Sonpari Frooty Tanvi Hegde Updates : छोट्या पडद्यावरील ‘सोनपरी’ मालिका आठवतेय का? या मालिकेने बच्चे कंपनीचे चांगलंच मनोरंजन केले होते. ही मालिका पाहताना लहान मुलं टीव्हीसमोरून उठायचीच नाहीत. मालिका संपून अनेक वर्षे झाली असली तरी या मालिकेची लोकप्रियता काही कमी झालेली नाही.
मालिकांमधील बालकलाकार आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. अशीच एक लोकप्रिय बालकलाकार म्हणजे, तन्वी हेगडे. ‘सोनपरी’मध्ये तिने ‘फ्रुटी’ नावाची भूमिका साकारली होती.
अभिनेत्री तन्वी हेगडे आता किती वर्षांची आहे?
सोनपरी’मधली फ्रुटी म्हणजेच अभिनेत्री तन्वी हेगडे आता ३४ वर्षांची आहे. तन्वीने अभिनयापासून सध्या ब्रेक घेतला आहे. कामाच्या व्यापात राहून गेलेले बालपण ती पुन्हा जगत आहे. ती अनेक ठिकाणी प्रवास करत आहे. तसेच काही नवनवीन गोष्टी शिकत आहे.
२००० साली अवघ्या नऊ वर्षांची असताना तन्वी ‘सोनपरी’मध्ये झलकली होती. नंतर सहा वर्षे या मालिकेतून ती ‘फ्रुटी’ म्हणून घराघरांत लोकप्रिय झाली. पुढे अनेक मालिका, जाहिराती आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तिने अभिनयातून ब्रेक घेतला.
तन्वी हेगडेने सुरू केलेलं स्वत:चं यूट्यूब चॅनेल
२०२५ मध्ये तिने स्वतःचे यूट्यूब चॅनेल सुरू केले होते. यूट्यूबवरून तिने आपला प्रवास आणि स्वत:च्या आयुष्यातल्या काही अपडेट्स चाहत्यांबरोबर शेअर करण्यास सुरूवात केली होती. मात्र, चार व्हिडीओंनंतर तिने ते करणेही थांबवले.
तिच्या एका व्हिडीओमध्ये तिने सांगितलेले की, “जेव्हा ‘सोनपरी’चे शूटिंग सुरू झाले तेव्हा मी चौथीत होते आणि मालिका संपली तेव्हा मी दहावीत पोहोचले होते. माझे बालपण सेटवरच गेले. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून मी अभिनय करत असल्याने मला तेच आयुष्य माहिती होते.” तन्वीला अभ्यासाची प्रचंड ओढ होती. याबद्दल ती म्हणाली होती, “जेव्हा पडद्यावर फ्रुटी आणि अप्पी अभ्यास करताना दिसायचे, तेव्हा प्रत्यक्षातही मी माझा गृहपाठच करत असायचे.”
तन्वी हेगडेने अभिनयापासून घेतलाय ब्रेक
तन्वीने अभिनय पूर्णपणे सोडलेला नाही, तर तिने ठरवून काही काळ ब्रेक घेतला आहे. बालपण आणि कॉलेजचे दिवस कामात गेल्यामुळे शाळेतल्या सहली, मित्र-मैत्रिणींबरोबरच्या फिरणे आणि मजामस्ती यांसारख्या साध्या पण तितक्याच महत्त्वाच्या गोष्टींना ती मुकली होती. सध्या ती याच सगळ्याचा आनंद घेत आहे.
तन्वी हेगडने मराठी चित्रपटांत केलंय काम
टेलीव्हिजनवरील मालिका, तसेच काही लोकप्रिय जाहिरातींनंतर तन्वी काही चित्रपटांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली. ‘अथांग’, ‘शिवा’ आणि ‘धुरंधर भटावडेकर’ यांसारख्या मराठी चित्रपटांत तन्वी झळकली आहे. २०२१ मधील ‘अलिप्त’ हा तिचा शेवटचा चित्रपट होता.
‘सोनपरी’ फेम तन्वी हेगडे सध्या काय करतेय?
स्वतःला नव्याने ओळखण्यासाठी अभिनयातला ब्रेक तिला महत्त्वाचा ठरला आहे. कॅमेऱ्यापासून दूर राहून तन्वी आता वाचन, गेमिंग आणि प्रवासाचा आनंद घेत आहे. तिला फुटबॉल, संगीत आणि मोटरस्पोर्ट्समध्ये रस आहे. ती कोरियन बँड ‘BTS’ची चाहती आहे.
तन्वीला भाषांचीही आवड असून ती आठहून अधिक भाषा बोलते आणि सध्या स्पॅनिश शिकत आहे. तिला पुस्तके वाचायला खूप आवडतात. तिला गेमिंगचीही प्रचंड आवड असून तिच्याकडे स्वतःचा एक खास ‘गेमिंग कॉर्नर’ आहे.
