मराठी चित्रपटसृष्टीतील पहिला रॅपर होण्याचा मान मिळविणारा किंग जे. डी अर्थात श्रेयश जाधव याची गाणी कायमच प्रेक्षकांना भूरळ घालत असतात. संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या रॅपने थिरकायला लावणाऱ्या किंग जे.डीचं नवीन गाणं पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. विशेष म्हणजे नुकतंच प्रदर्शित झालेलं हे गाणं तरुणाईला भुरळ घालत आहे.

‘मुंबईच्या छोरी’ हे नवीन गाणं प्रदर्शित झालं असून या गाण्याचं चित्रीकरण युरोपमधील अर्मेनिया येथे झालं आहे. ” हे गाणं चित्रीत करताना फार मजा आली. माझ्या मते हे मराठीतलं पहिलंच भव्यदिव्य गाणं असेल जे भारताबाहेर चित्रीत करण्यात आलं. आजकाल एकाच पठडीतल्या गाण्यांची निर्मिती होताना दिसून येते.मात्र ही प्रथा मोडत आम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. हे गाणं हिट झाल्यानंतर अनेकांना त्यातून प्रेरणा मिळेल. यातून मराठी सिनेसृष्टी अधिकच ग्लोबल होईल”, असं श्रेयश म्हणाला.


पुढे तो म्हणतो, “मराठीमध्ये आता सध्या अनेक चित्रपटांचं चित्रीकरण भारताबाहेर होताना दिसत आहे. परंतु, एखाद्या गाण्याचे चित्रीकरण परदेशात अजून तरी झाले नसेल, आणि हाच नवीन पायंडा या गाण्याच्या रूपाने आम्ही पाडला आहे. याचा आनंद तर आहेच त्यातही मराठी सिनेसृष्टी ही अजून जास्त ग्लोबल होणार आहे याचा अभिमान वाटत आहे. ‘मुंबईची छोरी’ हे एक रोमँटिक हिप हॉप सॉन्ग आहे. या गाण्याचे चित्रीकरण आम्ही उणे २ सेल्सियस इतक्या कमी तापमान केले”.

दरम्यान, श्रेयश रॅपर असण्यासोबतच एक उत्तम लेखकही आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘मी पण सचिन’ या चित्रपटाद्वारे श्रेयशने लेखनात आणि दिग्दर्शन क्षेत्रात यशस्वी पाऊल ठेवले आहे.