दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन सध्या त्यांच्या मुलाच्या लग्नामुळे चर्चेत होते. त्यांचा धाकटा मुलगा अखिल अक्किनेनी व झैनब रावदजी यांनी नुकतंच ६ जून रोजी लग्न केलं. या दोघांच्या लग्नाला दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. मुलाच्या लग्नानंतर नागार्जुन आता पुन्हा चर्चेत आले ते त्यांच्या ‘कुबेरा’ या आगामी चित्रपटामुळे. ‘कुबेरा’ या चित्रपटात ते महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाच्या एका गाण्याच्या लाँचला त्यांच्यासह चित्रपटातील इतर कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी नागार्जुन यांनी प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाचं कौतुक केलं आहे.
रश्मिका मंदाना ही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. एका पाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या या अभिनेत्रीचा फक्त दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नाही तर बॉलीवूडमध्येपण मोठा चाहतावर्ग आहे. विशेषकरून तरुणांमध्ये तिची जास्त क्रेझ आहे. अशातच प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन यांनीसुद्धा तिचं कौतुक केलं आहे.
‘कुबेरा’ चित्रपटाच्या एका गाण्याच्या लाँचदरम्यान नागार्जुन यांनी आजवर त्यांच्या चित्रपटांना देशभरातून कायम मिळत आलेल्या पाठिंब्याबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यासह त्यांनी ‘कुबेरा’ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या रश्मिका मंदानाचं कौतुक केलं आहे.नागार्जुन रश्मिकाबद्दल म्हणाले, “तिने आम्हाला सर्वांना मागे सोडलं आहे. आमच्यापैकी कोणाच्याही चित्रपटांनी २०००-३००० कोटींची कमाई केलेली नाही. गेल्या तीन वर्षांमध्ये ती एकमेव अशी व्यक्ती आहे, जिचे चित्रपट सातत्याने इतकी कमाई करत आहे; ती कलागुण संपूर्ण आहे.”
नागार्जुन यांच्याकडून कौतुक होताना पाहून रश्मिका म्हणाली, “आज मी जिथे आहे त्याचा मला खूप आनंद आहे. हे सगळं फक्त प्रेक्षकांच्या प्रेमामुळे शक्य झालं. खरंतर मी फक्त काम करायला सुरुवात केली, पण मला चित्रपटाने किती कमाई केली वगैरे या सर्व गोष्टींबद्दल फार काही माहीत नाही. कारण मी दक्षिण आणि बॉलीवूड दोन्ही इंडस्ट्रीत काम करत आहे, त्यामुळे मला या स्पर्धेबाबत काही माहिती नाहीये.” ‘कुबेरा’ या चित्रपटात अभिनेते नागार्जुन, धनुष, रश्मिका मंदाना हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट येत्या २० जून रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या चित्रपटातील एका गाण्याच्या लाँचदरम्यान चित्रपटातील कलाकारांनी हजेरी लावली होती.