Mrunal Thakur : बॉलीवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मृणाला ठाकूरला ओळखलं जातं. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. टेलिव्हिजनमुळे मृणालला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली होती. छोटा पडदा गाजवल्यावर अभिनेत्री हळुहळू चित्रपटांकडे वळली. गेल्या काही वर्षात दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून मृणालकडे पाहिलं जातं.
‘हाय नाना’, ‘सीतारामम’, ‘द फॅमिली स्टार’ अशा गाजलेल्या साऊथ चित्रपटांमध्ये मृणालने काम केलंय. पण, आजही फार कमी लोकांना माहितीये की, साऊथ इंडस्ट्री गाजवणारी मृणाल ठाकूर ही मूळची धुळ्याची आहे. अभिनेत्री अनेकदा अहिराणी भाषेतून संवाद साधताना, मराठी मालिका पाहताना व्हिडीओ शेअर करत असते. तिने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत असलेला ‘Dacoit: A Love Story’ हा सिनेमा येत्या १० एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये मृणालसह प्रसिद्ध तेलुगू अभिनेता अदिवी शेष प्रमुख भूमिका साकारणार आहे. याच अभिनेत्याला मृणालने काही भन्नाट मराठी संवाद बोलायला सांगितले.
“ए चोमडी इकडे ये…ए कार्टे” हे वाक्य सुरुवातीला मृणालने अदिवी शेषकडून बोलून घेतलं. यानंतर मराठी मनोरंजनसृष्टीत सदाबहार ठरलेल्या “अशी ही बनवाबनवी…” सिनेमाचं गाणं तिने या अभिनेत्याला तिच्या मागोमाग गायला सांगितलं. शेवटी मृणालने सांगितल्याप्रमाणे अदिवी शेष “आचाऱ्याची बायको वेडी काय” हे गीत सुद्धा म्हणून दाखवत होता.
मृणालने शेअर केला भन्नाट व्हिडीओ
मृणाल आणि अदिवी शेष यांच्या मराठी शिकवणीचा हा गोड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अदिवी तेलुगू अभिनेता असूनही बऱ्यापैकी व्यवस्थित मराठी डायलॉग म्हणतोय हे पाहिल्यावर या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये मृणाल लिहिते, “ऐका हो मुलींनो…नवीन मराठी मुलगा अलर्ट”
दरम्यान, मृणालने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “आमची मराठी मुलगी…आपली भाषा शिकवतेय”, “वॉव मृणाल मॅम क्रेझी”, “हा व्हिडीओ किती गोड आहे”, “आम्हाला पण मराठी शिकवा मॅम”, “शेवटी धुळ्याची मुलगी”, “मस्त जमलंय” अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.
