अभिनेत्री समांथा रूथ प्रभूने ३८ व्या वर्षी दुसरं लग्न केलं. तिने ‘द फॅमिली मॅन’चा दिग्दर्शक राज निदिमोरूशी ईशा योग केंद्रातील लिंग भैरवी मंदिरात लग्न केलं. राज व समांथा दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. समांथाने स्वतः लग्नातील काही फोटो शेअर करून ही बातमी शेअर केली. समांथाच्या लग्नानंतर तिचा एक्स पती नागा चैतन्यने पहिली पोस्ट केली आहे.
२०२१ मध्ये समांथा व नागा चैतन्य यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर तीन वर्षांनी नागाने सोभिता धुलिपालाशी लग्न केलं. दोघांच्या लग्नाला वर्ष झालं आहे. त्यानंतर आता समांथाने तिच्यापेक्षा ८ वर्षांनी मोठ्या राज निदिमोरूशी लग्न करून नवीन सुरुवात केली आहे.
राज व समांथा यांच्या नात्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत्या. अखेर समांथाने सोमवारी, १ डिसेंबर २०२५ रोजी लग्न केलं. समांथाच्या लग्नाची बातमी आल्यानंतर नागा चैतन्यने एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल आहे.
नागा चैतन्यने सोशल मीडियावर त्याच्या ‘धूता’ चित्रपटातील एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये त्याचा इंटेन्स लूक दिसतोय. त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, “धूता हा एक असा शो आहे ज्याने सिद्ध केलं की जर तुम्ही एक अभिनेता म्हणून क्रिएटिव्हिटी आणि प्रामाणिकपणे निर्णय घेतले आणि तुमचे सर्वोत्तम दिले तर लोक तुमच्याशी कनेक्ट करतील. थँक्यू! ‘धूता’ची २ वर्ष! हे सगळं शक्य करणाऱ्या टीमला खूप प्रेम.” त्याने त्याच्या पोस्टमध्ये या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या लोकांना टॅग केलं आहे.
समांथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर २०१७ मध्ये गोव्यात थाटात लग्न केलं होतं. तेलुगू इंडस्ट्रीतील सर्वात लाडकं जोडपं असलेल्या समांथा व नागा चैतन्यचं लग्न जास्त काळ टिकलं नाही. २०२१ मध्ये, त्यांचा सोशल मीडियावर पोस्ट करून विभक्त होत असल्याचं जाहीर केलं. त्यांच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला होता. आता समांथा व नागा चैतन्य आयुष्यात पुढे गेले आहेत. नागा चैतन्यने अभिनेत्री सोभिता धुलीपालाशी लग्न केलं, तर समांथाने राजबरोबर आयुष्याची नवी सुरुवात केली आहे.
