गेल्या काही वर्षांत मराठी रंगभूमीवर वेगळे प्रयोग आणि वेगळ्या विषयांवरील नाटके सादर होत असून या नाटकांना रसिकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मराठी रंगभूमीवर आगळा प्रयोग असणारे ‘तिन्हीसांज’ हे नाटक दाखल होत आहे. नाटकात संगीत, नृत्य आणि रहस्य यांचा गोफ गुंफण्यात आला आहे.

‘सविता दामोदर परांजपे’, ‘तू फक्त हो म्हण’, ‘तुला यावंच लागेल’ या लोकप्रिय नाटकांचे लेखक शेखर ताम्हाणे हे दीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर ‘तिन्हीसांज’ हे नवे नाटक घेऊन आले आहेत. अभिनेते व दिग्दर्शक राजन ताम्हाणे हे निर्मात्याच्या भूमिकेत असून अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी या नाटकाचे दिग्दर्शन करत आहेत. या अगोदर त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘किमयागार’ व ‘सोबत संगत’ या नाटकांना रसिक प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

शेखर व राजन ताम्हाणे यांच्या ‘त्रिकुट’या संस्थेतर्फे नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. नाटकात अंगद म्हसकर, शितल क्षीरसागर, शाल्मली टोळे, बालकलाकार श्रीराज ताम्हनकर, सायली परब, गौतम मुर्डेश्वर, सचिन शिर्के हे कलाकार आहेत. संगीत परिक्षित भातखंडे यांचे असून प्रकाशयोजना राजन ताम्हाणे यांची आहे. संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य तर पौर्णिमा भावे यांची वेशभूषा आहे.

नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २४ डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता डोंबिवलीत सावित्रीबाई फुले नाटय़गृहात होणार आहे.