अभिनेत्री मुमैत खान (Mumait Khan) दाक्षिणात्य चित्रपट आणि बॉलीवूडमधील एक काळची अत्यंत लोकप्रिय ‘आयटम गर्ल’ आणि अभिनेत्री आहे. २००३ मधील ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ या चित्रपटातील ‘देख ले’ गाण्यामुळे ती घराघरात पोहोचली होती. मुमैत बऱ्याच वर्षांपासून इंडस्ट्रीपासून दूर आहे. आता तिने यामागचं कारण व नवीन सुरुवात याबद्दल सांगितलंय.
मुमैत खानचे वडील पाकिस्तानी व आई दक्षिण भारतीय होती. मुमैतने तिचं बालपण मुंबईत घालवलं. आयड्रीम मीडियाशी बोलताना मुमैत म्हणाली, “आम्हाला पैसे कमवायला आमच्या आई-वडिलांनी सांगितलं नव्हतं. आम्ही मोठे होत असताना, माझ्या आणि माझ्या बहिणीला जाणवलं की त्यांच्याकडे पैसे नाही. त्यामुळे लहानपणी, मी फक्त १.५० रुपये वाचवण्यासाठी शाळेत पायी जायचे. पैसे साठवून मी पिगी बँकेत ठेवायचे आणि माझ्या वडिलांना द्यायचे.”
मुमैतने वयाच्या १३ व्या वर्षी आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी कामाला सुरुवात केली होती. तिने तेलुगू, तमिळ, हिंदी आणि कन्नड अशा विविध भाषांमध्ये सुमारे १०० हून अधिक चित्रपटांत काम केले आहे. ‘मुन्ना भाई एमबीबीएस’नंतर तिने ‘पोकिरी’, ‘मगाधीरा’ आणि ‘छत्रपती’ सारख्या ब्लॉकबस्टर तेलुगू चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका आणि डान्स नंबर केले. तिने बिग बॉस तेलुगू (सीझन १) मध्ये देखील भाग घेतला होता.
मुमैत खानचा अपघात
मुमैत खान करिअरच्या शिखरावर असताना २०१६ मध्ये एका अपघाताने तिचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. “मी इंडस्ट्री सोडलेली नाही. डिसेंबर २०१६ मध्ये मी राहत्या घरी बेडवरून पडले. माझ्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. माझ्या मेंदूतील पाच नसा फाटल्या होत्या. मी जवळपास १५ दिवस कोमामध्ये होते. डॉक्टरांनी तिला सात वर्षे कोणतीही शारीरिक मेहनत किंवा काम न करण्याचा सल्ला दिला होता. मेंदूतील शस्त्रक्रियेनंतर मला फिट्स येण्याचा त्रास सुरू झाला, ज्यासाठी तिला बराच काळ औषधे घ्यावी लागली. या औषधांमुळे माझे वजन देखील वाढले होते,” असं मुमैत खानने सांगितलं.
७ वर्षे अंथरुणाला खिळली होती मुमैत
“त्या कठीण काळात माझा खर्च आईने उचलला. तिने माझी काळजी घेतली. मला आनंदी ठेवलं. त्यामुळे आजही कोणतीही मोठी वस्तू खरेदी करण्यापूर्वी मी तिला फोन करून तिची परवानगी घेते. मी सहज पैसे खर्च करत नाही. ७ वर्षे अंथरुणाला खिळून असताना मी विचार केला की पुढे काय करायचं. मला मेकअप व हेअरस्टाइलची खूप आवड आहे. त्यामुळे मी तेच करायचं ठरवलं,” असं मुमैत खान म्हणाली.
दीर्घकाळ चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्यानंतर मुमैत खानने आता एका नवीन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. तिने अलीकडेच हैदराबादमध्ये ‘WeLyke Academy’ नावाची मेकअप आणि हेअर स्टाईलिंग प्रशिक्षण संस्था सुरू केली आहे
मुमैत खान ४० व्या वर्षीही अविवाहित असून आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करत आहे. “मी १३ व्या वर्षी काम करायला सुरुवात केली. मी तिशीपर्यंत सातत्याने काम करत होते. मग देवाने माझ्या आयुष्यात एक ब्रेक दिला. लहानपणापासूनच माझी मानसिकता अशी होती की, ‘मी माझ्या आई-वडिलांसाठी काम करत आहे.’ मला लग्न किंवा मुलांबद्दल विचार करायला कधीच वेळ मिळाला नाही. आता मी व्यवसायावर लक्ष केंद्रित केलंय. त्यामुळे माझ्या आयुष्यात वैयक्तिक नात्यांसाठी कधीच जागा नाही,” असं मुमैत खानने नमूद केलं.

