Nagarjuna and Tabu Love Story: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ‘किंग’ नागार्जुन सध्या आपल्या १०० व्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, या चित्रपटाची चर्चा केवळ आकड्यामुळे नाही, तर त्यात होणाऱ्या एका धमाकेदार कास्टिंगमुळे होत आहे. नागार्जुनच्या या ऐतिहासिक चित्रपटात त्याची कथित एक्स गर्लफ्रेंड तब्बू झळकणार आहे. तब्बूने स्वतः इन्स्टाग्रामवर ‘King 100’ च्या सेटवरील फोटो शेअर करत या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ९० च्या दशकात नागार्जुन आणि तब्बू यांच्या अफेअरच्या चर्चांनी सिनेसृष्टी गाजवली होती. जवळपास १० ते १५ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ही जोडी वेगळी झाली होती, मात्र आता नागार्जुनच्या या विशेष प्रोजेक्टसाठी तब्बू पुन्हा एकदा त्याच्याबरोबर काम करताना दिसणार आहे.

नागार्जुन आणि तब्बू यांनी शेवटचं १९९८ साली ‘आविदा माँ आविदा’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यानंतर ही जोडी कधीही पडद्यावर एकत्र दिसली नाही. आता खुद्द तब्बूनेच ती नागार्जुनच्या १०० व्या चित्रपटाचा भाग असल्याचं स्पष्ट केलं आहे.

तब्बूने केली पोस्ट

‘भूत बंगला’ फेम अभिनेत्री तब्बूने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत एका खुर्चीवर क्लॅपबोर्ड ठेवलेला दिसत असून त्यावर ‘King 100’ असं लिहिलं आहे. हे या चित्रपटाचं तात्पुरतं नाव आहे. “आम्ही किंग १०० चे शूटिंग सुरू केले आहे,” असं कॅप्शन या फोटोला दिलं आहे.

नागार्जुनबरोबर तब्बू तब्बल २८ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. खरं तर एकेकाळी तब्बू आणि नागार्जुन यांचे अफेअर होते, त्यामुळे ते एकत्र झळकणार या बातमीने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

तब्बू आणि नागार्जुन यांचे अफेअर

तब्बू आणि नागार्जुन यांची पहिली भेट १९९६ मध्ये ‘निन्ने पेल्लादाटा’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर १९९८ मध्ये त्यांनी पुन्हा एकत्र काम केले. ९० च्या दशकाच्या शेवटी त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा नागार्जुन यांनी तब्बूला डेट करायला सुरुवात केली, तेव्हा ते आधीच विवाहित होते. दोघांनी एकमेकांना १०-१५ वर्षे डेट केलं, असं म्हटलं जातंय. तब्बूला नागार्जुनशी लग्न करायचं होतं, पण नागार्जुनला आपला संसार मोडायचा नव्हता.

नागार्जुन यांना आपली पत्नी अमला हिला सोडायचं नव्हतं. अमला यांनी तेव्हा या सर्व अफवा फेटाळल्या होत्या आणि तब्बू फक्त आपली चांगली मैत्रीण असल्याचंही तिने म्हटलं होतं. माध्यमांमधील वृत्तानुसार, जवळपास एक दशक नागार्जुनबरोबर रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१२ मध्ये तब्बूने त्यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. तब्बू ५२ वर्षांची असूनही अविवाहित आहे, तिने लग्न केलं नाही.