Mukesh Khanna Angry Post On Samay Raina : कॉमेडियन समय रैना हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. समयने यूट्यूबवर ‘स्टिल अलाईव्ह’ या त्याच्या नवीन शोचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यातून त्याने त्याच्या गेल्यावर्षीच्या वादावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. या व्हिडीओत त्याने काही जणांवर टीकासुद्धा केली आहे.

गेल्यावर्षी ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. समयच्या या शोमुळे रणवीर, आशीष चंचलानी आणि अपूर्वा मुखिजा यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. त्यावेळी मुकेश खन्ना यांनीसुद्धा समयवर टीका केली होती. याच टीकेवर समयने त्याच्या ‘स्टिल अलाईव्ह’ व्हिडीओमधून मुकेश खन्ना यांना उत्तर दिलं.

समय रैनाने शोमध्ये शक्तिमान पाहून झालेल्या मुलांच्या मृत्यूला मुकेश खन्ना जबाबदार असल्याचे म्हटले होते. या विधानानंतर मुकेश खन्ना यांनी त्याला स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे. मुकेश यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.

मुकेश खन्ना यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एआय (AI) फोटो शेअर केला. यामध्ये समय रैनाचे तोंड काळे करून त्याला गाढवावर बसवलेले दिसत आहे. या फोटोसह लिहिलेल्या कॅप्शनमध्ये मुकेश खन्ना यांनी समयचा उल्लेख ‘श्वानाचे शेपूट’ असा केला असून ती कधीही सरळ होऊ शकत नाही, असेही म्हटले आहे.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलं आहे, “श्वानाचे शेपूट वाकडेच असते, तुम्ही ते शेपूट कितीही सरळ करण्याचा प्रयत्न करा, ते वाकडेच राहते. तसंच समय रैना कधीच सरळ होऊ शकत नाही. कारण तो काही साधा-सुधा प्राणी नाही. तो बेशरमसारखा पुन्हा मार खाण्यासाठी आला आहे. आता एकच गोष्ट बाकी आहे, ती म्हणजे त्याचे तोंड काळे करून त्याला गाढवावर बसवून त्याची धिंड काढली पाहिजे आणि मुलांनी त्याला टोमेटो आणि अंडी मारली पाहिजेत. कारण त्याने त्यांच्या लाडक्या ‘शक्तिमान’ या सुपरहिरोचा अपमान केला आहे.”

समय रैनाने नक्की काय म्हटले होते?

समय रैनाने त्याच्या नवीन व्हिडीओमध्ये म्हटले होते की, जेव्हा ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या वादावरून त्याच्यावर टीका होत होती, तेव्हा मुकेश खन्ना यांनीही त्याच्यावर विनाकारण निशाणा साधला होता. मुकेश खन्ना यांनी समयच्या शोमुळे मुले बिघडत असल्याचा आरोप केला होता. यावर समयने शोमधून असा दावा केला की, जेव्हा ‘शक्तिमान’ लागायचे तेव्हा प्रत्येक महिन्यात शक्तिमान पाहून मुलाने इमारतीवरून उडी मारली अशी बातमी यायची. पुढे समयने “तुम्ही मुलांना मारले आहे, मग तुम्ही आम्हाला नैतिकता काय शिकवताय?” असा टोलाही मुकेश खन्ना यांना लगावला.

सुनील पाल-बी प्राक यांच्यावर टीका

समय रैनाने केवळ मुकेश खन्नाच नाही, तर सुनील पाल आणि गायक बी प्राक यांच्यावरही टीका केली आहे. हे सर्व कलाकार केवळ चर्चेत राहण्यासाठी आपल्या वादाचा फायदा घेत असल्याचे समयने म्हटले. समयचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.