बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. बऱ्याचवेळा ती ट्रोल देखील होते. काही दिवसांपूर्वी कंगनाने १९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य ही भीक मिळाली आहे, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे कंगनाला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. यावेळी कंगनाला फक्त नेटकरी नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटीही ट्रोल करत आहेत. यात आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता मुकेश खन्ना यांनी कंगनावर तिच्या वक्तव्यावरून निशाना साधला आहे.

मुकेश यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कंगनाचा एक फोटो देखील शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यामध्ये त्यांनी कंगनावर नाराजी व्यक्त केली आहे. “बऱ्याच लोकांनी मला प्रश्न केला की आपल्या स्वातंत्र्यावर केलेल्या वक्तव्यावर तुम्ही प्रतिक्रिया का दिली नाही? जेव्हा एखादे प्रसिद्ध सेलिब्रेटी अशाप्रकारची प्रतिक्रिया देतात तेव्हा वाईट वाटते. सरकारप्रती लाळघोटेपणा करणारेच अशाप्रकारे बोलू शकतात. पद्म पुरस्कार मिळाल्यानंतर जे काही झालं ते अज्ञानी लोकांची लक्षणे आहेत. पण हे सगळ्यांना माहित आहे आणि सगळ्यांचा विश्वास आहे की आपल्याला स्वातंत्र्य गे १५ ऑगस्ट १९४७ रोजी मिळाले आहे. याला वेगळा काही रंग आणि अर्थ देण्याचा जो काही प्रयत्न करण्यात येतोय तो चूकीचा आहे”, असे मुकेश खन्ना म्हणाले.

आणखी वाचा : आमिर ‘या’ अभिनेत्री सोबत करणार तिसरं लग्न?

पुढे मुकेश खन्ना म्हणाले, “पण मी हे देखील बोलू इच्छितो की हे बोलणं किंवा गाणं गाणे आज़ादी बिना खड़ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल.. ही गाणी वास्तविकतेपासून फार लांब आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की ब्रिटिश सरकारला पळून जाण्याची भीती जर कोणी मनात निर्माण केली असेल तर ते होते देशातील असंख्य क्रांतिकारकांचे बलिदान, सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेची भीती आणि त्यांच्याच सैनिकांचे बंड.”

आणखी वाचा : रिटा रिपोर्टरच्या लग्नात गोकुळधाम सोसायटीच्या रहिवास्यांची हजेरी!

दरम्यान, एका मुलाखतीत “देशाला १९४८ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे स्वांतत्र्य नसून ती भीक होती. आपल्याला खरे स्वातंत्र्य हे २०१४ मध्ये मिळाले. देशात जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, त्यावेळी मला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. मी आता राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर चर्चा करते. सैन्यदलाबद्दल बोलते किंवा आपल्या संस्कृतीच्या प्रचाराबद्दल काम करते. पण त्यावेळी लोक मला मी भाजपचा अजेंडा चालवत आहे, असे सांगतात. तसेच या मुद्द्यावरुन मला भाजपसोबत जोडलं जाते. पण हे सर्व मुद्दे भाजपचे कसे काय होऊ शकतात? हे तर देशाचे मुद्दे आहेत,” असे कंगना म्हणाली होती. याच कारणामुळे कंगनाला ट्रोल केलं जातं आहे.