मुंबई : पारलिंगी समुदायाच्या कथाव्यथा मांडणाऱ्या सिनेमांना व्यासपीठ उपलब्ध करून देत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या कशिश प्राईड फिल्म फेस्टिव्हलच्या नव्या पर्वाला ३ जूनपासून सुरुवात होत आहे. करोना काळातही खंड न पडू देता सलग १७ वर्षे प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरलेल्या या फेस्टिव्हलमध्ये यंदा ४३ देशांतील १५३ चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.
समलिंगी आणि पारलिंगी समुदायाच्या भावविश्वावर आधारित चित्रपट पाहण्याची संधी देणारा दक्षिण आशियातील सर्वात मोठा महोत्सव म्हणून कशिश प्राईड फिल्म फेस्टिव्हल ओळखला जातो. यंदा या फिल्म फेस्टिव्हलचे १७ वे पर्व असून एकूण ६०० चित्रपटांचे अर्ज फेस्टिव्हलसाठी आले होते. त्यातून उत्तम चित्रपट निवडणे हे यावेळी परीक्षकांसमोर मोठे आव्हान होते, असे सांगतानाच यंदा प्रसिध्द दिग्दर्शक – निर्माता निखिल अडवाणी, दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी, अभिनेत्री राजश्री देशपांडे, अभिनेत्री मानवी गगरू, निर्माता नीरज चुरी, पटकथा लेखिका इशिता मोईत्रा, दिग्दर्शिका शाजिया इक्बाल, दाक्षिणात्य अभिनेत्री पार्वती असे भारतीय चित्रपटसृष्टीतील काही मान्यवर परीक्षक म्हणून या फेस्टिव्हलशी जोडले गेले आहेत, अशी माहिती फेस्टिव्हलचे संचालक श्रीधर रंगायन यांनी दिली.
पहिल्यांदाच राष्ट्रीय आधुनिक कला दालनाचे दरवाजे खुले
कशिश प्राईड फिल्म फेस्टिव्हल मुंबईत तीन ठिकाणी पाहता येणार आहे. लिबर्टी सिनेमा आणि मरीन लाईन्स येथील ‘अलियान्स फ्रान्सेज दी बॉम्बे’ येथे फेस्टिव्हलमधील चित्रपट पाहता येणार आहेत. त्याचबरोबर पहिल्यांदाच रिगल सिनेमाजवळ असलेल्या ‘राष्ट्रीय आधुनिक कला दालन’ येथेही या फेस्टिवलमधील चित्रपट पाहता येणार आहेत.
मराठी चित्रपट आणि समलिंगींचे प्राणीप्रेम दर्शवणारे चित्रपट
कशिश प्राईड फिल्म फेस्टिव्हलची सुरुवात ‘जिम्पा’ या ऑस्ट्रेलिया, नेदरलँड आणि फिनलँड यांची निर्मिती असलेल्या चित्रपटाने होणार आहे. तीन पिढयांमधील नातेसंबंध या चित्रपटातून उलगडणार आहेत. तर फेस्टिव्हलचा समारोप ‘मॅस्पालोमास’ या स्पॅनिश चित्रपटाने होणार आहे. फेस्टिव्हलमध्ये ‘कंट्री इन फोकस’ या विभागात स्पेनमधील चित्रपट दाखवले जाणार आहेत. सनडान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळवणारा रोहन कानवडे दिग्दर्शित ‘साबर बोंडं’ हा चित्रपट फेस्टिव्हलचे आकर्षण ठरणार आहे. त्याचबरोबर अभिनेत्री सई देवधर हिचे दिग्दर्शकीय पदार्पण असलेला ‘न आवडती गोष्ट’ या मराठी चित्रपटाचा प्रीमिअर फेस्टिव्हलमध्ये होणार आहे. विविध देशातील १५३ चित्रपटांबरोबरच ३१ माहितीपटही दाखवण्यात येणार आहेत. ६२ समलिंगी चित्रपटकर्मींनी बनवलेले चित्रपट हे यंदाच्या फेस्टिव्हलचे बलस्थान आहे, असेही श्रीधर रंगायन यांनी सांगितले. यावर्षी पहिल्यांदाच समलिंगी आणि त्यांचे पाळीव प्राणी यांच्यातील नाते उलगडून दाखवणारे चित्रपट ‘टायनी टेल्स’ या खास पॅकेज अंतर्गत पाहायला मिळणार आहेत.
