Ravi Kishan Daughter join Ishita Shukla Indian Army: अभिनेते आणि खासदार रवी किशन हे सध्या सोशल मीडियावर त्यांच्या विनोदी रील्स आणि मीम्समुळे प्रचंड चर्चेत आहेत. जगभरात त्यांच्या मीम्सवर कंटेंट तयार केला जात आहे. भारतात अनेक अभिनेते किंवा नेत्यांच्या मुलांनी आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्याच क्षेत्रात प्रवेश केलेला आहे. मात्र रवी किशन यांची मुलगी इशिता शुक्ला त्याला अपवाद ठरते. तिने मनोरंजन क्षेत्र किंवा राजकारणाची वाट न धरता देशाचे संरक्षण क्षेत्र निवडले आहे. त्यामुळे इशिताची ही माहिती बाहेर आल्यानंतर सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.
चित्रपटसृष्टीचे ग्लॅमर आणि सहज उपलब्ध असलेले स्टारडम नाकारत इशिताने थेट देशाच्या संरक्षण दलाची वाट निवडली आहे. ‘अग्निपथ’ योजनेच्या माध्यमातून ती भारतीय सैन्यदलात दाखल झाली आहे.
सिनेजगताऐवजी लष्कराचा गणवेश
अभिनेते रवी किशन यांची मुलगी असल्याने बॉलिवूड किंवा अभिनय क्षेत्रात पदार्पण करणे इशितासाठी सहज शक्य होते. मात्र लहानपणापासूनच कडक शिस्त, शारीरिक मेहनत आणि देशसेवेची आवड असलेल्या इशिताने ग्लॅमरस विश्वापेक्षा लष्कराचा गणवेश निवडला.
इशिता दिल्ली डायरेक्टरेटच्या ‘७ गर्ल्स बटालियन’ ची एनसीसी कॅडेट होती. जानेवारी २०२३ मध्ये कर्तव्यपथावर पार पडलेल्या प्रजासत्ताक दिन संचलनासाठी देशभरातील ६५९ महिला कॅडेट्समधून ज्या १४८ जणांची निवड झाली होती, त्यात इशिताचाही समावेश होता. यासाठी ती तीन वर्षांपासून कठोर सराव करत होती.
बॉलिवूडमधून कौतुकाचा वर्षाव
इशिताच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. एनसीसी कॅडेट म्हणून तिची निवड झाल्यानंतर रवी किशन यांनी अत्यंत अभिमानाने ही बातमी शेअर केली होती. त्यानंतर आता दिग्गज अभिनेते अनुपम खेर आणि आर. माधवन यांनीही सोशल मीडियावरून तिचे विशेष कौतुक केले आहे.
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर म्हणाले, “इशिताचा हा निर्णय देशसेवा करू इच्छिणाऱ्या कोट्यवधी तरुणींसाठी एक मोठा प्रेरणास्त्रोत आहे.”
आर. माधवन यांनीही इशिताच्या या निर्णयाला ‘खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि प्रेरणादायी निर्णय’ असे संबोधले आहे.
एकीकडे सोशल मीडियावर रवी किशन यांच्या जुन्या मुलाखती, अनोख्या शैलीतील संवाद आणि डान्स क्लिप्सचे लाखो मीम्स बनत आहेत. अगदी आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्लब्सही या ट्रेंडमध्ये सहभागी झाले आहेत. एकीकडे वडील इंटरनेटवर धुमाकूळ घालत असताना, दुसरीकडे त्यांची मुलगी अत्यंत शांतपणे, प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहून कठीण लष्करी प्रशिक्षण पूर्ण करत आहे. हा अनोखा विरोधाभास सध्या नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत आहे.
स्टार किडची वेगळी वाट
नेपोटीझम आणि ‘स्टार किड्स’च्या लाँचिंगच्या चर्चा रंगत असताना, इशिताने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सैन्याच्या गणवेशावर लागणाऱ्या नावाच्या पाटीपेक्षा तो गणवेश परिधान करणाऱ्या व्यक्तीची निष्ठा महत्त्वाची असते, हेच इशिताने आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.
