स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु असलेली ‘मुलगी झाली हो’ ही मालिका सध्या एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या मालिकेत विविध ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. या मालिकेत माऊच्या वडिलांची म्हणजे विलास पाटील ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांना काढून टाकण्यात आले आहे. राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र याप्रकरणी आता मालिकेतील सहकलाकारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
नुकतंच मुलगी झाली हो या मालिकेतील दिग्गज कलाकारांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी मालिकेत काम करणाऱ्या श्रावणी पिल्लई, सविता मालपेकर आणि दिव्या पुगांवकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे किरण माने यांनी केलेले सर्व आरोप सर्वांनीच फेटाळले आहेत. किरण मानेंच्या गैरवर्तवणुकीमुळेच त्यांना मालिकेतून काढण्यात आल्याचे प्रतिक्रिया या सर्वांनी दिली आहे.
श्रावणी पिल्लई यांची प्रतिक्रिया
‘मुलगी झाली हो’ या मालिकेत अभिनेत्री श्रावणी पिल्लई ही उमा विलास पाटील म्हणजेच साजिरी आई हे पात्र साकारत आहे. याप्रकरणी प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, “मुळात राजकीय भूमिका मांडल्यामुळे त्यांना मालिकेतून काढले हे त्यांनी स्वत: हून जे सर्व ठिकाणी पसरवलं आहे, ते सर्व खोटं आहे. मुळात त्यांच्या वर्तवणुकीमुळे प्रोडक्शन हाऊसने त्यांना या मालिकेतून काढलंय. त्यांना काही माहिती नव्हतं, काहीही सांगितलं नाही, असे काहीही नाही. त्यांना तीन वेळा सूचना देण्यात आले होते आणि चौथ्यावेळी त्यांनी हा निर्णय घेतला.”
“ग्रामपंचायतीचे पत्र आलं असलं तरी आमचे शूटींग एक मिनिटेही थांबलेले नाही. त्यांना सत्य परिस्थिती कळल्यानंतर ते परत निघून गेले. आमचे शूटींग व्यवस्थित सुरु असून आम्ही एकजुटीने काम करत आहोत,” असेही त्या म्हणाल्या.
दिव्या पुगांवकर हिची प्रतिक्रिया
‘मुलगी झाली हो’ या मालिकेत साजिरी पाटील म्हणजेच ‘माऊ’ची भूमिका साकारणाऱ्या दिव्या पुगांवकर हिने याप्रकरणी तिचे मत व्यक्त केले आहे. “किरण माने आणि माझे बोलणंच व्हायचे नाही. जेव्हा मी सुरुवातीला या सिरीअलच्या सेटवर आले तेव्हा त्यांनी मला सांगितले की मी तुझ्या वडिलांचा रोल प्ले करणार आहे. तर आपण सेटवरही असेच राहूया. मला तुझ्यात माझी मुलगी दिसते. सुरुवातीचे महिने फार उत्तम गेले,” असे ती म्हणाली.
“त्यानंतर मला ते विविध गोष्टींवर टोमणे मारायचे. माझ्या वजनावरुन ते मला बोलायचे. त्यानंतर त्यांनी बरेच अपशब्द उच्चारले. मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, जर तुम्हाला माझ्यात तुमची मुलगी दिसते, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक बापाने सांगावं की कोणता बाप आपल्या लेकीसाठी असे अपशब्द उच्चारेल? मला या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडून हवे. मालिकेचे शूटींग थांबणार नाही. त्यांना गैरवर्तवणुकीमुळे काढण्यात आले आहे. गेले वर्षभर त्यांना याबद्दल समज देत आहेत,” असेही दिव्या म्हणाली.
सविता मालपेकर यांची प्रतिक्रिया
त्यानंतर माऊच्या आजीची म्हणजे विलास पाटील यांच्या आईची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांनीही याबाबत सडेतोड भूमिका मांडली. “माझ्याबरोबर त्याने असे काहीही केलेले नाही. बाकीच्या सहकलाकारांना सतत टोमणे मारणे, माझ्यामुळे सिरिअल सुरु आहे. मी हिरो आहे सिरीअलचा, मी हिला काढेन, मी त्याला काढेन ही भाषा कशासाठी. तू जरी हिरो असला तरी ते सिद्ध करावे. त्यांनी जी भूमिका मांडली ती चुकीची आहे. ती अयोग्य आहे. राजकारण आणि चॅनलचा काहीही संबंध नाही,” असे सविता मालपेकर यांनी सांगितले.
नेमकं प्रकरण काय?
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मा लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेते किरण माने यांनी विलास पाटील हे पात्र साकारलं होतं. अल्पावधीतच हे पात्र घराघरांमध्ये पोहचलं. किरण माने हे अनेकदा त्यांच्या भूमिकेबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टमुळे सुद्धा चर्चेत असतात. ग्रामीण भाषेतील लहेजा त्यांच्या लेखणीमधून स्पष्टपणे जाणवतो. अनेकदा ते राजकीय भूमिकाही मांडताना दिसतात. मात्र आता याच राजकीय भूमिकांमुळे ते अडचणी सापडले आहेत. त्यांना राजकीय भूमिका घेतल्याने ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर #istandwith_KiranMane हा हॅशटॅग चर्चेचा विषय ठरतोय. अनेकांनी किरण मानेंवर झालेली कारवाई ही चुकीची असल्याचं म्हटलंय. मात्र त्याच वेळेस त्यांच्यावर टीकाही केली जाते आहे.