Faria Abdullah reacts on Trolling For Bonalu Festival: दाक्षिणात्य आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री फारिया अब्दुल्ला सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय बनली आहे. हैदराबादमध्ये पार पडलेल्या ‘बोनालू’ उत्सवात पारंपरिक वेशभूषेत डान्स करताना आणि मंदिरात जाऊन पूजा करतानाचे तिचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. मात्र, मुस्लीम असून हिंदू सणात भाग घेतल्यामुळे कट्टरतावाद्यांनी तिला ‘काफिर’ म्हणत ट्रोल केलं. या द्वेषपूर्ण ट्रोलिंगवर आता फारियाने मौन सोडले आहे. इन्स्टाग्रामवर एक भावुक व्हिडीओ शेअर करत फारियाने वडिलांच्या धर्मांतराविषयी मोठा खुलासा केला आहे.
मुस्लीम असूनही हिंदू सणात सहभागी झाल्याने फरियाला ट्रोल केलं गेलं. स्वतःच्या धर्माविरोधात गेलीस, तू ‘काफिर’ आहेस असं म्हणत तिला हिणवलं. या ट्रोलिंगनंतर फारियाने व्हिडीओ शेअर करत आपली बाजू मांडली. विविध संस्कृती आणि धर्म जवळून पाहिल्यामुळे आपला दृष्टिकोन असा असल्याचं तिने सांगितलं.
वडिलांनी स्वीकारला होता इस्लाम
वडील संजय अब्दुल्ला यांच्याबद्दल बोलताना फारिया म्हणाली, “माझ्या वडिलांनी धर्मांतर केलं होतं. याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला समजतं का? त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला कारण त्यांना तो धर्म आवडला होता.”
वडिलांचा जन्म हिंदू कुटुंबात झाला होता- फारिया अब्दुल्ला
फारियाने सांगितलं की, तिच्या वडिलांचा जन्म एका हिंदू कुटुंबात झाला होता, पण नंतर त्यांनी इस्लाम स्वीकारला. फारियाच्या मते, कुटुंबातील या वातावरणामुळे तिला धर्म आणि अध्यात्म एका वेगळ्या दृष्टिकोनातून समजून घेण्यास मदत झाली. आपण नेहमीच इस्लाममधील चांगल्या गोष्टी पाहिल्या आहेत. त्यामुळे दुसऱ्या धर्मातील परंपरा किंवा सणात सहभागी होणं म्हणजे स्वतःचा धर्म सोडणं नव्हे, असं स्पष्ट मत फारियाने मांडलं.
सर्वांचं चांगलं होवो एवढीच इच्छा – फारिया अब्दुल्ला
फारिया म्हणाली, “मला माझ्या वडिलांनी या धर्मातील चांगल्या गोष्टी शिकवल्या. कारण त्यांना तो धर्म इतका आवडला होता की तो त्यांना स्वीकारायचा होता. मग विचार करा माझं संगोपन कसं झालं असेल? मी नेहमीच इस्लाममधील चांगल्या गोष्टी शिकले आहे. खरं तर, मी सर्वांचं चांगलं होवो असाच विचार करते.” फारिया तिला वाईट बोलणाऱ्या लोकांना म्हणाली, “जे कोणी माझा तिरस्कार करत आहेत, ज्यांना वाटतंय की मी चुकीच्या मार्गावर जात आहे, काफिर आहे… तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते म्हणा, तुमचंही भलो होऊदेत एवढंच मी म्हणेन.”
“मला प्रेमाबद्दल, मला आवडणाऱ्या गोष्टींबद्दल बोलायचं आहे आणि मी बोलत राहीन. जे लोक सध्या माझा तिरस्कार करत आहेत, मी त्यांनाही प्रेमच पाठवेन कारण मला माहित आहे की माझं मन साफ आहे. कारण मी प्रेम अनुभवलंय. आशीर्वादाची ताकद अनुभवली आहे,” असं फारिया म्हणाली.
