श्रीराम ओक
अमित शहापूरकरच्या म्युझिक व्हिडीओला समाजमाध्यमांत प्रतिसाद
जगभरातील चाहत्यांवर अक्षरश: गारूड केलेल्या आणि तिकीट खिडकीवर उत्पन्नाचे नवनवे विक्रम नोंदवत असलेल्या माव्र्हल स्टुडिओजच्या ‘अॅव्हेंजर्स-एंडगेम’ या चित्रपटाला पुण्यातील एका चित्रपटवेडय़ाने संगीतमय सलाम केला आहे. मराठी माध्यमात शिकलेल्या या तरुणाने इंग्रजी गीताचे लेखन, संगीत दिग्दर्शन करून त्याचा ‘हू यू आर’ हा व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये प्रसारित केला असून, त्याच्या या सृजनशीलतेला दाद मिळत आहे.
टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मराठी माध्यमात शिकलेला अमित शहापूरकर सध्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहे. इंग्रजी गाण्यांचा चाहता असलेला अमित ‘अॅव्हेंजर्स’ या चित्रपट मालिकेच्या प्रेमात आहे. विख्यात गायक मायकल जॅक्सनच्या गाण्यांनी इंग्रजी गाण्यांकडे वळलेल्या अमितची स्वतचा म्युझिक व्हिडीओ करण्याची इच्छा ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ला सलाम करण्यासाठीच्या म्युझिक व्हिडीओच्या रुपाने पूर्ण झाली आहे. म्युझिक व्हिडीओचे चित्रीकरण सोनापूर या गावी झाले असून, त्याच्यासह नितेश दिवेकरने संगीत संयोजन केले आहे. ‘आतापर्यंत ‘अॅव्हेंजर्स’ या मालिकेतील सगळे चित्रपट मी अनेक वेळा पाहिले आहेत. कॅप्टन अमेरिका आणि आयर्नमॅन ही पात्रे माझ्या विशेष आवडीची आहेत. या मालिकेतील ‘अॅव्हेंजर्स-एंडगेम’ हा शेवटचा भाग येण्याचा प्रचार सुरू झाल्यावर माझ्या मनात या मालिकेतील पात्रे, त्यांची आधीची कामगिरी या विषयी विचार घोळू लागले. त्यातूनच काहीतरी सर्जनशील निर्मिती करण्याची इच्छा झाली आणि अॅव्हेंजर्स एंडगेमला सलाम म्हणून म्युझिक व्हिडीओ करण्याची कल्पना सुचली.माझी ही कल्पना माझ्या मित्रांनीही उचलून धरली. त्यामुळे ‘हू यू आर’ हे इंग्रजी गाणे लिहून, संगीतबद्ध केले. त्यानंतर त्याचा व्हिडीओ तयार करून समाजमाध्यमांत प्रसारित केला, असे अमितने सांगितले. हा म्युझिक व्हिडीओ तयार करण्यासाठी कुटुंबीयांनीही प्रोत्साहन दिल्याचे त्याने आवर्जून नमूद केले.
‘पॉप सिंगर’ होण्याचा विचार
पाश्चात्त्य संगीताकडे विशेष ओढा असलेल्या अमितचा भविष्यात पॉप सिंगर म्हणून करिअर घडवण्याचा विचार आहे. अॅव्हेंजर्स एंडगेमसाठी केलेला म्युझिक व्हिडीओ ही सुरुवात असल्याची त्याची भावना आहे. त्यामुळेच अजून खूप मोठा पल्ला गाठण्याचे लक्ष्य अमितने समोर ठेवले आहे.