scorecardresearch

“…आणखी काय पाहिजे!”, किरण माने साकारणार ‘या’ ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

किरण माने यांनी एक नवीन फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांना कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकण्यात आले. राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली, असा आरोप किरण माने यांनी केला होता. यानंतर गेल्या कित्येक दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरु होते. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर नुकतंच किरण माने यांनी एक नवीन फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. याद्वारे त्यांनी नव्या प्रोजेक्टची सुरुवात करत असल्याची घोषणा केली आहे.

नुकतंच किरण माने यांनी नवीन फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. या मालिकेतून काढल्यानंतर त्यांना रावरंभा या चित्रपटासाठी विचारणा करण्यात आली आहे. रावरंभा हा चित्रपट ऐतिहासिक प्रेमकहाणी प्रकारातील आहे. या चित्रपटात अनेक कलाकार झळकणार आहे. आता त्यात किरण माने यांचीही वर्णी लागली आहे. सध्या त्याचे चित्रीकरण सुरु दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

किरण माने यांची प्रतिक्रिया

“आनंद वो…निव्वळ आनंद… नविन भन्नाट जबराट नादखुळा भुमिका ! सोबत प्रतिभावानांची टीम !! आपण वास्तवात ज्या विचारधारेची ‘भुमिका’ घेत असतो…लढत असतो..त्याचवेळी मोठ्या पडद्यावरबी त्याच विचाराचा धागा असनारी ‘भुमिका’ मिळावी, यासारखं दूसरं समाधान नाय भावांनो !!! “शुटिंग सुरू झाल्यापासून फेसबुकवर किरण माने, न्यूज चॅनलवर किरण माने, पेपरमध्ये किरण माने, सेटवर आलं की समोर किरण माने आणि कॅमेरा लेन्समध्ये पाहिलं तरी किरण माने…” अशी चेष्टा करत पोट धरून हसनारे आनि त्याचवेळी सतत पाठीवर हात ठेवून बळ देनारे मराठीतले दिग्गज कॅमेरामन संजय जाधव.. सोबत अपूर्वा नेभळेकर,ओम भूतकर, संतोष जुवेकर, कुशल बद्रिके..”

“टीव्हीवर माझ्यावर खोटे आरोप होत असताना, “आम्हाला माहीतीये ओ सर तुम्ही खूप चांगले आहात.कुणी काहीही म्हणू दे.” असं बोलुन मला दिलासा देणारी माझी गांववाली मोनालीसा बागल… आर्ट डिरेक्टर वासू पाटील.. माझ्या मातीतला, अतिशय भला ‘माणूस’ असलेला दिग्दर्शक अनुप जगदाळे… प्रचंड मोठ्ठा तामझाम असलेला भव्यदिव्य सिनेमा निर्माण करत असताना खर्चाच्या बाबतीत कसलीही तडजोड न करनारे निर्माते शशिकांत पवार… प्रताप गंगावणेंसारखा सिद्धहस्त लेखक.. आनखी काय पायजे?”

“…एक लै भारी किस्सा घडला परवा.. स्पाॅटबाॅय धावत-धावत व्हॅनिटीमध्ये आला… चेहर्‍यावर संताप दिसत होता.. “सर, फेसबुकवर एकानं तुमची टवाळी करत लिहीलंय.. ‘आता कसा बसलास घरी.. काम गेलं हातातनं.’ त्येच्यायला त्येच्या.. सर मला लै राग आलाय.. त्याला ओरडून सांगावं वाटतंय ‘आमचा सातारचा वाघ घरी बसनार्‍यातला नाय..’ तुमचा आत्ता शुटिंग करतानाचा फोटो टाकू का??” मी कसंतरी त्याला समजावलं की दुर्लक्ष कर.. काळ उत्तरं देतो सगळ्याची.. …बाजूला मी न्यायासाठी लढा देत असतानाच, दुसर्‍या बाजूला अशा व्यक्तीची भुमिका करत होतो ज्यानं परक्या व्यक्तीला न्याय मिळावा म्हनून स्वत:चा जीव दिला. मुहूर्त होऊन माझं पहिलं शेड्यूल नुकतंच संपलं… प्रतिक्षा पुढच्या शेड्यूलची.. तोपर्यन्त न्यायाची दूसरी लढाई सुरू.. या आठवड्यात अनेक अविस्मरणीय घटना घडल्या, त्यातलीच ही एक… धन्यवाद अनुप..खूप खूप मनापासून आभार !!!” असे त्यांनी यात म्हटले आहे.

‘धनुष-ऐश्वर्याचा घटस्फोट झालेला नाही…’, अभिनेत्याच्या वडिलांचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

नेमकं प्रकरण काय?

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मा लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेते किरण माने यांनी विलास पाटील हे पात्र साकारलं होतं. अल्पावधीतच हे पात्र घराघरांमध्ये पोहचलं. किरण माने हे अनेकदा त्यांच्या भूमिकेबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टमुळे सुद्धा चर्चेत असायचे. ग्रामीण भाषेतील लहेजा त्यांच्या लेखणीमधून स्पष्टपणे जाणवतो. अनेकदा ते राजकीय भूमिकाही मांडताना दिसतात. मात्र आता याच राजकीय भूमिकांमुळे ते अडचणी सापडले आहेत. त्यांना राजकीय भूमिका घेतल्याने ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर #istandwith_KiranMane हा हॅशटॅग चर्चेत आला होता. अनेकांनी किरण मानेंवर झालेली कारवाई ही चुकीची असल्याचं म्हटलंय. मात्र त्याच वेळेस त्यांच्यावर टीकाही केली जाते होती.

दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीने किरण माने प्रकरणी लेखी स्पष्टीकरण दिलं आहे. राजकीय भूमिका मांडत असल्याच्या कारणानं नाही तर अनेक सह-कलाकारांसोबत, विशेषतः महिला कलाकारांसोबत केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे. तसेच किरण माने यांनी केलेले आरोप हे अत्यंत चुकीचे आणि बिनबुडाचे असल्याचंही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mulgi zali ho actor kiran mane started shooting for ravaramba new marathi movie facebook post viral nrp

ताज्या बातम्या