Naga Chaitanya Sobhita Dhulipala Married Life Reveal: नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांची जोडी दाक्षिणात्य सिनेविश्वातील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. त्यांच्या डेटिंगपासून लग्नापर्यंत आणि नंतर वैवाहिक आयुष्याबद्दल अनेकदा चर्चा रंगल्या आहेत. नागा चैतन्यचं हे दुसरं लग्न असल्यामुळे सर्वांचं त्यांच्याकडे लक्ष लागलं होतं. आता शोभिताने त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणानं भाष्य केलं असून, लग्नाच्या पहिल्याच वर्षात दोघांना एकमेकांना महिन्यातून फक्त एकदाच भेटता आलं, असा खुलासा तिने केला आहे.
‘व्होग इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत शोभिताने तिच्या लग्नाबद्दलच्या अपेक्षा आणि तिची स्वप्नं सांगितली आहेत. पारंपरिक पद्धतीने आणि संस्कृती जपून, पूर्ण रीतीरिवाजांनुसार लग्न करण्याची तिची आधीपासूनच इच्छा असल्याचं शोभितानं सांगितलं. ती म्हणाली, “माझं लग्न एखाद्या अभिनेत्याबरोबर किंवा माझ्याच राज्यातील व्यक्तीबरोबर होईल असा मी कधी विचार केला नव्हता. पण, माझी संस्कृती जपणारं आणि पारंपरिक पद्धतीचं लग्न मला नेहमीच हवं होतं. किशोरवयापासून मला तसंच लग्न करण्याची इच्छा होती.”
महिन्यातून फक्त एकदाच पाहिलं – शोभिता
मात्र, लग्नानंतर शोभिता व नागा चैतन्य यांना एकमेकांना वेळ न देता आल्याची खंत व्यक्त केली. ती म्हणाली, “लग्नानंतर माझं तमिळनाडूला शूटिंग होतं, मी कामासाठी १५० दिवस तिकडे गेले होते. त्यावेळी आमचं वैवाहिक आयुष्य आणि नातं नवीन होतं. लग्नाच्या पहिल्या वर्षात तर कदाचित मी त्याला महिन्यातून फक्त एकदाच पाहिलं असेल, त्यामुळे हे सगळं एकत्र कसं सांभाळायचं हे अजूनही आम्ही समजून घेत होतो. आता गेल्या काही महिन्यांपासून आम्ही या नव्या आयुष्याशी जुळवून घेत आहोत. एक गोष्ट मला माहीत आहे की, आमच्यातील नातं चांगलं ठेवण्यासाठी जे काही करण्याची गरज आहे, त्यासाठी आम्ही दोघंही प्रयत्न करतो आणि त्या गोष्टीला प्राधान्य देतो.”
दरम्यान, नागा चैतन्यनेही यापूर्वी पत्नी शोभिताचं आणि तिच्या स्वभावाचं कौतुक केलं होतं. तो म्हणालेला, “मुंबईमध्ये असल्यावर शोभिता मॉडर्न, कुल आणि पुढारलेल्या विचारसणीची वाटते, मात्र विशाखापट्टणममध्ये गेल्यावर ती आपल्या संस्कृतीशी घट्ट जोडलेली व्यक्ती असल्याचं दिसून येतं. शोभिताचं तेलुगू भाषेतील बोलणं ऐकून तर मी खूपच आश्चर्यचकित झालो होतो.”
नागा चैतन्य आणि शोभिता यांनी २०२२ मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर ४ डिसेंबर २०२४ रोजी हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये दोघांनी लग्न केलं. हा स्टुडिओ नागा चैतन्यच्या कुटुंबाच्या मालकीचा आहे. यापूर्वी नागा चैतन्यचा अभिनेत्री समंथा रूथ प्रभूबरोबर २०२१ मध्ये घटस्फोट झाला होता.
