मुंबईकरांसाठी सोमवारचा दिवस पॉवर फेल्युअरने सुरु झाला आहे. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान यावरुन अभिनेते अनुपम खेर यांनी मुंबई महापालिकेची फिरकी घेतली. “बत्ती गुल झाली” अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं. या शिवाय अभिनेत्री कंगना रणौतने देखील पॉवर ग्रीड फेल्युअरवर प्रतिक्रिया दिली. लक्षवेधी बाब म्हणजे तिने शिवसेना नेते संजय राऊत आणि स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचा एक फोटो पोस्ट करुन महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. बॉलिवूड कलाकारांचे हे ट्विट्स सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

हा बिघाड लवकरच दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सुरुवातीला ठाणे, कांजूर, भांडूपमधील अनेक भागांमधील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला असून दुपारपर्यंत मुंबईतील सर्व ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कळवा-पडघा आणि खारघर उपकेंद्रांमधील वीज वाहिन्यांमध्ये आणि ट्रान्फॉरमर्समध्ये अनेक ठिकाणी ट्रीपिंग झालं. मुंबई आणि उपनगरांना होणाऱ्या वीजपुरवठ्यापैकी ३६० मेगावॅट पुरवठ्याला याचा फटका बसला. हा तांत्रिक बिघाड दूर करुन वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आलं. मात्र यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. रायगड जिल्ह्यालाही या तांत्रिक बिघाडाचा फटका बसला असून तिथेही अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.