सध्या ‘देऊळबंद २’च्या यशावर आरुढ असलेल्या लेखक-दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी त्यांच्या चाहत्यांना आणखी एक सुखद धक्का दिला आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला, शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दरात विकत घेऊन त्यावर कॉर्पोरेट स्वप्न उभारणाऱ्यांचे वास्तव समोर आणणाऱ्या ‘मुळशी पॅटर्न’ या गाजलेल्या चित्रपटाच्या सिक्वेलपटाची तयारी सुरू झाली आहे.

‘तुमच्या घराच्या भिंतीतील वाळूची गोष्ट’ असे वेगळे आणि उत्सूकता वाढविणारे घोषवाक्य असलेल्या ‘मुळशी पॅटर्न २’ चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. पुनीत बालन स्टुडिओ आणि अभिजीत भोसले जेन्युन प्रॉडक्शन यांच्या वतीने या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. युवा उद्योजक पुनीत बालन, अभिजीत भोसले आणि अभिनेता, दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी आज या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘घराच्या भिंतीतील

वाळूची गोष्ट’ या घोषवाक्यामुळे या नव्या चित्रपटात वाळू माफियांच्या वाढत्या जाळ्यावर आणि त्यामागील वास्तवावर भाष्य करण्यात येणार आहे, का सामान्य माणसाचे घराचे महाग होत चाललेले स्वप्न याबाबत काही मांडणी असणार, असे तर्क-वितर्क लढविले जात आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रविण तरडे करणार असून ‘मुळशी पॅटर्न’चा दुसरा भाग कधी येणार? या प्रेक्षकांकडून येणाऱ्या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे.

आता ही प्रतीक्षा संपली असून ‘पुनीत बालन स्टुडिओ’ आणि ‘जेन्युन प्रॉडक्शन’ निर्मित या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटाचे चित्रीकरणही लवकरच सुरू होणार असून तो नेमका कधी प्रदर्शित होणार याची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. दरम्यान, या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार, पहिल्या भागातील कोणते कलाकार पुन्हा दिसणार, तसेच कथानकाची दिशा नेमकी काय असणार याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सूकता निर्माण झाली आहे.