नुकताच दिल्लीमध्ये ६५ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात ए.आर. रेहमानला ही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यावेळी त्याला दोन पुरस्कार प्रदान करण्यात आले. रेहमानला पहिला पुरस्कार मॉम सिनेमाच्या पार्श्वसंगीतासाठी मिळाला तर दुसरा पुरस्कार Kaatru Veliyidai सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून त्याला पुरस्कार मिळाला.

जेव्हा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रेहमानला दोन्ही पुरस्कार दिले तेव्हा त्यातील एक पुरस्कार त्याच्या हातून निसटला. त्याच्या हातून पुरस्कार पडल्याचे लक्षात येताच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि राज्यवर्धन सिंह राठोड यांनी तो पुरस्कार उचलला आणि रेहमानच्या हातात दिला.

या पुरस्कार सोहळ्याला रेहमानने जांभळ्या रंगाचा कुर्ता आणि काळ्या रंगाची पँट घातली होती. या सोहळ्याला रेहमानची पत्नी सायरा बानोही उपस्थित होती. यावेळी राष्ट्रपतींनी रेहमानच्या संगीताचे भरभरून कौतुक केले. रेहमानने अनेक वर्षांनी मॉम सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूड सिनेमाला संगीत दिले होते.

दरम्यान, या सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद अनुपस्थित राहणार असल्यानेच विजेत्या कलाकारांनी पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. याविषयी नाराजी व्यक्त केल्यानंतर मराठी कलाकार प्रसाद ओक आणि मंदार देवस्थळी यांनी हा पुरस्कार अखेर स्वीकारला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.