालवावी लागणार आहेत. त्यामुळे उत्पन्नाचा आकडा आधीच कमी झाला आहे. शिवाय, चित्रपट सुरू असताना मध्यंतर देण्यात येऊ नये असाही एक नियम आहे. हा नियम लागू झाला तर खाण्यापिण्याच्या पदार्थाची विक्रीही बंद होईल. त्यामुळे त्याही उत्पन्नावर पाणी फिरणार आहे. याशिवाय, चित्रपटांच्या दोन खेळांमध्ये असणारी वेळेची मर्यादाही वाढवण्यात येणार असल्याने रोजच्या खेळांची संख्याही कमीच ठेवावी लागणार आहे. या नियमांमुळे जवळपास तोटय़ातच चित्रपटगृहांना आपली सुरुवात करावी लागणार असल्याने त्यांची कोंडी अधिकच वाढली असल्याचे मत अतुल मोहन यांनी व्यक्त के ले. ही कोंडी तेव्हाच फु टेल जेव्हा चित्रपटगृहे पुन्हा सुरू होतील, असे मत ‘कार्निव्हल सिनेमा’चे व्यवस्थापकीय संचालक पी. व्ही. सुनील यांनी व्यक्त के ले.

बहुपडदा चित्रपटगृहांना बसलेला आर्थिक फटका खूप मोठा आहे. के वळ व्यवसायाचे नुकसान नाही तर या व्यवसायावर अवलंबून असलेल्या २५ लाख लोकांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला असल्याचे पी. व्ही. सुनील यांनी सांगितले. चित्रपटगृह सुरू करायची परवानगी मिळाल्यानंतरही प्रेक्षक नेहमीसारखे चित्रपटगृहात येण्यासाठी आणि हा व्यवसाय स्थिरावण्यासाठी पुढचे आणखी तीन ते चार महिने वाट पाहावी लागणार आहे. सप्टेंबरमध्ये परवानगी मिळाली तर किमान दिवाळीत काहीएक उत्पन्नाची आशा आहे, पण निर्णय घेण्यास जर आणखी उशीर लागला तर उत्पन्नाचे हेही दिवस हातातून जातील. आणि जे काही तीन-चार मोठे चित्रपट प्रदर्शनासाठी थांबले आहेत तेही ओटीटीवर जातील, अशी भीती त्यांनी व्यक्त के ली. अनेक मोठय़ा कलाकारांचे हिंदी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत. ‘सूर्यवंशी’, ‘८३’, ‘कु ली नं. १’ असे तीन-चारच मोठे चित्रपट बहुपडदा चित्रपटगृहांक डे आहेत. त्याशिवाय, अन्य कु ठलेच चित्रपट उरले नसल्याने आठवडाभर आपल्या चित्रपटगृहातून काय दाखवायचे, हाही मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असल्याची माहिती अतुल मोहन यांनी दिली.

केंद्र सरकारने मॉलपासून अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे, मात्र चित्रपटगृहांक डे आत्तापर्यंत दुर्लक्षच के ले असल्याचे दिसून येत असल्याबद्दल पी. व्ही. सुनील यांनी खंत व्यक्त के ली. सध्या तरी चित्रपटगृहांना परवानगी कधी मिळणार यासाठी वाट पाहण्यावाचून आमच्या हातात काही नाही. सरकारच्या वेगवेगळ्या विभागांबरोबर आमचा या संदर्भात पाठपुरावा सुरू आहे. या आठवडय़ात केंद्रीय गृह मंत्रालयाबरोबर बैठक होणार असून काहीतरी दिशा मिळेल, असे त्यांनी सांगितले. सध्या कुठल्याही स्थितीत आणि कुठल्याही क्षमतेत चित्रपटगृह सुरू होणं ही तातडीची गरज असल्याचे मत चित्रपटगृह व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे.

* ८०० ते ९०० कोटींचाच व्यवसाय

मार्चमध्ये चित्रपटगृहांवर बंदी येण्यापूर्वी साडेसहाशे कोटींच्या आसपास आर्थिक उलाढाल झाली होती. आता दसरा-दिवाळीचा मुहूर्त गाठता आला तर किमान चारशे-पाचशे कोटींचा व्यवसाय होऊ शकेल. पण यावर्षी ८०० ते ९०० कोटींच्या पलीकडे व्यवसायाची गणितं जाणार नाहीत, अशी माहिती ट्रेड विश्लेषकांनी दिली.

* प्रादेशिक चित्रपट-हॉलीवूडपटांना महत्त्व

हिंदीतील अनेक मोठय़ा कलाकारांचे छोटे चित्रपट ओटीटीवर गेले असल्याने शर्मन जोशी, जिम्मी शेरगिल यांच्यासारख्या कलाकारांचे छोटे चित्रपट ज्यांना एरव्ही शो मिळत नाहीत, त्यांना या काळात बहुपडदा चित्रपटगृह मालकांकडून आमंत्रण दिले जाईल, असा अंदाज ट्रेड विश्लेषक व्यक्त करताना दिसतात. हॉलीवूडपटही मोठय़ा प्रमाणावर प्रदर्शित झालेले नाहीत, त्यामुळे या काळात मराठी, गुजराती, बंगाली, तेलुगु-तमिळ अशा प्रादेशिक चित्रपटांवर बहुपडदा चित्रपटगृह मालकांना अवलंबून राहावे लागणार असल्याचे मत अतुल मोहन यांनी व्यक्त के ले.

* ‘ड्राइव्ह इन थिएटर’ची संकल्पना अजूनही नवीनच

केंद्र सरकारने ‘ड्राइव्ह इन थिएटर’ सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी मुळात ही संकल्पना आपल्याकडे अजूनही नवीनच असल्याचे मत पी. व्ही. सुनील यांनी व्यक्त केले. तर आपल्याक डे या संकल्पनेतील थिएटर्स सुरू झाली, मात्र तीन-चार वर्षांतच ती बंद पडली, अशी माहिती ऑस्कर अकादमीचे सदस्य आणि तांत्रिक सल्लागार उज्ज्वल निरगुडकर यांनी दिली. ‘ड्राईव्ह इन थिएटर्स’ बंद पडण्याची कारणं वेगवेगळी आहेत. त्यासाठी लागणारी मोठी जागा इथपासून ते आता तशी थिएटर्स विकसित व्हायला पुढचे वर्ष उजाडेल त्यामुळे लगेचच त्याचा फायदा होऊ शकणार नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.