नेटफ्लिक्सवर ‘मुसाफिर कॅफे’ ही वेबमालिका प्रदर्शित होऊन अवघे दोन आठवडे झाले आहेत. या दोन आठवड्यांत या वेबमालिकेविषयी लोकांमध्ये इतकी चर्चा झाली की निर्माते आणि नेटफ्लिक्सने या वेबमालिकेच्या दुसर्या पर्वाची घोषणा करून मोकळे झाले आहेत. खरं तर, त्यांच्या या घोषणेला काही अर्थ नाही. कारण, मुळातच सध्या वेबमालिकांचा घाट अशा पद्धतीने घातला जातो की वर्षानुवर्षं त्याचे सीक्वेल येत राहावेत. त्यामुळे कोणत्याही ओटीटी वाहिनीवर येणार्या प्रत्येक नव्या वेबमालिकेला एक निश्चित सुरुवात असते, मात्र त्यांचा शेवट कधी होत नाही. रुचिर अरुण दिग्दर्शित ‘मुसाफिर कॅफे’सुद्धा त्याला अपवाद नाही. अर्थात, दिग्दर्शक रुचिर अरुण यांच्या म्हणण्यानुसार ‘मुसाफिर कॅफे’मधली अदमुरी प्रेमकथा ही नव्वदच्या दशकातील प्रेमाची जाणीव करून देणारी आहे आणि कदाचित म्हणून हळुवार उलगडणारी ही प्रेमकथा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत असावी.
हिंदीतील साहित्यिक दिव्य प्रकाश दुबे यांच्या ‘मुसाफिर कॅफे’ या कादंबरीवर वेबमालिकेची कथा बेतलेली आहे आणि शरण्या राजगोपालने या कथेला वेबमालिकेसाठी पटकथेचं रूप दिलं आहे. आठ तासांच्या या वेबमालिकेत प्रामुख्याने चंदर आणि सुधाची प्रेमकथा पाहायला मिळते. अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून उत्तम सुरू असलेले काम सोडून मायदेशी परतलेला चंदर आईच्या आग्रहावरून भोपाळमधल्या एका कॅफेत लग्नासाठी वधुशोध घेतो आहे. याच शोधात त्याची गाठ सुधाशी पडते. सुधा भोपाळमध्ये वकिली करते आहे. सध्या फौजदारी खटले लढवणार्या सुधाचं मुंबईत वकील म्हणून काम करण्याचं स्वप्न आहे. सुधाला मोठं व्हायचं आहे, तिच्या आईला सगळ्या प्रकारचं सुख द्यायचं आहे, तिचा सांभाळ करायचा आहे आणि स्वत:ही वकील म्हणून नाव कमवायचं आहे. त्यामुळे आईच्या आग्रहाखातर तीसुद्धा चंदरप्रमाणे त्याच कॅफेमध्ये मुलांना भेटते खरी… मात्र, त्यांच्याकडून आपोआप नकार यावा, याचीही पुरेपूर तजवीज करते. चंदरच्या बाबतीत मात्र सुधाला हे सडेतोड वागणं जमत नाही. सुधा जितकी स्वच्छंद, उच्छृंखल, स्पष्टवक्ती आहे, तितकाच चंदर थोडा हळवा, कुठल्याही गोष्टीवर लगेच व्यक्त न होता वेळ घेऊन, संयमाने बोलणारा, जबाबदारीने वागणारा. त्यामुळे सुधाचा त्याच्या आयुष्यातला असा बेधडक प्रवेश त्याला आश्चर्यचकित करतो. सुधाचं वागणं-बोलणं त्याला थक्क करत राहतं. एकमेकांच्या मर्यादा माहिती असूनही दोघं एकमेकांच्या जवळ येत जातात. या वेबमालिकेची कथा दोन वेगळ्या काळात घडते. एक चंदरचा भूतकाळ आहे, ज्यात सुधा हेच त्याचं विश्व आहे. तिच्याबरोबर पाहिलेलं ‘मुसाफिर कॅफे’चं स्वप्न आहे. आणि दुसरं त्याचं वर्तमान आहे, जिथे प्रीती त्याच्या साथीने ‘मुसाफिर कॅफे’चं त्याचं स्वप्न प्रत्यक्षात जगते आहे. भूतकाळ वर्तमानात समोर आला तर काय होईल? सुधाच्या मनात काय सुरू असेल? चंदर पुन्हा पहिल्या प्रेमाकडे ओढला जाईल का? प्रीतीच्या मनातली हीच भीती खरी ठरेल का? हा प्रेमाचा नाजूक गुंता ‘मुसाफिर कॅफे’मध्ये पाहायला मिळतो.
जेन झींच्या ‘फास्ट फॉरवर्ड’ जगात नव्वदच्या दशकातल्या हळुवार प्रेमाच्या संकल्पना तशा नव्याच वाटाव्यात अशा आहेत. त्या अर्थाने सुधाची व्यक्तिरेखा ही काहीशी बंडखोर आहे. तितकीची प्रीतीची व्यक्तिरेखासुद्धा खंबीर आणि धाडसी आहे. सुधाला आयुष्यात काय हवं आहे आणि काय नको आहे, याची पुरेपूर कल्पना आहे आणि ते चंदरसमोर स्पष्टपणे ठेवण्याइतकी ती खमकी आहे. त्या तुलनेत चंदरची व्यक्तिरेखा मात्र तिच्यासमोर सरळसाधी आहे, तिच्या प्रत्येक गोष्टीशी जुळवून घेणारी आहे. सुधाचं प्रेम आणि तिच्या साथीने मसुरीमध्ये ‘मुसाफिर कॅफे’ उभारायचं त्याचं स्वप्न आणि मुंबईत राहून आपलं स्वप्न पूर्ण करतानाही चंदरशी जोडलेलं राहणं हा सुधाचा आग्रह… अर्थात, सगळ्याच गोष्टी आपल्याला हव्या तशा घडत नाहीत आणि मग जे घडतं त्याला हे तिघं कसा प्रतिसाद देतात? हे खरं म्हणजे प्रेक्षकांना धरून ठेवणारं मुख्य सूत्र. या वेबमालिकेतले सहा ते सात भाग हे सुधा आणि चंदर यांच्यातल्या प्रेमकथेवरच खर्ची झाले आहेत. चंदरचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ समोरासमोर आल्यावर काय गुंतागुंत होणार? हा मुख्य भाग वेबमालिकेच्या शेवटच्या भागात येतो आणि तिथे कथा पुढे सरकणार आहे हे संकेत देऊन वेबमालिका संपते. त्यामुळे त्यातला नावीन्याचा भाग हा अजून आपल्यासमोर यायचा आहे.
‘मुसाफिर कॅफे’मधील मुख्य कलाकारांचा अभिनय आणि दिग्दर्शकाची संयत मांडणी ही जमेची बाजू आहे. विक्रांत मसीने यात चंदरची भूमिका साकारली आहे. सुधाच्या स्वच्छंद प्रेमात वाहावत जाणारा चंदर आणि कालांतराने जगरहाटीचा अनुभव घेतल्यानंतर प्रेमाच्या आणि स्वत:च्या बाबतीतही ठाम भूमिका असलेला चंदर या दोन्ही छटा त्याने सहजतेने साकारल्या आहेत. सुधाच्या भूमिकेत वेदिका पिंटो आणि प्रीतीच्या भूमिकेत महिमा मकवाना या दोन्ही तुलनेने नव्या असलेल्या अभिनेत्रींनी खरंच रंगत आणली आहे. वेदिकाने मनमोकळी आणि समोरच्याकडून प्रेमाने का होईना आपल्याला हवं तसं करून घेणारी सुधा सहजतेने साकारली आहे. महिमाच्या वाट्याला प्रीती म्हणून फार कमी दृश्यं आली आहेत, पण तिचं अस्तित्व आणि वावर दोन्हीतून तिने छाप पाडली आहे. या दोघींशिवाय, अभिनेते आदिल हुसैन यांच्याबरोबरच सादिया सिद्दिकी यांच्यासारख्या अनुभवी अभिनेत्रीची कित्येक वर्षांनी दिसलेली छोटेखानी झलकही सुखावणारी आहे. प्रेमकथेच्या अनुषंगाने संगीत, पार्श्वसंगीत या सगळ्याचा सुरेख वापर झाला आहे. मात्र, ‘मुसाफिर कॅफे’ ही या कथेत निव्वळ जागा नाही, त्याला स्वत:चा एक आत्मा आहे, मात्र कॅफे तुकड्या-तुकड्यात आपल्याला सुरेख दिसत राहतो, जाणवत राहतो पण, मनात रेंगाळत नाही. काही कच्चे दुवे आणि अपुरेपण जाणवत असलं तरी ही अदमुरी प्रेमकथा प्रेक्षकांना काही प्रमाणात धरून ठेवते हे निश्चित!
ओटीटी – नेटफ्लिक्स
दिग्दर्शक – रुचिर अरुण
