अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) शनिवारी संध्याकाळी मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर छापा टाकला. अंमली पदार्थ कक्षाचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना रविवारी अटक केली. आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणातील पंचाने अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. समीर वानखेडे हे मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती आहेत. या संपूर्ण प्रकरणानंतर अभिनेत्री क्रांती रेडकर चांगलीच चर्चेत आली आहे. नुकतंच क्रांतीने या संपूर्ण प्रकरणावर संताप व्यक्त करणारे ट्वीट केले आहे. “सत्यमेव जयते,” असे तिने या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

आर्यन खानला अटक केल्यानंतर त्याचे वडील अभिनेता शाहरूख खान यांच्याकडे २५ कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यातील आठ कोटी रुपये ‘एनसीबी’चे संचालक समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असा गंभीर आरोप ‘एनसीबी’चे पंच प्रभाकर साईल यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर क्रांती रेडकर हिने ट्वीट केले आहे.

“जेव्हा तुम्ही लाटेच्या विरुद्ध दिशेने पोहता, तेव्हा तुम्ही बुडू शकता. पण जर तुम्ही सर्वात शक्तिशाली असाल तर मात्र जगातील कोणतीही लाट तुम्हाला बुडवू शकत नाही. कारण सत्य हे फक्त त्याला माहिती आहे. शुभ सकाळ, सत्यमेव जयते,” असे ट्वीट क्रांतीने काही तासांपूर्वी केले आहे. तिच्या या ट्वीटवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

नेमकं प्रकरण काय?

आर्यन खानला अटक केल्यानंतर त्याचे वडील अभिनेता शाहरूख खान यांच्याकडे २५ कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यातील आठ कोटी रुपये ‘एनसीबी’चे संचालक समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असा गंभीर आरोप ‘एनसीबी’चे पंच प्रभाकर साईल यांनी केला आहे. प्रभाकर यांनी एक चित्रफीत प्रसारित केली आहे. तसेच प्रतिज्ञापत्रही समाज माध्यमांवर प्रसारीत झाले आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक माहिती उघड केली आहे.

IPL मॅच फिक्सिंग प्रकरणावरुन चुकीचे वृत्त देणाऱ्यांवर संतापली क्रांती रेडकर, म्हणाली…

या प्रकणातील दुसरे पंच के. पी. गोसावी आणि सॅम डिसूझा यांचे दूरध्वनीवरील संभाषण मी ऐकले होते. २५ कोटींचा बॉम्ब टाका. १८ कोटीपर्यंत व्यवहार अंतिम करू. त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असे संभाषण दोघांमध्ये झाल्याचा प्रभाकर यांचा दावा आहे. आपण के.पी. गोसावी यांचे अंगरक्षक असल्याचा दावाही प्रभाकर यांनी केला आहे. क्रुझवर छापा टाकल्यानंतर शाहरुख खानची व्यवस्थापक पूजा दादलानी आणि के. पी. गोसावी तसेच सॅम यांना निळ्या रंगाच्या मर्सिडीजमध्ये पाहिले होते. या तिघांमध्ये १५ मिनिटे चर्चा झाली होती, असा दावाही प्रभाकर यांनी केला आहे.

वानखेडेंनी आरोप फेटाळले

  • प्रभाकर साईल यांचे प्रतिज्ञापत्र समाज माध्यमांवरून आपल्या निदर्शनास आल्याचे ‘एनसीबी’चे उपमहासंचालक मुथा अशोक जैन यांनी सांगितले.
  • ते या प्रकरणात साक्षीदार असल्यामुळे त्यांनी हे प्रतिज्ञापत्र समाज माध्यमांऐवजी न्यायालयात सादर करावे.
  • तसेच प्रतिज्ञापत्रात त्यांनी एका व्यक्ती विरोधात आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
  • काही आरोप दक्षते (पैसे मागण्याच्या) संदर्भातील आहेत. त्यामुळे आपण हे प्रतिज्ञापत्र कार्यवाहीसाठी ‘एनसीबी’च्या महासंचालकांना पाठवत असल्याचे जैन यांनी स्पष्ट केले.