प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. अनेक कट्टरतावादी संघटनांच्या विरोधानंतर रविवारी बंगळूरु येथे होणाऱ्या मुनव्वर फारुकीच्या स्टँडअप शो ला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मुन्नवर फारुकी याचा हा शो बंगळुरुतील गुड शेफर्ड या ठिकाणी रविवारी संध्याकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला होता. मात्र फारुकी हा वादग्रस्त व्यक्ती असल्याचे सांगत शो रद्द करण्याचे निर्देश पोलिसांनी संबंधित सभागृह मालकाला दिले आहेत. त्यामुळे तो शो रद्द करण्यात आला आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुनव्वर फारुकीच्या कोणत्याही शोसाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या तरी तो कोणताही सार्वजनिक कार्यक्रम करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान त्याच्या या शो ला अनेक कट्टरतावादी संघटनांनी विरोध केला होता. तसेच त्याच्या विरोधात बंगळुरू पोलीस आयुक्तांकडे तक्रारही दाखल करण्यात आली होती. यावेळी मुनव्वर फारुकीवर हिंदू देवतांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर कॉमेडियन मुनव्वर फारुकीने ट्वीटरवर त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “द्वेष जिंकला आणि कलाकार हरला, माझं झालंय, गुडबाय आणि अन्याय” असे कॅप्शन त्याने या पोस्टला दिले आहे. यासोबत त्याने तीन पानांची एक पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : बजरंग दलाच्या धमकीनंतर मुनव्वर फारुकीचे मुंबईतले दोन कार्यक्रम रद्द

त्यावर तो म्हणाला की, “आज बंगळुरुतील एका शो च्या ठिकाणी तोडफोडीच्या धमक्या मिळाल्यानंतर तो रद्द करण्यात आला आहे. मी कधीही न केलेल्या विनोदासाठी मला तुरुंगात टाकले. ज्याचा शो बाबत काहीही संबंध नाही, तो शो रद्द केला जात आहे. हे अन्यायकारक आहे. हा शो कोणत्याही धर्माचा विचार न करता संपूर्ण भारतातील लोकांना आवडला. त्यामुळे हे चुकीचे आहे.” असे त्याने सांगितले.

यापुढे फारुकीने सांगितले की, गेल्या दोन महिन्यात आमचे १२ शो रद्द केले आहेत. या प्रत्येक शो वेळी कार्यक्रमस्थळाची तोडफोड करणे, प्रेक्षकांना त्रास देण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. मी त्यांच्या द्वेषाचा एक भाग बनलो आहे. तर काही लोकांना हसवून मी त्यांच्या जगण्याचा आधार बनलो आहे. जर त्या तुटल्या तरच त्यांच्या इच्छा पूर्ण होतील. पण खरचं वाटतं मी एक तारा बनलो आहे. पण मला आता वाटतंय की सगळं संपलंय…. गुडबाय.., असे त्याने यात म्हटले आहे. त्यामुळे सध्या त्याची ही पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे.