आधुनिक मराठी रंगभूमीचा पाया घालणारी जगातील एकमेवाद्वितीय अशी ‘संगीत नाटकां’ची आपली वैभवशाली परंपरा पुढे काळाच्या ओघात मागे पडली. आता तर ती लुप्तप्रायच झालीय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मधूनच एखादं ‘संगीत देवबाभळी’सारखं नाटक येतंही; पण ते अपवाद म्हणूनच. काही वर्षांपूर्वीपर्यंत संगीत नाटकं विशिष्ट घराणी (साहित्य संघ, शिलेदार, पेंढारकर, गोखले वगैरे) सादर करतदेखील होती. पण त्यांतील बहुतेक कलावंत मावळतीकडे झुकलेले असल्यानं संगीत नाटकाचा आत्माच त्यातून हरवल्यासारखा झाला होता. त्यामुळे प्रेक्षकांनीही त्याकडे पाठ फिरवली. तशात संगीत नाटकाचा अवाढव्य पसारा, त्यातील कलाकारांचा नाटकापेक्षा गायकीकडे असलेला अधिक झुकाव, संगीत नाटकांची समकालीन वास्तवाशी तुटलेली नाळ, कथानकांवरील विषयमर्यादा, संगीताचे जाणकार तरुण लेखक, दिग्दर्शक, कलावंत आणि संगीतकारांची वानवा, प्रेक्षकांची बदललेली चव अशा काही गोष्टीही यास कारणीभूत होत गेल्या. परंतु तरीही एकेकाळी संगीत नाटकं ही मराठी रंगभूमीची शान होती, हे वानगीदाखल दाखवणारी काही नाटकं अधूनमधून व्हायला काहीच हरकत नाही. तेवढीच आजच्या पिढीला त्याची जाणीव राहील, किंवा ती करून बघण्याची ऊर्मी येईल. असो.

त्याकाळी चित्रपटांच्या आगमनामुळे संगीत रंगभूमीला उतरती कळा लागलेली असतानाच साठच्या दशकात नाटककार विद्याधर गोखले यांनी आपल्या वेगळ्या धर्तीच्या तजेलदार संगीत नाटकांनी पुनश्च एकदा संगीत नाटकांत प्राण फुंकले होते. त्यानंतर काही काळ पुन्हा तिला उर्जितावस्था प्राप्त झाली होती. विद्याधर गोखले यांचे गेल्या वर्षी जन्मशताब्दी वर्ष साजरे झाले. या वर्षी त्यांच्या ‘संगीत मंदारमाला’ या अत्यंत यशस्वी नाटकाचे संगीतकार व मुख्य कलावंत पं. राम मराठे यांची जन्मशताब्दी सुरू आहे. यानिमित्ताने पं. राम मराठे प्रतिष्ठान आणि कलाभारती यांच्या सहयोगाने ‘संगीत मंदारमाला’ हे नाटक तरुण, तडफदार कलावंतांच्या संचात पुनश्च रंगभूमीवर आलं आहे. या नाटकाच्या प्रभावाखालील ‘संगीत कट्यार काळजात घुसली’ हे नाटक पुढील काळात रंगभूमीवर आलं आणि त्यानेही इतिहासात घडवला. अलीकडेच त्यावर आधारित याच नावाचा चित्रपटही आला आणि त्यानेही बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला.

Prajkata Mali
“अत्यंत स्वाभिमानी…”, प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’विषयी खुलासा; म्हणाली, “पुण्यात आल्यावर शास्त्रीबुवांचा परीसस्पर्श…”
Check the List of Highest-Selling Cars of the Year
‘या’ सात सीटर कारला लोकांची सर्वात जास्त पसंती,…
book review my journey in lyrics and music memoir of syed aslam noor
 ‘पॉपी’ पर्वाचे पुराण…
Vijay Tapas Drama Ruiya College Marathi Poetry
व्यक्तिवेध: विजय तापस
salim javed marathi news
सलीम-जावेद यांची जोडी का दुभंगली?
marathi actress suhasini Deshpande
व्यक्तिवेध: सुहासिनी देशपांडे
actress kangana ranaut praises indira gandhi during promotion of upcoming hindi film emergency
इंदिरा गांधींच्या आयुष्यातून खूप काही शिकण्यासारखं! अभिनेत्री दिग्दर्शक कंगना राणावतचे मत
three comedy one act play received spontaneous response from punekar
 ‘नाट्यपुष्प’च्या एकांकिकांमधून प्रेक्षकांना हास्यानुभूती

हेही वाचा >>>“जान्हवी तुला लाज वाटत नाही का?”, वर्षा उसगांवकरांना ‘ती’ वागणूक दिल्यामुळे प्रेक्षक संतापले! म्हणाले, “साइड रोल करणारी…”

‘संगीत मंदारमाला’ हे एका गायकाच्या जीवनावरील नाटक. साहजिकच त्यात संगीताचा मुक्तपणे वावर असणार, हे गृहीतच आहे. मंदार हा गायक आपल्या गायक वडलांवरील विषप्रयोगाने जीवनविन्मुख होऊन अरण्यात आपल्या एकाकी संगीतसाधनेत मग्न असतो. वडलांच्या एका शिष्येनंच त्यांच्यावर विषप्रयोग केल्याचं त्याच्या ऐकिवात असल्याने तो पक्का स्त्रीद्वेष्टा झालेला असतो. एकदा एक राजगायिका रत्नमाला अरण्यात आलेली असताना त्याचं गाणं ऐकते आणि अक्षरश: मंत्रमुग्ध होते. याच्याकडून आपण गायनविद्या शिकावी अशी तिची मनिषा असते. परंतु मंदार हा कट्टर स्त्रीद्वेष्टा असल्याने तो तिला ठोकरतो. मात्र त्याला सर्पदंश झाला असताना ती स्वत:चे प्राण धोक्यात घालून त्याला वाचवते. या तिच्या उपकाराची परतफेड म्हणून तो तिला गाणं शिकवण्याचं मान्य करतो.

इकडे दरबारातील राजगायक उस्ताद मदनगोपाळ हा कारस्थानी गृहस्थ (यानेच मंदारच्या वडलांवर विषप्रयोग केलेला असतो.) राजनर्तिका चंद्रकला आणि राजगायिका रत्नमाला यांच्यावर एकाच वेळी फिदा असतो. त्यांना वश करण्याच्या खटपटीत आणि नशापाणी करण्यात तो सतत मग्न असतो. रत्नमाला जंगलात मंदारच्या मागे गेल्याने तो अस्वस्थ असतो. रत्नमालाने दरबारी परत यावं म्हणून राजे फर्मान काढतात. त्यासाठी जुगलबंदीचं आयोजन केलं जातं. रत्नमाला आणि चंद्रकला यांच्या नृत्य-गायनाची ही जुगलबंदी रत्नमालाला खरं तर मान्यच नसते. दोन वेगवेगळ्या कलांमध्ये जुगलबंदी कशी काय होऊ शकते, हा तिचा सवाल असतो. पण राजेसाहेबांच्या हुकुमापुढे इलाज नसतो. जुगलबंदी ऐन रंगात आलेली असतानाच मंदार तिथे प्रवेशतो आणि ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे असं राजेसाहेबांच्या लक्षात आणून देतो. याऐवजी दोन गायकांमध्ये चुरस लावावी असं तो त्यांना सांगतो. त्यानुसार उस्ताद मदनगोपाळ आणि मंदार यांच्यात गाण्याची जुगलबंदी होते आणि त्यात मदनगोपाळची हार होते…

विद्याधर गोखले लिखित, सुधा करमरकर दिग्दर्शित (या प्रयोगाचं दिग्दर्शन- संगीत मार्गदर्शन पं. मुकुंद मराठे, संजय मराठे आणि वीणा नाटेकर यांनी केलं आहे.) आणि संगीतकार राम मराठे संगीत दिग्दर्शित ‘संगीत मंदारमाला’ ही एक अखंड चालणारी संगीत मैफल आहे. ‘जय शंकरा गंगाधरा’, ‘सोहम हर डमरू बाजे’, ‘जयोस्तुते उषादेवते’, ‘ए गुलबदन’, ‘कोण असशी तू नकळे मजला’, ‘आज मीलन की रात साजनी’, ‘तारील हा तुज’, ‘बसंत की बहार आयी’… अशी एकाहून एक सरस रागदारी संगीतावर आधारित गाणी हा ‘संगीत मंदारमाला’चा यूएसपी आहे. या प्रयोगात या गाण्यांवर नादावलेले प्रेक्षक ताल धरताना दिसतात. वरद सोहनी (ऑर्गन), धनंजय पुराणिक- मुकुंद मराठे (तबला), प्रणव दांडेकर (पखवाज) आणि मोहन पेंडसे (व्हायोलिन) यांची तितक्याच तोलामोलाची साथसंगत या नाटकाला लाभली आहे. नाटकाच्या सर्व तांत्रिक बाबीही कालसुसंगत आणि प्रयोगमूल्यांत भर घालणाऱ्या आहेत.

गायकाच्या आयुष्यावर आधारलेलं हे नाटक असल्याने त्यात मुक्तपणे संगीताच्या नाना तऱ्हांचा अंतर्भाव आहे. आश्रम संगीत, हवेली संगीत आणि दरबारी संगीताचा मिलाफ त्यात आहे. गोखलेंची हुकमी लेखणी, रसाळ पदं आणि पं. राम मराठे यांची संगीतावरची हुकुमत आणि वैविध्यपूर्ण गायकी यांचा त्रिवेणी संगम या नाटकात पाहायला मिळतो. पं. मुकुंद मराठे यांनी हे नाटक सादर करताना जुन्या काळाचा प्रत्यय पुन्हा एकदा आजच्या रसिकांना यात दिलेला आहे. तयारीचे कलावंत, अत्यंत परिश्रमपूर्वक बसवलेला प्रयोग आणि नाटक-संगीत-नृत्याची एक बहारदार मैफलच जणू आपण अनुभवतो आहोत अशी प्रेक्षकाची भावना होते, हे या प्रयोगाचे यश आहे. नव्या प्रेक्षकांनाही यात गुंतवून ठेवण्याची किमया त्यांना साधली आहे. अभिनय, नृत्य आणि संगीताचा हा एक अप्रतिम आविष्कार आहे. संगीत नाटकावर घेतले जाणारे आक्षेप टाळण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न यात केला आहे. त्यासाठी नाटकाचं उचित संपादन त्यांनी केलं आहे. कलाकारांचे संवाद आणि गाण्यांवरही त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. संवादांतूनच गाणं उगवतं आणि नाटक पुढे घेऊन जातं. याकामी तरुण कलाकारांनीही त्यांना तितकीच मोलाची साथ दिली आहे.

भाग्येश मराठे यांनी मंदारच्या भूमिकेत गायनाची जबरदस्त तयारी आणि संवादांतील मार्दव यावर भरपूर काम केल्याचं जाणवतं. मकरंद पाध्ये यांनी त्यांना मित्राच्या भूमिकेत छान साथ केली आहे. राजगायिका रत्नमालाच्या भूमिकेत प्राजक्ता मराठे-बिचोलकर यांनी गाण्याचे शिवधनुष्य ताकदीने पेललं आहे. उस्ताद मदनगोपाळ झालेल्या सुधांशू सोमण यांनीही खलनायकी छटा असलेली, पण अत्यंत तयारीच्या गायकाची यातली भूमिका उत्तम वठवली आहे. प्रिया देव यांनीही राजनर्तिका चंद्रकलावर आपली छाप पाडली आहे. रमेश चांदणे यांचा भैरवही भाव खाऊन जातो. अन्य कलाकारांनीही आपापल्या भूमिका चोख केल्या आहेत.

एक आगळं संगीत नाटक पाहिल्याचं समाधान हे नाटक देतं.